हनी ट्रेहानच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी?

nawazuddin and honey
नवाजुद्दीन सिद्दीकी, हनी ट्रेहान आणि विशाल भारद्वाज

दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या कमिने, ओमकारा, मकबूल आणि ७ खून माफमध्ये सहाय्य दिग्दर्शन केलेल्या हनी ट्रेहानना आता स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे ठरवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचा आघाडीचा आणि अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यामध्ये काम करणार असल्याचे समोर आले आहे. विशाल भारद्वाजच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये हनी ट्रेहान त्याला सहाय्य दिग्दर्शन करणार होता. मात्र, काही क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये दोघांचेही जमत नसल्यामुळे हनीने यातून काढता पाय घेतला असल्याचं सध्या म्हटलं जात आहे.

नवाजुद्दीनने अजूनही साईन नाही केला चित्रपट….

नवाजुद्दीन काम करत असलेल्या या चित्रपटाची कथा रहस्यावर आधारीत असून याचे नाव अंतिम करण्यात आले नाही. शिवाय अजूनही या चित्रपटामध्ये कोणती नायिका असेल यावर काहीही माहिती मिळालेली नाही. तर दुसऱ्या बाजूला नवाजुद्दीन हा चित्रपट करण्यास उत्सुक असूनही अजूनपर्यंत त्याने हा चित्रपट साईन केल्याची माहिती नाही. मात्र हनी ट्रेहानने चित्रपटाची पूर्वतयारी सुरु केली आहे. यातील नवाजुद्दीनची भूमिका मात्र गुलदस्त्यातच आहे. तर चित्रिकरण सुरु करण्यापूर्वी आपल्या भूमिकेची पूर्वतयारी नवाजुद्दीन करेल अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.

नवाजुद्दीन सध्या ‘या’ चित्रपटांमध्ये व्यस्त

दरम्यान, नवाजुद्दीन नुकताच नंदिता दास दिग्दर्शित ‘मंटो’ या चित्रपटाचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग करून भारतात परतला आहे. तर अभिजित पानसे दिग्दर्शित हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रितेश बत्रा यांच्या ‘फोटोग्राफ’ या चित्रपटात सनाया मल्होत्राबरोबर नवाजुद्दीन दिसेल असेही म्हटले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here