‘सेक्रेड गेम्स २’मुळे दुबईतल्या माणसाची वाट लागली, नेटफ्लीक्सने माफी मागितली!

नेटफ्लीक्सवरच्या सेक्रेड गेम्स २ या वेबसीरीजमुळे दुबईत राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीच्या आयुष्याची चांगलीच वाट लागली आहे.

Mumbai
sacred games
सेक्रेड गेम्स

नेटफ्लीक्सवरच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजचा पहिला सीजन २०१८मध्ये संपला आणि तेव्हापासूनच सगळ्यांना एकच प्रश्न सतावत होता. तो म्हणजे ‘ये त्रिपाठी कैसे बचेगा?’ आणि ‘गायतोंडे का तिसरा बाप कौन है’! पण ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीजन १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला आणि पहिल्याच एपिसोडमुळे दुबईत राहणाऱ्या एका माणसाची पार वाट लागली आहे. मुळात या माणसाने ‘सेक्रेड गेम्स’ पाहिले देखील नाही आणि त्याला ते आवडत देखील नाही. मात्र, सेक्रेड गेम्ससोबत अर्थाअर्थीही संबंध नसलेल्या कुन्हाबदुल्ला सीएम या व्यक्तीला दुसऱ्या सीजनच्या पहिल्या एपिसोडमुळे भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. हिंदुस्तान टाईम्सने गल्फ न्यूजच्या हवाल्याने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

..आणि त्याला रात्री-बेरात्री फोन येऊ लागले!

दुसऱ्या सीजनमुळे सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली असली, तरी ३७ वर्षीय कुन्हाबदुल्लाची मात्र रात्रीची झोप मोडली आहे! दुसऱ्या सीजनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये गायतोंडे अर्थात नवाजुद्दीन सिद्दीकीला अमृता सुभाष गायतोंडेचा शत्रू असलेल्या सुलेमान इसा या गँगस्टर कॅरेक्टरचा फोन नंबर म्हणून एक नंबर देते. वेबसीरीजमध्ये या नंबरवर फोन करून गायतोंडे जरी इसाला धमकी देत असला, तरी रीअल लाईफमध्ये हा नंबर मूळच्या केरळच्या असलेल्या आणि दुबईतल्या शारजाहमध्ये नोकरीनिमित्त राहणाऱ्या कुन्हाबदुल्लाचा आहे. आणि पहिला एपिसोड प्रदर्शित झाल्यापासून कुन्हाबदुल्लाला दिवसा, रात्री, बेरात्री असे कधीही फोन येऊ लागले आहेत. त्यामुळे कुन्हाबदुल्ला चांगलाच हैराण झाला आहे.

‘लोकं फोनवर विचारतायत सुलेमान इसा आहे का?’

‘गेल्या ३ दिवसांपासून मला माझ्या फोनवर अविरतपणे कॉल येत आहेत. भारत, पाकिस्तान, नेपाळ, अरब अमिराती आणि संपूर्ण जगभरातून मला कॉल येत आहेत. रविवारी तर दिवसभरात मला ३० कॉल आले. मला लोकं फोन करून विचारतात इसा आहे का? हा इसा कोण आहे? मला कळतच नाहीये काय होतंय. आता तर माझा फोन वाजला तरी माझा थरकाप उडतोय. मला आता माझा नंबरच रद्द करायचा आहे. आणि हे सॅक्रेड गेम्स आहे तरी काय? व्हिडिओ गेम वगैरे आहे का? मी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत काम करतो. माझ्याकडे या अशा गोष्टींसाठी वेळच नाहीये’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया कुन्हाबदुल्लाने गल्फ न्यूजशी बोलताना दिली.


हेही वाचा – सेक्रेडमधील ‘या’ कलाकारांच्या आठवणींना नेटफ्लिक्सकडून उजाळा!

नेटफ्लीक्सचा माफीनामा

दरम्यान, हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर नेटफ्लीक्सने कुन्हाबदुल्लाची रीतसर माफी मागितली असून एपिसोडमधून हा क्रमांक काढून टाकला आहे. त्यासंदर्भात नेटफ्लीक्सकडून जाहीर निवेदन देखील काढण्यात आलं.