घरमनोरंजनपरफेक्ट प्लॅनिंग

परफेक्ट प्लॅनिंग

Subscribe

कामाचा व्याप वाढला की प्रत्येक कलाकाराला मदतनीस सेक्रेटरी यांची आवश्यकता वाटत असते. हिंदीत बरेचसे कलाकार आपल्या कामात या गोष्टीला महत्त्व देत असतात. काही मराठी कलाकारांनीही मदतनीस, सेक्रेटरी, पीआरओ नेमले असले तरी काही कलाकर स्वत:च परफेक्ट प्लॅनिंग करून आपल्या वर्षभरातील कामाचे नियोजन करत असतात. यात वेळकाळ, प्रामाणिकपणा यांना महत्त्व दिल्यामुळे त्यांच्या व्यस्ततेत फारशी अडचण आलेली दिसत नाही.

कलाकाराचे कार्यक्षेत्र फक्त अभिनयापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. जिथे मनोरंजन तिथे या कलाकारांनी सहभागी होण्याची तयारी दाखवलेली आहे. इतकेच काय तर नवे क्षेत्रही जाणून घेण्याचा कितीतरी कलाकारांनी प्रयत्न केलेला आहे. छोटा पडदा, मोठा पडदा हे भाग आता कोणत्याही कलाकारासाठी वेगळे राहिलेले नाहीत. जिथे आर्थिक उलाढाल होते तिथे या मराठी कलाकारांनी झेप घेतलेली आहे. अभिनयाच्या पलीकडे परिक्षक राहणे, मोठमोठ्या प्रतिष्ठेच्या सोहळ्यात कलाकार म्हणून सहभागी होणे, आपल्या मर्यादा लक्षात घेऊन आपली कला सादर करणे हे या कलाकारांनी वाढवलेले आहे. नृत्य, नाट्यप्रवेश या गोष्टी आपल्या पद्धतीने त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. या झाल्या स्टुडिओतल्या गोष्टी; पण ज्याची लोकप्रियता जास्त अशा कलाकारांना भारतात, भारताबाहेरही वेगवेगळ्या गोष्टींसाठी निमंत्रित केले गेलेले आहे. कलाकाराने समयसूचकता आणि सहकार्य करण्याची वृत्ती दाखवली तर कामाचा व्याप वाढतो हे काही कलाकारांना कळून चुकलेले आहे. परफेक्ट प्लॅनिंग हे त्यांच्या यशाचे मुख्य कारण सांगता येईल.

प्रत्येक कलाकार वर्षभर त्याहीपेक्षा अधिक वर्ष व्यस्त राहू शकतो इतका कामाचा व्याप या कलाक्षेत्रात वाढलेला आहे. महेश मांजरेकर यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत निर्माते, दिग्दर्शक, कलाकार या नात्याने संचार केलेला आहे. पुढली पाच वर्षे व्यस्त राहू शकेल इतक्या कामाचे नियोजन त्याने आत्तापासूनच केलेले आहे. ‘मराठी बीग बॉस’चे सूत्रसंचलन करत असताना मराठी नाटक, चित्रपट यांच्या निर्मितीला कसा वेळ द्यायचा याचे परफेक्ट प्लॅनिंग त्याच्याकडे आहे. हे करत असताना दुसर्‍याच्या निर्मितीत काम करण्यालाही तेवढेच प्राधान्य त्याने दिलेले आहे. त्याचा ‘पु. ल. व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट या ४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. मधल्या काळात ‘ओवी’ या नाटकाला पूर्ण मार्गी लावले. ‘मुळशी पॅटर्न’मध्ये कलाकार म्हणून सहभागी झाला. ‘पु. ल. व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होत आहे. त्याची पूर्वार्ध, उत्तरार्ध अशा दोन भागांत विभागणी केलेली आहे. दुसरा भाग हा पहिल्या भागाच्या पुढची कथा असणार आहे. त्यामुळे स्वतंत्र कथा म्हणून पुढचा भाग पहाता येणार नाही. दुसरा भाग हा फेब्रुवारीच्या ८ तारखेला प्रदर्शित होत आहे. ही सगळी परफेक्ट प्लॅनिंगची लक्षणे सांगता येतील. या चित्रपटाचे प्रमोशनही त्याच्या इच्छेप्रमाणे न टाकता निमित्त घेऊनच केल्याचे पहायला मिळते. त्यातून त्याने इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया यांच्यासाठी वेगळा वेळ राखून ठेवलेला आहे हे वेगळे सांगायला नको.

- Advertisement -

अमृता खानविलकर, नृत्यांगणा सोनाली कुलकर्णी यांच्याबाबतीतही हेच सांगता येईल. अभिनयाबरोबर नृत्याचीही समज असलेल्या या दोन तारका सध्या व्यस्त आहेत. एकीकडे चित्रपट, दुसरीकडे रिअ‍ॅलिटी शो यांना वेळ देताना भारतात, भारताबाहेर होणार्‍या भव्यदिव्य सोहळ्यात या तारकांनी नृत्यकलेलाही प्राधान्य दिलेले आहे. अमृताचा मराठीबरोबर हिंदीतही संचार असल्यामुळे सामाजिक उपक्रमात तिला आवर्जून बोलावले जाते. ‘जागृती पालक’ ही ठाण्याची संस्था विशेष मुलांसाठी काम करते. अशा या मुलांसमोर अमृताने येऊन गप्पा माराव्यात, त्यांचा आनंद द्विगुणीत करावा यासाठी या संस्थेने ख्रिसमसचे निमित्ताने तिला बोलावले होते. प्रत्येकवेळी सहभागी व्हायचे म्हणजे मानधनाचा विचार झालाच पाहिजे असे नाही अशाही ज्या अभिनेत्री आहेत त्यांनी या संस्थेला वेळ दिला होता. अर्थात परफेक्ट प्लॅनिंग असेल तर आर्थिक उलाढालीबरोबर मानसिक समाधान देणार्‍या गोष्टीही करता येतात हे अमृताने पटवून दिलेले आहे. कामाच्या नियोजनात परफेक्टपणा असावा यासाठी तिनेसुद्धा जनसंपर्क अधिकारी नेमलेला आहे. मुक्ता बर्वे हिचासुद्धा कामाचा व्याप वाढलेला आहे. घेतलेले कार्यक्रम वेळच्यावेळी निभावले जावेत यासाठी तिनेसुद्धा मदतनीस नेमलेला आहे.

सतीश राजवाडे याचासुद्धा मनोरंजन करणार्‍या माध्यमात सतत संचार राहिलेला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असा प्रवास करत आता रिअ‍ॅलिटी शोचा परिक्षक शिवाय ‘परफेक्ट मर्डर’ या नाटकात काम करताना तो दिसतो आहे. या सगळ्या गोष्टी परफेक्ट प्लॅनिंग केल्याशिवाय होत नाहीत. ती सध्या काय करते, आपलं माणूस हे त्याचे अलीकडचे चित्रपट आहेत. त्याच्या नावावर आणखीन एका चित्रपटाची नोंद झालेली आहे ती म्हणजे ‘मुंबई-पुणे-मुंबई’ याचे तीन भाग प्रेक्षकांच्या समोर आलेले आहेत. आता चौथ्या भागाची तयारी त्याने केलेली आहे. पहिल्या भागात मैत्री, दुसर्‍या भागात प्रेम आणि तिसर्‍या भागात विवाहानंतर घडलेल्या गोष्टी त्याने आणलेल्या आहेत. एखाद्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतात म्हटल्यानंतर खणखणीत नाणं म्हणून तो काहीही करु शकला असता. कलेशी इमान राखत त्याने हे चित्रपट पूर्ण केलेले आहेत. त्याच्या व्यस्ततेलासुद्धा परफेक्ट प्लॅनिंग हेच नाव देता येईल.

- Advertisement -

महेश, अमृता, सतीश यांच्या अलीकडच्या कामाचा तपशील देऊन हे कसे परफेक्ट प्लॅनर आहेत हे सांगितले. तसे सर्वच कलाकार असतात. ज्या वेळी काही नसतं त्यावेळी स्वत:तल्या गुणांना प्राधान्य देणारे कलाकार आहेत त्यात प्रशांत दामले, अभिजित साटम अशा कितीतरी कलाकारांची नावे घेता येतील. अभिजित कलाकार, दिग्दर्शक म्हणून जेवढा परिचयाचा आहे तेवढाच तो निर्माता म्हणूनही परिचयाचा आहे. त्याने स्वत:च्या कामाचे स्वरुप निश्चित केलेले आहे. कलाकार म्हणून निमंत्रित केल्यानंतर त्याचा कालावधी लक्षात घेऊन त्याने आपल्यातल्या अभिनेत्याला ‘मी शिवाजी पार्क’, ‘लगी तो छगी’ या चित्रपटात आणि काही मालिकेत गुंतवून घेतले होते. ‘स्ट्रॉबेरी’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ या नाटकांची निर्मिती केल्यानंतर ‘बाय बाय बायको’ हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणले होते. त्याचे काही प्रयोगही झाले होते. कलाकार अन्य ठिकाणी गुंतले आहेत. प्रयोग होत नाहीत म्हणताना त्याने काही दिवसांतच ‘एपिक गडबड’ हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणले. हे परफेक्ट प्लॅनिंगचे लक्षण आहे. प्रशांत दामले सतत डायरीच बाळगून असतात. मनोरंजन माध्यमाला वेळ देत असताना त्यांचे आपल्या फॅन क्लबकडेही तेवढेच लक्ष असते. कधी, कुठले नाटक कोणा कलाकाराबरोबर करायचे, अन्य कुठल्या नाटकाला प्राधान्य द्यायचे याचे अचूक प्लॅनिंग करणारा तोही एक कलावंत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -