घरमनोरंजनहरहुन्नरी कलाकारांचे होते कुरुप वेडे

हरहुन्नरी कलाकारांचे होते कुरुप वेडे

Subscribe

संजय नार्वेकरने मराठी, हिंदी चित्रपटात काम करून स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. हे करत असताना प्रथम नाटक आणि नंतर इतर गोष्टी असा क्रम त्याने दिला आहे. गेल्या वीस वर्षांचा मागोवा घेतला तर ज्या कलाकारांनी नाटकाला अधिक वेळ दिला आहे, त्यात संजयचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. खरतर जसजशी वर्षे लोटली जातात, तसतसे कलाकाराच्या भूमिका निवडीमध्ये बदल होतो. संजयने गंभीर नाटके केली असली तरी त्यातसुद्धा विनोदी व्यक्तीमत्त्व कसे दिसेल हे त्याने पाहिले आहे. भूमिका साधी सरळ असते पण त्यात स्वत:ची अशी चपळता आणून भूमिका टाळ्या घेणारी कशी होईल हे त्याने पाहिले आहे. ऑल द बेस्टपासून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंत त्याने कायम ठेवला आहे. नाटकाला आवश्यक असणारी ऊर्जा त्याने तसूभरही कमी होऊ दिलेली नाही. राजेश देशपांडे लिखित, दिग्दर्शित होते कुरुप वेडे या नाटकात त्याचा प्रयत्य येतो.

रंगमंचावर गंभीर, सामाजिक जाणिवेची, प्रबोधन करणारी नाटके सादर केली जात असली तरी प्रेक्षकांचा कल हा विनोदी नाटकांकडे जास्त आहे. त्यामुळे बरेचसे निर्माते विनोदी नाटकाची निर्मिती करताना दिसतात. काही वर्षांपूर्वीची नाटके पाहिल्यानंतर निव्वळ करमणूक करणे हा हेतू दिसत होता, पण अलीकडच्या नाटकात विनोदाबरोबर थोडेसे शहाणपणाचेही सल्ले दिले जात असल्याचे पहायला मिळते. व्ह्यॅक्यूम क्लीनर, चल तुझी सीट पक्की, व्हाय सो गंभीर, साखर खाल्लेला माणूस अशी कितीतरी नाटके सांगता येतील. सांगायला ही नाटके विनोदी असली तरी त्याचा शेवट काहीसा संदेश देणारा असतो. होते कुरुप वेडे या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन राजेशने केले आहे. प्रत्येक माणसामध्ये एक न्यूनगंड दडलेला असतो. आजुबाजूला वावरणारे मित्र-मैत्रिणी, इतकेच काय तर कुटुंब सदस्यही व्यक्तिमत्त्वातील या तफावतीची जाणीव प्रत्येकवेळी करून देत असतात. विनोदाने केलेले हे भाष्य समोरच्या माणसाच्या मनावर किती आघात करू शकते याचा विचार फारसा होत नाही. यातून प्रगती होण्यापेक्षा त्या व्यक्तीचा हुरूप हरवल्याचे अधिक पहायला मिळते. होते कुरुप वेडे हे नाटक अशाच विषयाचे असून, सर्वच कलाकारांनी विनोदातून काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

राजहंस कुसरुप याचा पत्नी, मुलगा असा छोटा परिवार आहे. आपल्या ठेंगण्या बांध्याच्या गव्हाळ वर्णाचा याचा त्याला त्रास होत आहे. आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसत नाही, आपला प्रभाव पडत नाही याने तो कासावीस झालेला आहे. अशा स्थितीत प्रसन्न प्रसादे नावाचा सेल्समन त्यांच्या घरात प्रवेश करतो. ठरावीक औषध घेतल्याने व्यक्तिमत्त्वाचा कायापालट होतो, तुम्ही सुंदर दिसायला लागता असे तो सांगतो. राजहंस या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवत नाही. त्यातूनही अनेक प्रात्यक्षिके दाखविल्यानंतर राजहंसमध्ये बदल झालेला दिसतो. प्रसन्न प्रसादे याचे व्यक्तिमत्त्व देखणे आणि अनेक तरुणींना भुरळ पाडणारे असते. राजहंसच्या मनाप्रमाणे प्रसन्नच्या व्यक्तिमत्त्वात तो कायापालट करतो. वरून दिसणारे रूप हे प्रसन्नसारखे असले तरी त्याची होणारी हालचाल, बोलणे-चालणे या सर्व गोष्टी राजहंससारख्याच असतात. त्यामुळे घरात प्रसन्न हा राजहंस म्हणून वावरत असतो, तर राजहंस हा प्रसन्न म्हणून वावरत असतो. दोघांसाठी या सुखद गोष्टी असल्या तरी दोन्ही कुटुंबांना नाहक त्रास देणार्‍या ठरतात. राजहंस याची पत्नी मदनिकाला आपला खरा पती कोण हे ठरवणे अवघड जाते. मुलगा स्वरूपही याच विवंचनेत पडलेला आहे. मदनिका रूप बदललेल्या प्रसन्नला आपला पती मानते. तो कसा भुरटा आहे हे प्रसन्नचे रूप घेऊन वावरत असलेला राजहंस पटवून देत असतो. माणसाला निसर्गत: जे रूप मिळालेले आहे, त्याचा स्वीकार करा आणि निरामयी जीवन जगा, असे सांगणारे हे नाटक दिग्दर्शकाने विनोदी ढंगात सादर केलेले आहे.

- Advertisement -

राजहंस कुसरुप ही व्यक्तीरेखा संजय नार्वेकर या अभिनेत्याने साकारली आहे. झालेला गोंधळ निस्तरायचा म्हणजे सावधगिरीने बोलणे आले, चपळता आली, तेवढाच प्रभावी अभिनय आला. या सर्व गोष्टी संजयने भूमिकेत आणून नाटकाला आवश्यक असलेला राजहंस थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. कोणतीही उसंत न घेता, श्वासात फारसे अंतर न ठेवता एका प्रसंगात पुन्हा संपूर्ण कथा सांगण्याचा केलेला प्रयत्न प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतो. संजयबरोबर या नाटकातली सर्वाधिक लक्षवेधी ठरणारी कोणती कलावती असेल तर ती मदनिका साकार करणारी शलाका पवार. सहज, उत्स्फूर्त ही तिच्या भूमिकेची खासियत आहे. फक्त ती अभिनयातूनच नाही तर देहबोलीतूनही ती छान व्यक्त करते. संजयबरोबर खास तिच्या या भूमिकेसाठी एकदा हे नाटक पहायला काहीच हरकत नाही. प्रसन्न प्रसादेच्या व्यक्तीरेखेत नयन जाधव, स्वरूपच्या व्यक्तीरेखेत नितीन जाधव यांनी आपल्या भूमिकेची जी काळजी घ्यायला हवी ती उत्तम घेतलेली आहे. यांच्याशिवाय या नाटकात भरत सावले, मिनाक्षी जोशी, कल्पेश बाविस्कर हे हरहुन्नरी कलाकार पुष्कळ धमाल करतात. राजेशने लेखन, दिग्दर्शनाबरोबर गाणीही लिहिलेली आहेत जी प्रचलित विषयाला आणि कथेला अनुसरून आहेत. त्याला अमीर हडकर याचे संगीत लाभलेले आहे. नाटकात शब्दावरून विनोद आणि त्याचा अनर्थ हा प्रयत्न जास्त झालेला आहे, तो मोह आवरायला हवा होता. संदेश बेंद्रे याने नेपथ्यातून काही कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो फारसा यशस्वी झालेला नाही. शितल तळपदे यांनी या नाटकासाठी प्रकाश योजना केलेली आहे. दादासाहेब पोते हे या नाटकाचे निर्माते आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -