प्रिया – उमेशला ‘आणि काय हवं?’

Mumbai

सिटी ऑफ ड्रीम्, या वेबसिरीजमुळे प्रिया बापटने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. लवकरच प्रिया आणखी एका वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यावेळी प्रियाबरोबर उमेश कामतही या वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. ‘टाइम प्लीज’ या चित्रपटामुळे या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये विशेष हिट झाली होती. या चित्रपटानंतर या दोघांनीही स्वतंत्रपणे अनेक वेगवेगळे चित्रपट केले. या काळात प्रियाने डिजिटल क्षेत्रातही पदार्पण केलं. मात्र या दोघांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.

नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही जोडी पहिल्यांदाच एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आणि काय हवं?… ‘असं त्यांच्या आगामी वेब सीरिजचं नाव असून या दोघांही पहिली सीरिज असणार आहे. विशेष म्हणजे उमेशची ही पहिली सीरिज असून प्रियाची ही दुसरी सिरीज असणार आहे.

दरम्यान, प्रिया आणि उमेश त्यांच्या या आगामी प्रोजेक्टसाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही या सीरिजचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये प्रिया नेहमीप्रमाणे खट्याळ अंदाजात दिसत असून उमेश मात्र कूल लूकमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची ही नवी सीरिज भन्नाट असणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. या सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे.