घरमनोरंजनहॉरर’ नव्हे; नुसतीच ‘हास्यास्पद’ कॉमेडी!

हॉरर’ नव्हे; नुसतीच ‘हास्यास्पद’ कॉमेडी!

Subscribe

लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. या खास प्रसंगाचे सर्व क्षण कायम आठवणीत रहावे अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मग या खास क्षणांसाठी काहीतरी वेगळे करण्याची अनेकांना इच्छा असते. त्यातच लग्नानंतर हनिमूनचा अनुभव सुद्धा काहीतरी वेगळा थ्रिलींग असावा अशी अपेक्षा ठेवणार्‍या या चित्रपटातील नायक-नायिकेसोबत पुढे काय - काय होतं यावर आधारीत ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा चित्रपट आहे.

मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आले असून त्यातच एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. दिवाळीपासून मराठीच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली जात आहे. या गर्दीमध्ये मराठीतली चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव आणि लेखक, अभिनेता प्रियदर्शन जाधव यांचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ शुक्रवारी, २३ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. अनिकेत विश्वासराव याच्याकडे अभिनयाचा दांडगा अनुभव आहे. तोच अनुभव हा चित्रपट पाहताना दिसून येतो. त्याशिवाय इतर कलाकारांमध्ये भारत गणेशपुरे आणि अंशुमन विचारे यांच्या आपापल्या भूमिका सुंदर वठवल्या आहेत. चित्रपटाचा केंद्रबिंदू असलेला प्रियदर्शन जाधव याने अपेक्षेप्रमाणेच कॉमेडी भूमिका साकारली. मात्र ती हॉरर होताना कुठेतरी फसली, असे चित्रपट पाहताना जाणवते. त्याशिवाय अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला मोठ्या पडद्यावर पाहताना कामाचा आणखी थोडा सराव असण्याची गरज असल्याचे प्रामुख्याने जाणवले. चित्रपटातील इतर कलाकारांमध्ये असलेले प्रिया गमरे, स्वाती पानसरे, पदम सिंग, अनुपम ताकमोघे, सुरेश पिल्लई यांच्या भूमिका जेमतेमच वाटल्या. एकूण अभिनयाच्या बाबतीत अनिकेत विश्वासराव आणि अंशुमन विचारे यांच्या व्यतिरिक्त सर्वच कलाकार साधारण वाटले.

गणेश (अनिकेत विश्वासराव) आणि कोमल (भाग्यश्री मोटे) यांच लग्न होतं. मात्र लग्नानंतर हनिमूनचा अनुभव हा थ्रिलिंग असावा या विचारातून दोघेही लग्नाच्या पहिल्याच रात्री घरातून पळून जातात. वाटेत त्यांना एक भला मोठा वाडा दिसतो. तिथे ते थांबायचं ठरवतात. त्याच वाड्यात असतं सुनील ऊर्फ सनम (प्रियदर्शन जाधव) याचं भूत. मरणापूर्वीची एक अतृप्त इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे सनमला अजूनही मोक्ष मिळालेला नसतो. त्याची ही इच्छा तो गणेशला सांगतो. सनमची ही इच्छा गणेश आणि कोमल पूर्ण करणार का, सनमला मोक्ष मिळणार का, हीच या चित्रपटाची कथा आहे. अवघ्या एका रात्रीत घडलेला हा प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सुरुवातीला चांगली पकड धरलेले चित्रपटाचे कथानक मध्यंतरानंतर थोडेसे संथ होत जाते. त्यामुळे चित्रपट रटाळ वाटू लागतो. कित्येक सीन्स हे अतिशयोक्ती वाटू लागतात. त्यातच प्रियदर्शनने साकारलेला भूत घाबरवणारा कमी तर ओव्हर अ‍ॅक्टींग केलेला जास्त वाटू लागतो.

- Advertisement -

राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ चित्रपटाची कथा राजीव एस. रुईया यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. चित्रपटात असलेली काही गाणी श्रवणीय आहेत. तर स्वाती शर्मा आणि नकाश अझीझ यांच्या आवाजातील ‘तू हाथ नको लावूस’ या गाण्यावर थिरकलेली अभिनेत्री मीरा जोशी भन्नाट वाटली आहे. तिला प्रियदर्शनचीही चांगली साथ मिळाली आहे. या गाण्याला राजू सरदार यांचे संगीत लाभले आहे. तर ‘मी तुझीच साजणा’ हे सिनेमातील दुसरे गाणे असून ते अनिकेत आणि भाग्यश्री यांच्यावर चित्रीत झालं आहे. स्वाती शर्मा यांनी हे गाणे गायले आहे. तर ‘जवळ ये ना’ हेदेखील रोमँटिक आणि ड्रिम साँग आहे. या गाण्याला स्वाती शर्मा आणि सुशांत दिवगीकर स्वरबद्ध केले आहे. या दोन्ही गाण्यांचे बोल अभय इनामदार यांनी लिहिले असून त्या गीतांना विवेक किर यांनी संगीतबद्ध केले आहे. मात्र चित्रपटातील ‘गंगे’ हे गाणं गरज नसताना घुसवलेलं वाटतं. एकूणच हा चित्रपट हॉरर वाटत नसून कॉमेडीदेखील हास्यापद वाटते. परंतु नवविवाहीत दाम्पत्यांना केवळ टीपी (टाईमपास) म्हणून किंवा अनिकेत विश्वासरावचे चाहते असाल तर एकदा हा चित्रपट पाहायला हरकत नाही.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -