‘रंग माझा वेगळा’ कथानकात नवं वळण; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री!

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अभिज्ञा भावे ही अभिनेत्री गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या माध्यमांत काम करते आहे. आधी ती नाटकात होती. त्यातून पुढे ती मालिकेत आली. सुबोध भावेच्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत तिच्या कामाची तारीफ झाली. पुढे तिने पुन्हा एकदा नाटक केलं. त्यानंतर अभिज्ञा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करायला सज्ज झाली आहे.

लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. कार्तिक आणि तनुजा कॉलेज फ्रेण्ड्स. मात्र कॉलेजनंतर या दोघांची भेट कधी झाली नाही. आता मात्र एका अपघातानेच या दोघांची भेट घडवून आणली आहे. तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पहाणं देखील उत्सुकतेचं असणार आहे.

 

एकीकडे सौंदर्या काळ्या रंगाचा द्वेष का करते? या गोष्टीचा छडा लावण्यासाठी दीपा कार्तिक जीवाचं रान करत आहेत. अशातच तनुजाच्या येण्याने हा गुंता वाढणार की, सुटणार या प्रश्नांची उत्तरं रंग माझा वेगळाच्या पुढील भागांमधून लवकरच उलगडतील. अभिज्ञाची या मालिकेतली भूमिकाही तितकीच रंजक असणार आहे. तिच्या आगमनाचा ट्रॅक पाहता आता ती या मालिकेला आणखी गती तर देईलच शिवाय, कथानकालाही नवं वळण मिळेल यात शंका नाही. त्यासाठी स्टार प्रवाहवर पाहा ‘रंग माझा वेगळा’ दररोज रात्री ८ वाजता नेमके काय घडणार या मालिकेत.


Corona: IPL नंतर चित्रपटांचे शुटिंगही दुबईत! कतरिना कैफचं शूट होणार अबुधाबीत