घरमनोरंजनकाय बाय सांगू

काय बाय सांगू

Subscribe

 लावणी कलावंत महासंघाने श्वेता इव्हेंटच्या सहकार्याने मुंबई लावणी अप्सरा या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्राथमिक आणि अंतीम फेरी असे त्याचे स्वरुप होते. खरंतर लावणी हा स्त्रियांचा प्रांत. कारण यात फक्त घुंगरांचा ताल धरून चालत नाही. हातवारे केले म्हणजे लावणी येते असेही म्हणता येत नाही. यात देहबोलीबरोबर नखरेल भावमुद्राही तेवढीच महत्त्वाची असते आणि ही खासियत फक्त लावणी नाचणार्‍या स्त्रियांमध्येच असते. शिवकालापासून ते आजतागायत लावणी ही नाचली गेली ती परंपरेने आलेल्या स्त्रियांकडूनच. पण आता काळ पूर्णपणे बदललेला आहे. लावणीची स्पर्धा म्हटले की त्यात जेवढ्या स्त्रिया तेवढेच पुरुष नर्तक हमखास भाग घेतात, हे सांगून पटायचे नाही. पण आता भुवया उंचवाव्यात अशी गोष्ट मुंबई लावणी अप्सरा या स्पर्धेत घडलेली आहे ती म्हणजे एकवीस स्पर्धकांमधून आशुतोष कीर्तीकर या युवा नर्तकाने लावणी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान मिळवलेला आहे. त्यानिमित्ताने पुरुषी वर्चस्वाचा घेतलेला मागोवा. .

काही दशकांपूर्वीच्या लोककलेचा मागोवा घेताना तमाशा संस्कृती सोडली तर अन्य कलांमध्ये स्त्रियांना फारसे स्थान दिले गेलेले नाही. मूक-चित्रपटाच्या काळात बर्‍याचवेळा पुरुषालाच महिलेची भूमिका करावी लागत होती. याच दरम्यान संगीत नाटकांचे प्रेक्षकांत जबरदस्त आकर्षण होते. त्यातसुद्धा पुरुष कलाकारच महिलेची भूमिका साकारत होता. दशावतार, नमन हे परंपरेने आलेले लोककलाप्रकार पहाता आजही त्यात पुरुष कलाकारच स्त्रीच्या वेषात भूमिका साकार करताना दिसतो. नव्या विचारसरणीच्या काही निर्मात्यांनी या कलाप्रकारात महिला कलाकारांनी प्राधान्य दिले; पण कोकणवासीयांकडून या लोककलेचे फारसे काही स्वागत झाले नाही. केल्या जाणार्‍या नमन खेळात प्रेक्षकाचा अभाव दिसतो म्हणताना काही निर्मात्यांनी पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही दशावतार आणि नमनामध्ये सुरू ठेवलेली आहे. मधल्या काळात काही शाहिरांनी गण-गवळण-बतावणी यासाठी महिला उपलब्ध होत नाहीत म्हणताना शाहिरीच्या कार्यक्रमात पुरुषाला स्त्री-वेशात उभे केले आहे, इतकेच काय तर तिला लावणी नाचायलाही भाग पाडलेले आहे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सलग दोन-तीन तास फक्त लावण्यांचे कार्यक्रम सादर करू शकतील इतक्या लावणी नाचणार्‍या महिलांची संख्या वाढलेली आहे. इतकेच काय तर पुरुष कलाकारांचे तीन-चार संच उभे राहू शकतील इतके लावणी नाचणारे आणि तेही स्त्री-वेशातील पुरुषांची संख्या वर्षानुवर्षे वाढते आहे.

संतोष लिंबोरे हे लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष आहेत. चंद्रकांत बारशिंगे, जयेश चाळके, संदेश पाटील, आकांक्षा कदम, संदेश गायकवाड, कविता घडशी, सुलभा जाधव यांच्याबरोबर अनेक पदाधिकारी यात सक्रिय आहेत. खरंतर या महासंघातील सर्वच कलाकार हे वाद्यवृंदाशी संबंधित असल्यामुळे या कलाकारांना मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघात सहभागी होता आले असते; पण लावणीमध्ये करिअर करू पहाणार्‍या किंवा या कलेशी बांधिलकी असणार्‍या कलाकारांची संख्या मोठी असल्यामुळे महासंघाची स्थापना झाली आणि संस्थेचे काम सतत चालू रहावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. मुंबई लावणी अप्सरा हा त्यापैकी एक उपक्रम. या महासंघाचे सभासद जशा महिला नृत्यांगणा आहेत तसेच स्त्री-वेशात नाचणार्‍या पुरुष कलाकारांची संख्याही मोठी आहे. श्वेता इव्हेंट्स ही अनिल पनाड व शिला पनाड यांची आहे. यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून एकवीस लावणी नृत्यांगणांनी यात सहभाग घेतला होता. त्यात पुरुष दहा नर्तकांचा सहभाग होता. प्राथमिक फेरीसाठी ओमकार सावंत याने काम केले, तर अंतीम फेरीसाठी ज्यांनी लोककलेसाठी योगदान दिले, आयुष्यभर लावणी जपली त्या सीमा पोटे, सुरेखा काटकर, सुधाकर पोटे यांना परीक्षक म्हणून निमंत्रित केले होते. यात पहिल्या तीन क्रमांकासाठी ज्या नर्तकांची निवड केली त्यात दोन पुरुष नर्तक होते हे विशेष म्हणावे लागेल. आशुतोष कीर्तीकर याने प्रथम, भैरवी मेस्त्री हिने द्वितीय तर रोहित शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. उत्तेजनार्थासाठी अंजली सावंत, निकीता कांबळे यांची निवड झाली.

- Advertisement -

आयोजकांचे यातही एक वैशिष्ठ्य होते, ते म्हणजे प्राथमिक फेरीत स्पर्धकांना ज्या गीतावर आवडेल त्यावर नाचण्याची मुभा दिली होती. अंतीम स्पर्धेसाठी मात्र टाकल्या गेलेल्या लॉटमध्ये जे गाणे येईल त्यावर स्पर्धकांना नाचावे लागेल अशी अट ठेवण्यात आली होती. असे असतानाही पुरुषवर्गाने त्यात बाजी मारली होती. इतरवेळी महिला कशा पुरुषांच्याबरोबरीच्या आहेत याचे दाखले दिले जातात; पण इथे मात्र पुरुष कलाकारसुद्धा कसा महिलांच्या बरोबरीचा आहे याची खात्री पटते. इतकेच काय तर बाहेरच्या वातावरणातही या कलाकारांना मानाचे स्थान मिळत आहे. अनेक नामांकीत लावणी नृत्यांगणांबरोबर पुरुष कलाकार स्त्रीच्या वेशात लावणी करताना पहायला मिळतो. एनसीपीए मध्ये लावणीचे समग्र दर्शन घडवणारा जो कार्यक्रम झाला त्यातसुद्धा स्त्रीवेशात पुरुष कलाकाराला प्राधान्य दिले होते. नुकताच छत्रपती शासन नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. त्यात जी लावणी अदा सादर केली गेलेली आहेत ती किरण कोरे या कलाकारावर चित्रित झालेली आहे. पुरुष कलाकारांचे लावणीच्या वेशात या क्षेत्रात येणे याचे स्वरुप पुढे कसे असेल हे सांगता येणे कठीण आहे. मुंबई विद्यापीठामध्ये लावणी विषयक जो अभ्यासक्रम शिकविला जातो, त्यात मुलींइतकीच मुलांमध्ये या कलेविषयी जिज्ञासा दिसून येते. मुंबई लावणी अप्सरा या स्पर्धेचे वैशिष्ठ्य म्हणजे व्यावसायिक रंगमंचावर ज्या पद्धतीने एखादा कार्यक्रम सादर केला जातो, तसे या स्पर्धेचे स्वरुप असते. अमित चव्हाण, समीर काळवे यांनी बतावणी सादर केली. संतोष लिंबोरे यांनी निवेदनात सहभाग घेतला. नम्रता वेस्वीकर, विजय कर्जावकर, संचिता मोरजकर, विकास सावंत यांचा प्रत्यक्ष कार्यक्रमात गायक म्हणून सहभाग होता. संजीवन कांबळे, स्मितेश व भक्ती गोळे यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.

यशवंत हो, कीर्तीवंत हो
आशुतोष कीर्तीकर तसा सातार्‍याचा. चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याविषयी त्याच्या मनात नेहमी कुतूहल होते. छोट्या-मोठ्या भूमिका नाटकात केल्या. इथल्याच एलबीएस कॉलेजमध्ये शिकत असताना लावणी ही कला त्याला अधिक भावली. सहकारी मित्रांबरोबर त्याने ती आत्मसात केली. मस्तानी मी लावणीची, घडीभर बसा पोटभर हसा अशा कितीतरी वाद्यवृंदांमध्ये स्वत:ला त्याने आजमावले. केवळ प्रयत्न म्हणून मुंबई लावणी अप्सरा या स्त्रियांच्या स्पर्धेत भाग घेतला आणि पुरुषाला अप्सरा होता आले याचा आनंद त्याला झाला. स्पर्धेत त्याने जी काही अदा पेश केली ती यशवंत हो, आडनावाप्रमाणे कीर्तीवंत हो ! अशीच होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -