युथफुल ‘आम्ही बेफिकर’चा टीझर रिलीज

'आम्ही बेफिकर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Mumbai
New marathi movie AMhi befikir's teaser is out
चटपटीत संवाद असणाऱ्या आम्ही बेफिकर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

कॉलेज कट्टा, कॉलेजची धमाल मस्ती, कॉलेजमध्ये केलेले बंक लेक्चर, मित्रांसोबत केलेली धमाल हे फक्त कॉलेजच्या दिवसातच अनुभवयाला मिळतं. अशीच अनुभवलेली धमाल मस्ती लवकरच ‘आम्ही बेफिकर’ या मराठी चित्रपटातून परत एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटाची निर्मिती हरिहर फिल्म्सच्या नारेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्र्वर मराठे आणि रोहित चव्हण यांनी केलेली आहे. कविश्र्वर मराठे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे कलाकार अनेक चित्रपट, मालिकेतून आपल्यासमोर आले आहेत. मात्र ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटातून पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या जोडीसोबत राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हे कलाकारसुद्धा प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाला प्रणय अढांगळे यांनी संगीतबद्ध केले आहे.

तरुणाईच्या मनाला भिडणारी कथा

खुप काही मिळवण्याच्या प्रयत्नात खुप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशय सूत्रावर या चित्रपटाची कथा रंगवलेली आहे. आजच्या तरुणाईच्या मनातले विचार, त्यांच्या व्यथा, त्यांच्या मागण्या या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या कथेतून करण्यात आला आहे. थेट तरुणांशी संवाद साधणारा हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे वातावरण हे युथफुल असल्याचे टीझरमधून पहायला मिळत आहे. धमाल कथा, उत्तम कलाकार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला ‘आम्ही बेफिकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आम्ही बेफिकर’ हा चित्रपट ८ मार्चला राज्यात प्रदर्शित होणार आहे.