नवरात्रोत्सवासाठी विशेष फोटो शूट करत या फोटोशूटच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित सामाजिक समस्या तसेच प्रश्नांकडे लक्ष वेधून घेत आहे. या नवरात्रीच्या गेल्या आठही दिवस तेजस्विनी अनोखे देवीचे रूप घेत ज्वलंत प्रश्न अधोरेखित करताना दिसत आहे.
हे प्रत्येक दिवसाचे फोटोशूट तेजस्विनीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. नुकतेच रविवारी अष्टमीच्या दिवशी गोरेगावमधील आरे वसाहतीतील जंगल परिसरात होत असलेल्या वृक्षांच्या कत्तलीच्य़ा विषयावर लक्ष वेधून घेतले आहे. आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तेजस्विनीने पृथ्वी मातेचे रूप साकारले आहे. हा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करताना तेजस्विनी म्हणते…
”पृथ्वी मी अदिती मी
आदि मी अनंत मी…
तू जाळले मला जरी
कृपाच वर्षवेन मी…
घुसमटला कंठ माझा तरी
दान प्रणाचेच देईन मी…
ज्ञान शिडे उभारुनी जग जिंकण्याचा खेळ तुझा चालला
पण उत्पत्ती स्थिती प्रलय हा अंतिम धर्म आहे आपुला
या धर्म क्षेत्री सदा अशीच अचल राहीन मी…
तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी
तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी !!”
असे कॅप्शन हा पृथ्वीमातेचा फोटो शेअर करताना तिने दिले आहे.