जोडी तुझी माझी

कोणत्याही क्षेत्रात स्थिर व्हायचे म्हणजे सुरुवातीला मित्र, सहकारी, मार्गदर्शक म्हणून कोणाचातरी हात धरावा लागतो. एकत्र आलेले हे दोघे विचार आणि हेतू एकच असल्यामुळे पुढे ते एकत्रितपणे काम करण्याची तयारीही दाखवतात. कलेच्या प्रांतातही तसेच काहीसे चित्र असले तरी सर्वच जोडगोळीकडून सातत्य टिकवले जाईल याची खात्री देता येत नाही. काही समजुतीने बाहेर पडतात तर काहींना स्वतंत्रपणे काम करण्याची गरज वाटते. ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे यांची जोडी आपल्याला ज्ञात आहे. समीर विध्वंस-क्षितीज पटवर्धन या जोडीनेसुद्धा कलेच्या प्रांतात मानाचे स्थान मिळवलेले आहे. सलिलचा ‘वेडिंगचा सिनेमा’ आणि विध्वंसचा ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यात संदीप, क्षितीज सहभागी नाहीत. ‘जोडी तुझी माझी’ एका निर्मितीसाठी सुटली असेच म्हणावे लागेल.

Mumbai
Sandeep Khare & Salil Kulkarni

संगीताच्या बाबतीत विचार करायचा झाला तर दोन संगीतकार एकत्र आल्याने एका चांगल्या कलाकृतीची निर्मिती होते हे आजवरचे उदाहरण आहे. त्यामुळे कितीतरी जोड्या या निमित्ताने उदयाला आलेल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जोडीने संगीत देणार्‍या किंवा लेखन, दिग्दर्शन करणार्‍या कलाकारांची संख्या ही मोठी आहे. मराठीतही असे प्रयत्न झालेले आहेत. परंतु प्रेक्षकांनी दखल घ्यावी असा गाजावाजा मात्र झालेला नाही. अरुण-अनिल या संगीतकारांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. पुढे त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची गरज वाटली. अजय-अतुल यांनीसुद्धा एकत्रितपणे संगीत देण्याला महत्त्व दिलेले आहे. त्यातूनही अजय अन्य संगीतकारांकडेही गाताना दिसतो. जोडीने कोणतीही गोष्ट करणे म्हणजे ही लागलीच एकत्र येण्याची प्रक्रिया नसते. बर्‍याचवेळा हौसेखातर एकत्र यायचे, नवे काही करण्याच्या उद्देशाने वेळ द्यायचा आणि त्यातून एखादी कल्पना सुचली की जोडीने त्यातल्या कलेला फुलवायचे, त्याला मिळालेल्या प्रतिसादावर पुढे एकत्रितपणे काम करायचे ठरते. काही जोड्या यात यशस्वी होतात, तर काही सातत्य टिकवण्यात अपयशी ठरतात.

संगीतकार, गायक सलिल कुलकर्णी आणि कवी, गीतकार, गायक संदीप खरे यांची जोडी तशी आपल्याला नवीन नाही. कार्यक्रम सादर करण्यासाठी ही जोडी पुरेशी ठरलेली आहे. जिथे संगीताचा आणि सादरीकरणाचा संबंध येतो, तिथे या दोघांनी आपली हुकूमत दाखवलेली आहे. अनेक चित्रपटांना संगीतसाज चढवण्यात हे दोघे एकत्र आलेले आहेत. या दोघांचा सहभाग असलेले अल्बम रसिकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम रंगमंचावर अविष्कारित झाला, त्याला कारण म्हणजे या जोडीने पूर्वी सादर केलेल्या गाण्यांची लोकप्रियता हे सांगता येईल. भारतात, परदेशात जिथेजिथे म्हणून मराठी माणूस विखुरलेला आहे, तिथे या दोघांनी आपला कलाविष्कार एकत्रितपणे घडवलेला आहे. याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांना आपली कला स्वतंत्रपणे दाखवण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सलिलने ‘मधली सुट्टी’ चे सूत्रसंचलन, छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप’ चे परीक्षक याकडे लक्ष केंद्रित केले तर संदीपने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. टेलिस्कोप, स्पंदन, दमलेल्या बाबाची कहाणी यात आपले अभिनय दर्शन घडवले. संदीपने आपल्या लेखन, दिग्दर्शनात ‘वेडिंगचा सिनेमा’ या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. गीतकार कोण हे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवलेले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. संदीप सध्या ‘प्रेम कॉफी आणि शब्द काही’ या कार्यक्रमात गुंतलेला आहे. स्पृहा जोशी ही अभिनेत्री, कवयित्री त्याच्यासोबत आहे. पुढे सलिल-संदीप पुन्हा एकत्र काम करण्याची शक्यता आहे.

समीर विध्वंस आणि क्षितीज पटवर्धन या जोडीचे वैशिष्ट्य म्हणजे नाटक, चित्रपट या दोन्ही गोष्टींसाठी या दोघांनी बर्‍याचवेळा एकत्र काम केलेले आहे. ‘वाय झेड’, ‘टाईम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘लग्न पहावे करून’, ‘मला काही प्रॉब्लेम नाही’, ‘नवा गडी नवं राज्य’ या दोघांच्या कलाकृती सांगता येतील. एकत्रितपणे काम करणार्‍या या दोघांना आता स्वतंत्रपणे आपली कला दाखवण्याची संधी प्राप्त झालेली आहे. रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या चित्रपटासाठी क्षितिजने बर्‍याच जबाबदार्‍या पार पाडल्या होत्या. यातली व्यस्तता हे कारण की काय कोण जाणे पण समीरने झी स्टुडिओच्या सहकार्याने ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. इथे मात्र ही जोडी दिसलेली नाही. पण यातल्या गाण्यांचा जो प्रकाशन सोहळा पार पडला त्यावेळी मात्र क्षितीज आला होता. संवाद लेखन, गीत लेखन याची जबाबदारी विध्वंसने या चित्रपटासाठी दुसर्‍यावर सोपवलेली आहे. पूर्वी जोडीने एकत्र काम करता यावे यासाठी प्रतीक्षा केली जात होती, आता मात्र स्पर्धा वाढलेली आहे. जे आले ते स्वीकारायचे, त्यातली सिद्धता पटवून द्यायची. या कामाला वेग आल्यामुळे विचार न करता स्वतंत्रपणे काम स्वीकारणे वाढलेले आहे.

जोडी दिसली, जोडी फुटली
कलाकारांनी जोडीने काम केले पाहिजेत याचे दाखले कोणा व्यक्तीला द्यायचे झाले तर प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री यांचे नाव घेतले जात होते. त्यांची इतकी घनिष्ठ मैत्री की त्यांनी कुठल्याही प्रतिष्ठेच्या सोहळ्यात काम करायचे झाले तर दोघांनी त्याठिकाणी एकत्र जाणे पसंत केलेले आहे. मग तो कार्यक्रम मुलाखतीचा असो किंवा गप्पांचा असो. त्यांची एकत्रित मैफिल गाजलेली आहे. याच दोस्तीतून ‘हाय काय, नाय काय’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. ती फारशी काही टिकली नाही. पुढे प्रसादने ‘कच्चा लिंबू’ च्या निमित्ताने तर पुष्करने ‘उबुंटू’ च्या निमित्ताने स्वतंत्र प्रतिभा दाखवलेली आहे. अंकुश चौधरी-सचित पाटील हे दोघे ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी एकत्र आले होते. पुढे मात्र त्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याचे ठरवले. सचित हा चित्रपटाबरोबर मालिकेत दिसला तर अंकुशने ‘ नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून नायक म्हणून आपली इमेज अबाधित ठेवलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here