घरमनोरंजनकळत नकळत स्वप्नांचा पाठलाग

कळत नकळत स्वप्नांचा पाठलाग

Subscribe

आपल्या जगण्यात अनेक योगायोग होतात. हे असंच का झालं. याची उत्तरं त्यावेळी मिळत नाहीत. पण ज्यावेळी त्याची उत्तरं समोर येतात त्यावर विश्वास ठेवणं आनंददायक आणि आश्चर्यकारक असू शकतं, ‘मित्रों’चा पडदा हेच सांगतो.  एकूणच काही मित्रांना घेऊन थेएटरात ‘मित्रों’ मधला हा योगायोग पहायला हरकत नाही.

जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ते जे स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम करतात आणि दुसरे ते स्वतःच्या स्वप्नांना बाजूला सारून जगाने ठरवलेल्या यश, पैसा, प्रसिद्धींच्या संकल्पनांमध्ये स्वतःला अडकवून घेतात. त्यामुळे पैसा मिळत असला तरी स्वतःचं आनंदी जगणं बाजूला पडतं आणि आयुष्य एक मोठी न संपणारी तडजोड बनून राहात असते. अशी तडजोड करायला सध्याची तरुणाई तयार नाही. एका चांगल्या पटकथेतून मित्रों प्रेक्षकांना हेच सांगतो. चांगली पटकथा, खुसखुशीत संवाद आणि कथेच्या मजबूत बांधणीमुळे थोडा संथ असतानाही चित्रपटाचा परिणाम साध्य होतो. जगण्यात जोपर्यंत शक्यता असतात तोपर्यंत त्यात कुतूहल आणि आनंद असतो. ज्यावेळी या आपलं जगणं पक्कं होत जातं, आपल्या कुटुंबाकडून, जवळपासच्या माणसांकडून ठरवलं जातं तेव्हा जगण्यातलं कुतूहल औत्सुक्य नाहीसं होतं. आपलं मन जे सांगेल त्यासोबतच जायला हवं. त्याविरोधात नाही, दिग्दर्शक नितीन कक्करने हे यशस्वीपणे पटवून दिलं आहे.

माणसं आयुष्यात अनेक तडजोडी करतात, त्या कितपत करायच्या हे ज्याचं त्याला ठरवायचं असतं. हा विषय याआधी राजू हिरानीच्या ‘थ्री इडियट्स’मधून येऊन गेलाय. त्यानंतर असाच काहीसाच प्रयत्न त्याआधी फरहान अख्तरने ‘दिल चाहता है’ मध्येही केला होता. पण या दोन्ही चित्रपटांत नावाजलेले कलाकार होते. पण नितीनने जॅकी भगनानी वगळता कृतीका कामरा, प्रतिक गांधी, नीरज सूद अशा छोट्या पडद्यावरच्या कलाकारांना घेऊन हा प्रयोग पुन्हा यशस्वी केलाय. मैत्रीच्या नात्यांचे वेगवेगळे पैलू ‘मित्रों’मधून समोर येतात. हा ठराविक अर्थाने प्रेमकथापट नाही. कृतीका (अवनी) आणि जॅकी (जय) हे अनवधानाने एकमेकांच्या समोर येतात. परिस्थितीमुळे त्यांना परस्परांशी संवाद साधल्याशिवाय पर्याय नसतो. या संवादांतून तडजोडी टाळून जगण्यातल्या ज्या शक्यता उरतात त्या शक्यता पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘मित्रों’ चित्रपट. नायक, नायिकेचा सरधोपट प्रेमपट टाळण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न कौतूकास्पद आहे. याआधी मनीष शर्मा दिग्दर्शित बँड बाजा बारातमध्ये हा प्रयत्न फसला होता. तसं ‘मित्रों’चं झालेलं नाही.

- Advertisement -

अवनी आणि जय दोघांनाही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. अवनीला बिझनेस सुरू करायचा आहे, पण घरातून लग्नासाठी दबाव टाकला जातोय, तर जयला इंजिनियरिंगमध्ये रस नाही. केवळ वडिलांनी दबाव टाकल्याने तो ऑटोमोबाईल इंजिनियरिंग करतोय. या दोघांच्या जगण्यात हे साम्य आहे आता हे दोघेही एकत्र आल्यानंतर त्यांच्यातली अनावश्यक लव्हस्टोरी टाळली गेली आहे. त्यांच्यातलं प्रेम हे अनेकदा मैत्रीच्या वाटेवरून पुढे सरकत जातं. शिवाय दोघांमध्ये असलेल्या प्रोफेशनलिझममुळे नात्यांमध्ये येणारा दुरावा आणि त्यातून उलगडत जाणारं प्रेम असा सरधोपट प्रेमपटाचा मार्ग नितीन कक्करनं पटकथेतून टाळला आहे. सध्याच्या तरुणाईला झटपट पैसा कमावणं आवश्यक वाटतं हे खरं…इंटरनेटच्या माध्यमातून त्यासाठी अनेक मार्गही उपलब्ध झाले आहेत. पण त्यामुळे पैसे मिळवण्याचे गैरसमजही वाढले आहेत. इंटरनेट हे वस्तू उत्पादन करण्यासाठी बाजारात उतरण्याचे साधन असले तरी

प्रयत्न आणि परिश्रमाला शॉर्टकट नाही. हे प्रयत्न करताना थकायचं नसतं आणि निराशही व्हायचं नसतं. त्यासाठी आपल्या ध्येय्यावर आणि कौशल्यावर विश्वास असायला हवा. इंटनेटमुळे संधी मिळते पण संधीचं सोनं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सोबत असायला हवेत आणि मैत्रीच्या नात्यातला प्रामाणिकपणा हा इतर कुठल्याही नात्यापेक्षा थोडासा जास्तच असतो. इतर मैत्रीपटांपेक्षा ‘मित्रों’ वेगळा ठरतो तो इथेच. हा आजच्या काळातला चित्रपट. पार्श्वभूमी गुजरातमधल्या एका शहरातली. त्यामुळे पडद्यावर येणारे प्रसंगात फाफडा, जिलेबी, गाठीया असे उल्लेख अपरिहार्य होतात. चित्रपटाचं कथानक स्वच्छ, नितळ आहे. त्यामुळे भडक प्रसंग, पराकोटीची भावनिकता असलं काही नाही. त्यामुळे प्रेमभंगाचा अवास्तव आक्रस्ताळेपणा नाही. एकामागोमाग एक पडद्यावरून हळूवारपणे सरकणारे प्रसंग हे ‘मित्रों’चं यश. चित्रपटांतील गाणीही पटकथेशी बांधलेली आहेत. त्यामुळे ती कथानकाला अडथळा ठरत नाहीत. कृतीकाचं छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावरचं आगमन आत्मविश्वासाचं आहे. जॅकी भगनानीचा अभिनय चांगला झालाय; पण काही प्रसंगात त्याच्या सोज्वळपणाचा अतिरेक होतो. पण पटकथेच्या मांडणीत गोंधळ नसल्यामुळे तो खपून जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -