राघवनचे गडद सिनेमॅटिक विश्व : भाग १

गेल्या महिन्याभरातील तीन लेखांच्या अनुषंगाने श्रीराम राघवनच्या चित्रपटांवर अनपेक्षितपणे लेखमालिका तयार झाली आहे. राघवनच्या एकूण फिल्मोग्राफीवरील भाष्याच्या निमित्ताने तिचा समारोप करणार्‍या लेखाचा हा पहिला भाग.

Mumbai
Raghavan

जागतिक स्तरावर चित्रपट या माध्यमाची सुरुवात होत असतानाच भारतामध्ये हे माध्यम अगदीच लवकर १९१० च्या दशकातच येऊन पोहोचले. असे असले तरी पुढे मात्र मर्यादित कालखंडापुरत्या दिसलेल्या समांतर किंवा नवसमांतरचळवळींचा अपवाद वगळता या माध्यमात जागतिक पातळीवर घडून येत होते तसे फिल्म न्वार किंवा एक्सप्रेशनिजमच्या धर्तीवरील प्रयोग क्वचितच दिसून आले. नव्वदच्या दशकात व्यावसायिक चित्रपटांचे वाढते प्रमाण आणि वर्चस्व यांमुळे समांतर चित्रपटांची चळवळ स्थगित झाली. या दशकाच्या शेवटी मात्र राम गोपाल वर्मा आणि त्यासोबत चित्रपटसृष्टीत आलेल्या अनुराग कश्यपसारख्या लोकांचे फिल्म न्वारचा आशय-विषय आणि शैलीचा प्रभाव असलेले चित्रपट दिसून यायला सुरुवात झाली. परिणामी एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच भारतीय चित्रपटसृष्टीत आर्ट हाऊस आणि इंडिपेंडंट चित्रपट प्रकारांची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. याच दशकात वर्माच्या ‘फॅक्टरी’ नामक प्रॉडक्शन कंपनीने काही काळ का होईना, पण उत्तम चित्रपटांची निर्मिती केली. दहा पंधरा वर्षांपूर्वी रामू आणि फॅक्टरी ही दोन्ही नावे म्हणजे काहीतरी भन्नाट गोष्ट समोर आणण्यासाठी मानली जात होती. ‘अ फॅक्टरी प्रॉडक्ट’ असे म्हणत समोर आलेल्या ‘एक हसीना थी’च्या निमित्ताने चित्रपटसृष्टीत आलेला श्रीराम राघवन हा अशाच प्रकारे रामूने समोर आणलेल्या कलाकारांपैकी एक होता.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात ‘एफटीआयआय’चा माजी विद्यार्थी असलेला श्रीराम राघवन हा भारतीय चित्रपट पाहत वाढलेला, पण सोबतच जागतिक चित्रपटांच्या पातळीची संवेदनशीलता असलेला आहे. त्यामुळे त्याच्या लिखाणावर आणि दिग्दर्शनावर असलेला प्रभाव हा लोकप्रिय भारतीय चित्रपट आणि लोकप्रिय तसेच समीक्षकांनी गौरवलेले जागतिक स्तरावरील चित्रपट अशा दुहेरी स्वरूपाचा आहे. अगदी त्याची ‘एफटीआयआय’मध्ये असताना बनवलेली डिप्लोमा फिल्म, ‘द एट कॉलम अफेयर’देखील अशाच प्रकारातील आहे. तिच्यावर फ्रेंच न्यू वेव्हचा थेट प्रभाव आहे. शिवाय, याला दुजोरा म्हणून ती सुरू होतानाच जॉर्ज फ्रँजूचं एक वाक्यही दिसतेच. एकूणच, राघवनबाबत बोलायचे झाल्यास त्यावरील प्रभाव, त्या प्रभावांचे त्याच्या चित्रपटांमध्ये अनेकविध चित्रपटकर्त्यांना, लेखकांना दिलेल्या मानवंदनेत झालेले रूपांतर या गोष्टी टाळून जमणार नाही.

राघवनवरील भारतीय चित्रपटांच्या प्रभावांमध्ये, त्याने मोठे होत असताना पाहिलेल्या सत्तरच्या दशकातील सिनेमाचा प्रभाव न पुसता येणारा आहे. त्यामुळेच त्याचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘एक हसीना थी’ किंवा ‘जॉनी गद्दार’ यांच्यावर दृश्य मांडणीच्या विशिष्ट शैलीच्या रूपात सत्तरच्या दशकात भारतीय चित्रपटांच्या छटा दिसून येतात. शिवाय, ‘जॉनी गद्दार’ तर त्या दशकाला दिलेली थेट मानवंदनाच आहे. याखेरीज हा आणि ‘बदलापूर’ (२०१३), ‘अंधाधुन’ (२०१८) हे त्याचे पुढील चित्रपटही पल्प, लोकप्रिय आणि समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपट आणि पुस्तकांच्या चांगल्या गुणधर्मांची प्रशंसा करणारे आहेत आणि हे सगळे काही दृश्यांची किंवा कथेची उचलेगिरी नव्हे, तर सदर कलाकृतींप्रतीची प्रेमभावना, त्यांच्यातील कलात्मक दृष्टीकोनाची जाण आणि कदर यांच्यातून आलेले असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाटते. उदाहरणार्थ, जागतिक स्तरावर क्वेंटिन टॅरंटिनो किंवा रॉबर्ट रॉड्रिग्जसारखे दिग्दर्शक अशा प्रेरणा घेत त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये किती सुंदररित्या मांडतात हे पहावे. त्याकरिता या दोनही दिग्दर्शकांचे चित्रपट आवर्जून पहावेत, तर सांगायचा मुद्दा हा की, राघवनचे चित्रपटही अनेक पातळ्यांवर अशाच प्रकारचे ठरतात. जे त्याच्या प्रादेशिक, भारतीय आणि एकूणच जागतिक चित्रपटांविषयीच्या प्रेमभावनेच्या प्रौढ संवेदनांचे एक समर्पक मूर्त रूप आहेत.

त्यामुळेच साधारणतः नव्वदोत्तर दशकांत भारतीय चित्रपटसृष्टीत ‘फिल्म न्वार’च्या धर्तीवर, आणि त्यांच्या प्रभावातून तयार झालेल्या इंडिपेन्डन्ट अर्थात इंडी प्रकारातील रामू-कश्यप आदी लोकांच्या चित्रपटांच्या यादीत राघवनचे चित्रपटही सामील होतात. ज्याप्रमाणे कश्यपवर मार्टिन स्कॉर्सेसी-क्वेंटिन टॅरंटिनो अशा चित्रपकर्त्यांच्या शैलीचा आणि कामाचा प्रभाव दिसून येतो, अगदी त्याच धर्तीवर राघवनवर विजय आनंदसारख्या भारतीय आणि फ्रेंच न्यू वेव्ह, फिल्म न्वारमधील चित्रपटकर्त्यांसोबतच क्वेंटिन टॅरंटिनो-रॉबर्ट रॉड्रिग्ज या तिथल्या निओ-न्वार, इंडी चित्रपट चळवळीच्या प्रणेत्यांचा प्रभाव दिसतो. इतका की, ‘जॉनी गद्दार’ चित्रित करत असताना तो रॉड्रिग्जच्या ‘सिन सिटी’प्रमाणे (२००५) मुख्यत्वे कृष्ण-धवल स्वरूपात चित्रित करण्याचा आपला मानस होता असे राघवन नंतर बोलून दाखवतो. याचेच रूप म्हणून त्याचा मूळ चित्रपट जरी पूर्णतः कृष्ण-धवल नसला तरी त्यातील लाल रंगाचा वापर ‘सिन सिटी’च्या धर्तीवर पडदा व्यापून टाकणार्‍या स्वरूपात येतोच. राघवनचे हेच हाडाचे सिनेप्रेमी असणे त्याला त्याची एक ठळकपणे वैशिष्ठ्यपूर्ण असलेली शैली प्रदान करत त्याला सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेला काही उत्तम चित्रपटकर्त्यांच्या रांगेत नेऊन बसवते, एवढे मात्र नक्कीच म्हणता येईल.