Sushant Sucide Case : रिया कुटुंबियांसह पसार? पण तीचे वकिल म्हणतात…!

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिस मुंबईत तपासासाठी आले आहेत. पण सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने कुटुंबीयांसोबत गुपचूप पलायन केल्याची चर्चा होती. मात्र रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. काल बिहार पोलीस रियाची चौकशी करण्याकरता तिच्या मुंबईतील घराकडे गेले असता रिया तिथे नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे रियाने पळ काढला अशी चर्चा सुरू झाली होती.

रिया चक्रवर्तीने पलायन केलेलं नाही, पोलीस जेव्हा रियाला बोलावतात तेव्हा ती त्यांना तपासात सहकार्य करत आहे, अशी माहिती मानशिंदे यांनी ‘ई टाइम्स’ला बोलताना दिली. रिया गायब असल्याची चर्चा खोटी आहे. या आधी मुंबई पोलिसांनी तिचा जवाब नोंदवला आहे. बिहार पोलिसांकडून तिला कोणत्याच प्रकारची नोटीस किंवा समन्स मिळाले नाही. या खटल्याची चौकशी करण्याचा त्यांना अधिकार नाही. रियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तिने या खटल्याची मुंबईत बदली करण्याची मागणी केली आहे, असे ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी घर सोडून गेली

रिया घरी नसल्याचे समजताच पोलिसांनी इमारतीच्या मॅनेजर आणि अन्य सदस्यांकडे रियाची चौकशी केली. यात रिया काही दिवसांपूर्वीच मध्यरात्री कुटुंबीयांसोबत घर सोडून गेल्याचे इमारतीच्या मॅनेजरने सांगितले. दोन-तीन दिवसांपूर्वीच रिया मध्यरात्री तिच्या कुटुंबीयांसोबत घर सोडून गेली. यावेळी त्यांच्याकडे मोठ-मोठ्या बॅग्सदेखील होत्या. ते एका निळ्या रंगाच्या गाडीतून निघून गेले. सुशांत अनेक वेळा रियाच्या घरी यायचा. मात्र आत्महत्या करण्याच्या काही काळापूर्वी त्याचे येणे-जाणे कमी झाले होते, असेही त्या मॅनेजरने सांगितले.

सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. यात रियाने पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी राजकारण तापले असून बिहार पोलिसांनी आक्रमक तपास सुरू केला असताना हा तपास सीबीआयकडे देण्यावरून राज्य सरकारवर दबाव वाढत चालला आहे.


हे ही वाचा – डोंबिवली पुन्हा एकदा हादरली, एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट!