‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ‘जीजी’चं निधन

marathi serial lagir zal ji fame veteran actress kamal thoke passes away
'लागिरं झालं जी' मालिकेतील 'जीजी'चं निधन

‘झी मराठी’वरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील फेम जीजी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. दिवाळी सुरु होताचं मराठी मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरु या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमल ठोके यांच्या जाण्यामुळे चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मराठी अभिनय क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका अशी कमल ठोके यांची ओळख होती. मुलगा सुनिल याच्याकडे बंगळुरू येथे त्या राहण्यास गेल्या होत्या. पण दीर्घ आजारामुळे त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. कमला ठोके यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कमला ठोके यांनी ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून जीजीची व्यक्तिरेखा साकारून अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे त्यांची जीजी अशी निर्माण झाली. जीजी यांच्या निधनाने मराठी मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.

शिक्षण क्षेत्रातील आपला पेशा सांभाळत त्यांनी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी ११९२ साली प्रवेश केला. शिक्षकाची नोकरी करत हे काम करणे अवघड जात होते. त्यामुळे त्यांनी सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा अभिनय क्षेत्रात नव्याने पाऊल टाकले. सख्खा भाऊ पक्का वैरी, ना. मुख्यमंत्री गावडे, कुंकू झालं वैरी यासांरख्या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. तसेच ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकेत त्यांनी काम केलं आहे.