नेटफ्लिक्सवर अनुरागच्या ‘सेक्रेड गेम्स’चा थरार!

नेटफ्लिक्सची 'सेक्रेड गेम्स' ही नवीन सीरिज सस्पेन्स आणि अॅकशने परिपूर्ण असून यात सगळ्यांनीच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Mumbai
web series
सेक्रेड गेम्स

नेटफ्लिक्सने आपली नवीन इंडियन सीरिज नुकतीच प्रदर्शित केली आहे. कमी वेळातच या सीरिजला खूप प्रसिद्धी मिळत आहे. या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि सैफ अली खान यांच्या महत्वाच्या भूमिका असून अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी दिग्दर्शन केले आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या पुस्तकावर आधारीत ही वेब सीरिज आहे.

या सिरिजचे ८ एपिसोड प्रदर्शित

सेक्रेड गेम्स ही सीरिज जरी असली तरी ती पाहत असताना आपल्याला सिनेमा पाहत असल्याचा अनुभव येतो. आता सध्या या सिरिसच्या पहिल्या सीरिजचे ८ एपिसोड प्रदर्शित झाले असून ते तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळतील. या वेब सीरिजमध्ये आपल्याला अॅक्शन, ड्रामा, थ्रिलर सगळं अनुभवायला मिळणार आहे. सेक्रेड गेम्स पाहताना प्रत्येक भागानुसार उत्सुकता वाढत जाते. ही सीरिज अॅक्शन आणि थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. सीरिजची पूर्ण कथा गणेश गायतोंडे या व्यक्तिरेखेच्या भोवती फिरते. पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक सरताज सिंग (सैफ अली खान) याला गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन) चा फोन येतो आणि मग पुढच्या गुढ कथेला सुरुवात होते.

नवाजुद्दीने ताकदीने साकारली गणेश गायतोंडेची व्यक्तिरेखा

नवाजुद्दीनने आपल्या शैलीत गणेश गायतोंडे व्यक्तिरेखा साकारली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे या सीरिजचे गुढ कायम राहते. सैफ अली खानने पोलीस इन्स्पेक्टर सरताज सिंगच्या भूमिकेत आपलं अभिनयाच नाणं खणखणीत वाजवलं आहे. तर अनुरागला यावेळी सेन्सॉर बोर्डचा अडथळा नसल्यामुळे त्याने कमालच केली आहे. जितेंद्र जोशी आणि राधिका आपटे यानी सुद्धा आपला दर्जेदार अभिनय दाखवला आहे. तसेच निरज काबी, राजश्री देशपांडे, कुबेरा सैत ह्यांनी देखील आपली छाप उमटवली आहे. एकूणच काय जर उत्तम कथा आणि उत्कृष्ट कलाकारांची फौज असेल तर ती कलाकृती उत्तमच होते.

मराठी कलाकार आणि मराठी भाषेची छाप


आपण मराठी सीरिज बघतोय की हिंदी, असा प्रश्न पडावा इतकी सीरिजवर मराठीची छाप आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचे गायतोंडे नावाची प्रमुख भूमिका आहे. त्याशिवाय कथेचे अनेक प्रसंग हे मुंबई शहर आणि मुंबई पोलीसांशी निगडीत असल्यामुळे मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो. जितेंद्र जोशी हवालदाराच्या रुपात तर गिरीश कुलकर्णी मंत्र्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांचे संवादही मराठीत ऐकायला मिळतात. राधिका आपटे रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. तिचे संवाद हिंदीमध्येच असले तरी अनेक मराठी कलाकार या सीरिजमध्ये पाहायला मिळतात.