‘मिर्झापूर’चा भाग २ लवकरच; अलीचा खुलासा

नव्या दमाच्या कलाकारांची टीम, हटके कथानक आणि त्याची प्रभावशाली मांडणी यामुळे 'मिर्झापूर'ला लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

Mumbai

अॅमेझॉन प्राइमवरील ‘ये है मिर्झापूर’ या वेब सिरीजची सध्या सगळीकडे हवा आहे. ‘मिर्झापूर’ला देशभरातील प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या या जबरदस्त प्रतिसादामुळे सिरीजच्या निर्मात्यांनी लवकरात लवकर सीझन-२ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती अली फजलने दिली आहे. अलीची या वेबसीरीजमध्ये मध्यवर्ती भूमिका आहे. याविषयी सिरीजचे मेकर्स सांगतात की, ‘मिर्झापूर‘च्या सीझन १ मधील गोष्ट पुढे नेण्यासाठी त्याचा दुसरा भाग काढणं आवश्यक होतंच. पण इतक्या लवकर त्याचा दुसरा भाग काढू असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे सगळं प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आणि मिर्झापूरवर त्यांनी केलेल्या प्रेमामुळेच शक्य झालं आहे.’ या वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल, विक्रांत मेसी, दिव्येंदू शर्मा, कुलभूषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, रसिका दुगल, हर्षिता गौर आणि अमित सियाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. नव्या दमाच्या कलाकारांची टीम, हटके कथानक आणि त्याची प्रभावशाली मांडणी यामुळे ‘मिर्झापूर’ला लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

त्यामुळे प्रेक्षक मिर्झापूरच्या ‘सीझन २’साठी उत्सुक असणार यात काहीच शंका नाही. अलीने सांगितल्यानुसार, २०१९ मध्ये मिर्झापूरचा भाग २ प्रदर्शित होणार आहे. दुसरा भागही अर्थातच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होईल.

अल्पावधीतच सुपरिहट

सत्तेच्या मोहाने झपाटलेल्या आणि शेवटी त्यातच संपून जाणाऱ्या दोन भावांचा प्रवास दाखवणारी मिर्झापूर ही मालिका म्हणजे भारताच्या केंद्रस्थानाचे तसेच तरुणाईचे जिवंत चित्र आहे. यातील जग अमली पदार्थ, शस्त्र आणि बेकायदा कृत्यांनी भरलेले आहे. यात जात, सत्ता, अहंकार आणि स्वभाव एकमेकांना छेद देत राहतात आणि हिंसाचार हा जगण्याचा एकमेव मार्ग आहे. असेच या कथेतल्या प्रमुख पात्रांना वाटत असते.  रण अंशुमन आणि पुनीत कृष्णा यांची निर्मिती असलेली व गुरमित सिंग यांनी दिग्दर्शित केलेली मिर्झापूर ही वेब सिरीज एकूण नऊ भागांची आहे. १६ नोव्हेंबरपासून प्राईमवर रिलीज झालेली वेब सिरीज अल्पावधीतच सुपरहिट ठरली आहे. मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकरनेही मिर्झापूरमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. यातील श्रेयाच्या हटके लूकने सर्वांचच आणि विशेषत: मराठी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकत्याच येऊन गेलेल्या सॅक्रेड गेम्स, घौल किंवा लस्ट स्टोरीज अशा अनेक वेब सिरीजनी  प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली. त्यापाठोपाठ आलेल्या ‘मिर्झापूर’नेही आता प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. देशातील लाखो लोक आणि विशेषत: तरुणवर्ग या सिरीजचे चाहते झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here