राघवनचे गडद सिनेमॅटिक विश्व : भाग २

गेल्या महिन्याभरातील तीन लेखांच्या अनुषंगाने श्रीराम राघवनच्या चित्रपटांवर अनपेक्षितपणे लेखमालिका तयार झाली आहे. राघवनच्या एकूण फिल्मोग्राफीवरील भाष्याच्या निमित्ताने तिचा समारोप करणार्‍या लेखाचा हा दुसरा भाग.

Mumbai
सनेमॅटिक विश्व

दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या एकूणच फिल्मोग्राफीकडे एकत्रितपणे पाहिल्यास त्याच्या दिग्दर्शकीय शैलीचं विश्लेषण करणं अधिक सोपं होतं. त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘एक हसीना थी’, नंतरचे ‘जॉनी गद्दार’ आणि ‘बदलापूर’, गेल्या वर्षीचा ‘अंधाधून’ किंवा अगदी त्याच्याच या इतर चित्रपटांच्या तुलनेत काहीसा कमकुवत असणारा ‘एजंट विनोद’ असे त्याचे सर्वच चित्रपट क्राईम/सस्पेन्स-थ्रिलरच्या कोंदणाखाली खरंतर मानवी भावभावना आणि मानसिकतेचा आढावा घेताना दिसतात. अशावेळी ‘एक हसीना थी’, ‘बदलापूर’मधील सूड; ‘जॉनी गद्दार’, ‘अंधाधून’मधील लालसा अशा भावना पुढे वाढून ठेवलेल्या घटनाक्रमासाठी, तसेच त्या त्या चित्रपटातील पात्रांनी आपलं आयुष्य सुकर होण्यासाठी केलेल्या कृतींसाठी केवळ एक उत्प्रेरक म्हणून काम करतात. ज्याद्वारे राघवन आणि त्याचे सहलेखक मानवी स्वभावाला गडद बाजूंचे अन्वेषण करताना दिसतात. ज्यातून तो सदर चित्रपटांच्या लांबीदरम्यान मध्यवर्ती पात्रांमध्ये होणारे बदल टिपतो.

परिणामी त्याच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये मांडणीच्या पातळीवर (माझ्या मते हेतूपुरस्सररित्या केलेली) एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे त्याचे बरेच (बरेचही कसले म्हणा, इनमीन पाच तर आहेत!) चित्रपट न्यूनतम, वास्तववादी दृष्टिकोन असलेल्या स्तरावर सुरू होतात, तर पुढे जाऊन पात्रांच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांनंतर त्यांचं वास्तव काहीसं ‘हाइटन्ड रिअ‍ॅलिटी’ स्वरूपाचं बनतं. त्या चित्रपटाच्या विश्वातील घटनाक्रमाच्या आणि पात्रांच्या मानसिकतेच्या स्तरावरील गोंधळ वाढून चित्रपटाला एक केऑटिक स्वरूप प्राप्त होतं. जे अगदी ‘एक हसीना थी’पासून ते ‘अंधाधून’पर्यंत बहुतांशी ठिकाणी जाणवतं. केऑस हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि राघवनला तो नियंत्रितपणे निर्माण केलेल्या गोंधळाच्या रूपात कसा समोर आणायचा हे बरोबर ठाऊक आहे. ज्यामुळे त्याच्या चित्रपटातील उत्तरार्धाने अनियंत्रित गोंधळाचा आभास निर्माण होणं कुणाला त्यातील उणीव वाटतं, तर कुणाला चमत्कारिक वाटतं.

थरार हा राघवनच्या इतर चित्रपटांप्रमाणे महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यावर जेम्स हॅडली चेस किंवा तत्सम रहस्य कथा-कादंबर्‍या लिहिणार्‍या लोकांचा प्रभाव असला तरी त्याच्या चित्रपटात मात्र थरार हा कायमच पुढाकार घेतो. ज्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बर्‍याचदा तो प्रेक्षकाला चित्रपटातील पात्रांहून अधिकची माहिती पुरवून आपले सगळे पत्ते समोर ठेवतो. पण खरंच त्याचे सगळे पत्ते समोर असतात का, तर नाही. कारण मुळात रहस्याचा शोध घेणं हे पात्रांच्या दृष्टीने महत्त्वाचं असलं तरी प्रेक्षकांच्या दृष्टीने त्यातील थरार महत्त्वाचा ठरतो आणि थराराबाबत राघवनला कमी लेखण्याची चूक करण्यात काहीच अर्थ नसतो. एखादी कथा किंवा तिच्यातील घटनाक्रम कसा फुलवत न्यायचा हे त्याला बरोबर जमतं. मग ‘एक हसीना थी’मध्ये एक क्षण असा येतो की त्यानंतर चित्रपट प्रियकराने डाग दिल्यावर सूड घेणार्‍या नायिकेची कथा म्हणून वाटचाल करू लागतो. ‘जॉनी गद्दार’देखील जी वाट निवडतो ती बर्‍याच मूलभूत प्रकारे पुढे जाणारी असली तरी त्यातही थरार हा महत्त्वाचा भाग ठरतो. त्यामुळेच पुढे जाऊन आलेले त्याचे ‘बदलापूर’ आणि ‘अंधाधून’ हे चित्रपटही थ्रिलर म्हणून समकालीन चित्रपटांतून वेगळे आणि उजवे ठरतात.

अर्थात, राघवनचं विजय आनंदपासून ते ‘ला ला लँड’सारखा नवक्लासिक तयार करणार्‍या डॅमियन शझेलपासून प्रेरणा घेणं किंवा त्यांच्या चित्रपटांच्या प्रेमात पडणं आणि त्यांना मानवंदना देणं किंवा आपल्या चित्रपटांना थरारक बनवणं यापेक्षा अधिक महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे त्याच्या चित्रपटातील पात्रांची उभारणी. कारण, वर उल्लेखल्याप्रमाणे चित्रपटाच्या लांबीदरम्यान त्यांचा होणारा विकास तर तसा अपेक्षितच आहे. पण राघवन हा बदल कसा घडवून आणतो किंवा त्यांच्या मानवी भावभावनांचा किती खोलवर जाऊन विचार करतो हे अधिक महत्त्वाचं ठरतं. ज्यामुळे ‘एक हसीना’मधील सारिका (मातोंडकर), बदलापूरमधील रघु (धवन) किंवा अंधाधूनमधील आकाश (खुराना) वा (तब्बू) ही पात्रं केवळ गुन्हेगारी जगताशी संबंध आल्यामुळे चांगली वा वाईट ठरत नाहीत. तर त्यांच्या स्वभावातील गडदपणा, त्यांच्या विश्वातील नैतिक-अनैतिकता आणि त्यासंबंधीच्या त्यांच्या कल्पना त्यांना गडद पैलू प्राप्त करून देतात.

असं फार क्वचित होतं की एखाद्या थरारपटातील पात्रं किंवा तो एकूणच चित्रपट एखाद्या कृत्याच्या नैतिकतेच्या अंगांनी विचार करतात किंवा प्रेक्षकांना तसं करायला प्रवृत्त करतात. राघवनचे चित्रपट कमी अधिक फरकाने याच प्रकारात मोडतात. ते केवळ गुन्ह्याचा समावेश असल्याने गडद बनत नाहीत, तर त्यातील पात्रांच्या हरकतींमुळे, त्यांच्या स्वभावामुळे गडद बनतात. बदलापूर तर ‘सूड’ या मानवी भावनेच्या मुळाशी जाऊन तिचा विचार करू पाहतो. ‘एक हसीना थी’, ‘जॉनी गद्दार’ आणि ‘अंधाधून’मध्ये मधल्या काळात अनेक अपेक्षित-अनपेक्षित घटना घडून जणू आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण होतं. अगदी त्याच्या तुलनेनं कमकुवत असलेल्या ‘एजंट विनोद’मध्येही गडद, नो-नॉन्सेन्स पात्रं आढळतीलच आणि हीच तर राघवनची खासियत आहे. हे त्याच्या कल्पनेतील गडद सिनेमॅटिक विश्व आहे आणि या क्रूर विश्वात अनपेक्षित घटनाक्रम, नैतिक-अनैतिकतेचं द्वंद्व आणि जटिल, ग्रे पात्रांना महत्त्व आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here