घरमनोरंजन‘स्वभाव कल्याण’ चे ‘तरुण’ नाटक ‘६७२ रूपयांचा सवाल’

‘स्वभाव कल्याण’ चे ‘तरुण’ नाटक ‘६७२ रूपयांचा सवाल’

Subscribe

लेखक आणि पत्रकार जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या अकादमी पुरस्कार प्राप्त कथा संग्रहात, ‘सहाशे बहात्तर रूपयांचा सवाल’ या नावाची एक कथा आहे. या नाटकाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी नक्की वाचा संपूर्ण लेख.

-आभास आनंद

लेखक आणि पत्रकार जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या अकादमी पुरस्कार प्राप्त कथा संग्रहात, ‘सहाशे बहात्तर रूपयांचा सवाल’ या नावाची एक कथा आहे. तिचे नाट्यरूपांतर, ‘स्वभाव कल्याण’ या युवा रंगकर्मी संस्थेचे लेखक- दिग्दर्शक स्वप्निल आजगावकर यांनी ३० कलाकारांच्या ताफ्यात केले आहे. नाटकाची प्रचंड हौस आणि अपरिमित ऊर्जा असलेल्या बिर्ला कॉलेज आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील या तरुण मंडळींनी, कोणी आपले नाटक करेल याची वाट न पाहता, स्वत:च या नाटकाची निर्मिती केलीय.

- Advertisement -

स्वप्निल आजगावकरचा प्रवास 

बिर्ला कॉलेजामधून एकांकिका करणार्‍या स्वप्निल आजगावकर या तरुण लेखक-दिग्दर्शक अभिनेत्याने आपले समविचारी सोबत घेऊन हा प्रयोग साकारलाय. बिर्ला कॉलेजमधून, इक्बाल माजिद यांच्या कथेवर आधारित ‘साश’ ही एकांकिका करत त्यांनी सुरुवात केली. पुढे काही एकांकिका करतानाच स्वप्निलने ‘झी मराठी’वर गाजलेल्या ‘जय मल्हार’या मालिकेत कार्तिकेय ही भूमिका केली. शिवाय झी युवा वाहिनीवरील, संजय जाधव यांच्या ‘फ्रेशर्स’ या मालिकेत काम केले. या दरम्यान नाटक करण्याची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने, स्वत:ची नाट्यसंस्था सुरू करताना, आवडलेली जयंत पवार यांची कथा त्याला खुणावत होती. पण आपले नवोदित असण्यासोबत पवारांशी ओळख नसल्याने, परवानगी मिळेल का? याबद्दल स्वप्निल साशंक होता. पण परवानगीच काय तर मोलाची मदतही पवारांनी केली आणि ‘६७२..’हे नाटक उभे राहिले.

एक मजेदार संघर्षावर आधारित नाटक 

मुंबईतील चाळींच्या जागी पुनर्वसन योजनेत उभ्या रहाणार्‍या ७ उच्च मध्यमवर्गीय सिद्धेश अपार्टमेंट आणि समोर अजून झोपड्यांत असलेले जिजाबाई नगर, या दोन विषम वर्गातील एक मजेदार संघर्ष आपल्याला ६७२ मध्ये पाहायला मिळतो. आजवर या नाटकाचे दहा प्रयोग या मंडळींनी नेटाने केलेत. त्यामध्ये त्यांना राज्य नाट्य स्पर्धेसाठी सहाय्यक अभिनेता पुरस्कार (चंद्रास कांबळी), झी गौरवसाठी दिग्दर्शन नामांकन (स्वप्निल आजगावकर) मिळाली आहेत. कोकण गौरव करंडक स्पर्धेत या नाटकाने नाटक, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाश असे पाच पुरस्कार पटकावत दुसरा क्रमांक मिळवलाय.  सध्या हे नाटक व्यावसायिक स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते झाल्यास प्रेक्षकांना एक चांगला विषय नक्कीच पाहायला मिळेल.


(लेखक नाट्याभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -