घरमनोरंजनअडवलेल्या पडद्याची घडवलेली गोष्ट

अडवलेल्या पडद्याची घडवलेली गोष्ट

Subscribe

मराठी प्रेक्षक हिंदीपेक्षा जास्त चोखंदळ असतो. रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप, नीरज पांडे अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या हिंदी चित्रपटांनाही तो सहज स्वीकारतो, त्याचं कौतूक करतो. त्यावर मराठी माध्यमातूनही त्यावर भरभरून लिहतो, बोलतो. तसंच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील मराठीबहुल प्रेक्षकांनीही दर्जेदार कथानक, सादरीकरण, दिग्दर्शन, अभिनय असलेल्या अशा चित्रपटांचं तिकिटबारीवर स्वागत केलं. मात्र केवळ नावाजलेल्या हिंदीतील चित्रपट निर्मितीसंस्थांनी चित्रपटगृहांच्या मोनोपॉलीवजा केलेल्या खेळीमुळे हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी नसिरुद्दीन शहा यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली होती. सलमानच्या सिनेमांना मिळणार्‍या थिएटर्सच्या संख्येमुळे त्यांनी मिस्कीलपणे ही चिंता व्यक्त केली होती.

नावाजलेल्या हिंदीतील चित्रपट निर्मितीसंस्थांनी चित्रपटगृहांच्या मोनोपोलीवजा केलेल्या खेळीमुळे हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी नसिरुद्दीन शहा यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली होती. सलमानच्या सिनेमांना मिळणार्‍या थिएटर्सच्या संख्येमुळे त्यांनी मिस्कीलपणे ही चिंता व्यक्त केली होती.

मोठ्या, बलाढ्य बॅनर्सच्या हिंदी चित्रपटांकडून जास्तीत जास्त थिएटर्स ताब्यात घेण्याची मोनोपॉली जुनीच आहे. महाराष्ट्रातील दर्जेदार चित्रपटांनाही याचा फटका अनेकदा बसला आहे. असे असतानाही मराठीतले काही चित्रपट अशा खेळींना पुरुन उरल्याचाही मराठी सिनेसृष्टीचा इतिहास आहे. मुंबई सर्वभाषिक शहर असल्याची धारणा जाणीवपूर्वक पेरण्यामागे जशी काही राजकीय कारणं आहेत तशीच हिंदी चित्रपटांच्या बिग बॅनर्सकडून राबवली जाणार्‍या यंत्रणांची आर्थिक गणितंही आहेत. त्यातून या शहरात हिंदी चित्रपटांचा प्रेक्षक मोठ्या संख्येने असल्याची धारणा हिंदी पडद्यानं जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. हे ठरवण्यामागे मराठी चित्रपटांना नाकारण्याची खेळी आहेच. चित्रपटगृह ताब्यात घेऊन इतर चित्रपटांशी असलेली स्पर्धा टाळण्याची खेळी हिंदीतल्या बड्या बॅनर्सकडून खेळली जाताना त्याचा फटका मराठीसह हिंदीतीलच तुलनेने छोट्या निर्मिती संस्थांना बसला आहे.

- Advertisement -

मुंबई किंवा महाराष्ट्रात मोठ्या आर्थिक उलाढालीतून जास्तीत जास्त थिएटर्स ताब्यात घेत स्थानिक चित्रपटांचा पर्याय न ठेवता नाईलाजाने मराठी प्रेक्षकालाही हिंदी चित्रपटाचं तिकिट काढायला भाग पाडलं जातं. अशी खेळी बॉलिवूडमधल्या बड्या बॅनरकडून नेहमीची झाली आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, मराठवाडा किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रिन्सवर हिंदी चित्रपटांना झुकतं माप दिलं जाणं नवीन नाही. तर मराठी चित्रपट जुन्या एखाद्या चित्रमंदिरात मॉर्निंग शोसाठी केवळ नियम म्हणून लावला जातो. मराठीला प्रेक्षक मिळत नाहीत, ही जुनीच ओरड या कामी येते.

मराठी चित्रपटांचं बजेट, आर्थिक गणितं हिंदीच्या तुलनेत मोठी नसतात. त्यामुळे मोठे सेट्स, देशविदेशातलं महागडं शूटींग, कॅमेरा, साऊंड इफेक्ट्सच्या खर्चाला मराठीत मर्यादा येते. त्यामुळेच केवळ दर्जेदार कथा, पटकथा आणि अभिनयावरच मराठी चित्रपटांची मदार असते. चित्रपट म्हणजे काहीतरी भव्यदिव्य, इफेक्टीव्ह, व्हिएफएक्स, संगणकांवर केलं जाणारं कौशल्यपूर्ण प्रसंगांची जोडणीचं काम, अशी व्याख्या आता सिनेमांच्या बाबतीत जाणीवपूर्वक रुजवली जातेय. त्यामुळेच दर्जेदार कथा, पटकथा, संवाद, संगीताला फाटा देऊन फास्टफूड सिनेमे बनवण्याची सुरू झालेली स्पर्धा कलाकृती म्हणून चित्रपटाला मारक ठरत आहे. चित्रपटातील कलाकारांना आता अभिनयासोबतच फिल्म प्रमोशन्ससाठीही वेगळे पैसे मोजले जाताहेत. चित्रपट चांगला आहे किंवा नाही. हे ठरवण्याचा अधिकार आता प्रेक्षकांना राहिलेला नाही. आपल्याच कलाकृतीवर विश्वास नसल्याने माऊथ पब्लिसिटाचा धोका पत्करायला निर्माते तयार होत नाहीत.

- Advertisement -

शाहरुख, सलमान, आमिर अशी मोठी नावं पडद्यावरच्या टायटल लिस्ट मध्ये घेऊन तयार केलेले सिनेमे कथा, दिग्दर्शनात दर्जेदार नसले तरी केवळ या मोठ्या नावांनी केलेल्या प्रमोशन्सवर चालवले जाण्याबाबत आता निर्मात्यांना संशय राहिलेला नाही. ही शोकांतीका हिंदी पडद्याची झाली आहेच. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ठग्स ऑफ हिंदुस्तानमधून हेच पुन्हा समोर आलं. यशराज सारखी निर्मिती संस्था, अमिताभ आणि आमिर खान अशी मोठी नावं, ३०० कोटींच बजेट, अत्याधुनिक व्हीएफएक्सचा वापर, त्यात आमिर खानचं स्वतः लक्ष घालणंं, अशा सगळ्या जाहिरात प्रमोशनचे फंडे या चित्रपटाशी आधीपासून जोडली गेल्यानं अशा फास्ट फूड प्रमोशनच्या बळावर ठग्स…तिकिटबारीवर यशस्वी करण्याचं ठरवलं गेलं. त्यात दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा होणार होताच.

आता अडचण होती थिएटर्स मिळण्याची त्यामुळे बिग बॅनर, बजेट,स्टारकास्टचं आमिष दाखवून सुमारे ७ हजार स्क्रिन्सवरून ठग्स… देशभर, देशाबाहेरही दाखवला गेला. त्यानंतर फस्ट डे फस्ट शोनंतर दोन ते तीन दिवसांतच चित्रपट तिकिटबारीवर अपयशी ठरल्याच्या बातम्या आल्या, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ठग्सने ठकवल्याची भावना करून नाराज झालेले प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडत होते. त्याच वेळी खास ठग्सच्या खेळासाठी तिकिट दरही वाढवण्यात आल्याच्या बातम्या होत्या. ३०० कोटींच बजेट त्यातून वितरणाचे १०० कोटींचे हक्क रिलिजपूर्वीच विकले गेले. सुमारे दीडशे कोटींचे हक्क चॅनल्सनी विकत घेतल्याच्या बातम्या आल्या. उरला प्रश्न ५० कोटींचा तो अमिताभ, आमिरच्या नावावर आणि दमदार प्रमोशनमुळे पहिल्या तीन दिवसांतच वसूल करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षक जरी ठकवले गेले तरी निर्मात्यांना त्याचा फटका बसला नाही. सलमानच्या चित्रपटांची मागील दोन वर्षांची यादी पहिल्यावर बॉक्स ऑफिसच्या पहिल्या आठवड्यातल्या यशाचं गणित लक्षात येईल.

मोठ्या बॅनर्सचा दबदबा असलेल्या हिंदी चित्रपटांचं बजेट कोट्यवधींचं असतं. ते १०० कोटी किंवा ३०० कोटींच्या जवळपासही जाणारं असतं. त्यामुळे असे चित्रपट दर्जाहीन असले तरी त्याला प्रेक्षक मिळवण्यासाठी आणि चित्रपटांत गुंतवलेली रक्कम तिकिट बारीवरून वसूल करण्यासाठी हिंदी चित्रपटांच्या मोठ्या निर्मिती संस्थांकडून मल्टीप्लेक्सचे दिवसातले जास्तीत जास्त खेळ ताब्यात घेतले जातात. इतर स्थानिक चित्रपटांचे पर्याय समोर येऊच नयेत, अशी ही चित्रपटांच्या खेळांची पडद्यापलिकडे खेळलेली खेळी असते. त्यात अनेकदा स्थानिक अशा दर्जेदार चित्रपटांचाही बळी जातो. नियमानुसार मल्टीप्लेक्समधला प्राईम टाईम स्थानिक चित्रपटांसाठी देणं बंधनकारक आहे. पण या नियमाला अनेकदा अपवाद ठरवलं जातं. चित्रपटाची रिळं सिनेमागृहात दाखल होण्याआधी प्रमोशनच्या लाटेत मल्टीप्लेक्स चालकांनाही भुरळ घातली जाते. दिवसाला चार ते पाच खेळ त्यातला एखादा खेळ एखाददुसर्‍या चित्रपटाला देऊन पर्याय टाळले जातात. हे चित्र मुंबईतल्या अनेक मल्टीप्लेक्समध्ये ठग्सच्या निमित्ताने पुन्हा दिसलं. मराठीची ही स्पर्धा टाळण्यासाठीच रितेश देशमुखच्या बहुचर्चित माऊलीसोबत शहारुखने झिरोच्या रिलिज डेट्सचा संघर्ष टाळला. त्यासाठी रितेशचं तोंडभरून कौतूकही केलं.

आमिर, उर्मिला, ए. आर. रेहमान अशी मोठी नावं असलेल्या रंगिलामुळे अपेक्षा वाढलेल्या प्रेक्षकांचा विचार न करता जे.डी. चक्रवर्ती या हिंदीत चेहरा नसलेल्या नायकाला टायटल रोलमध्ये घेऊन रामूनं १९९८ मध्ये सत्या बनवला. रंगिला डोक्यात घेऊन सिनेमागृहात गेलेल्या प्रेक्षकांचा रामूकडून साफ भ्रमनिरस झाला खरा, पण वेगळं आणि काहीतरी अनाकलनीय पाहिल्याचा धक्काही त्यांना होता. हा धक्का अपेक्षांपेक्षा वरचढ ठरला आणि कमी बजेटचा सत्या, कथानक, संवाद, अभिनय आणि माऊथ पब्लिसिटीमुळे कमालीचा यशस्वी झाला. पुढे दौडमधून रामूनं सत्यामुळे मिळवलेली प्रतिष्ठा संजय दत्त, उर्मिला आणि पुन्हा ए.आर. रेहमानचं संगीत असतानाही धुळीला मिळवली. पुढे तर ऐतिहासीक शोलेचा रिमेक म्हणून त्यानं राम गोपाल वर्माकी आग बनवल्यानं आग लागो त्या सिनेमाला असं प्रेक्षक, समीक्षकांनी म्हटलं. म्हणजेच मोठ्या नावांमुळे सिनेमा चालणारा नसतो हे लक्षात आल्याने रामूनं पुन्हा छोट्या बजेटचे वैविध्यपूर्ण विषय घेत भूत, कौन असे थ्रीलर, भूतपट बनवले, जे मोठ्या नावांच्या तुलनेत बर्‍यापैकी यशस्वी ठरले.

झी सारख्या निर्मिती संस्थेमुळे नागराज मंजुळेचा सैराटची पुरेशी हवा केली गेली. पण सैराटच्या यशामागे नागराजच्या पिस्तुल्या, फँड्रीसारख्या कलाकृतींमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकताही होती. ही उत्सुकता सुरुवातील यशस्वी ठरली, पण कथानक, दिग्दर्शनक आणि संगितामुळे ती टिकवता आली. त्याच समीक्षकांनी सैराटला मध्यंतरापर्यंत स्वीकारलं होतं. तर त्यानंतर क्राईम पेट्रोलचा एपिसोड म्हणून हिणवलंही होतं. पण वैविध्यपूर्ण कथानक, अजय अतुलचं संगीत आणि सादरीकरणामुळे सैराटनं १०० कोटींपर्यंत मजल मारलीच. सैराट रिलिज झाला त्याच वेळी टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूरचा बागीही रिलिज झाला. त्यामुळे सैराटला थिएटर्स मिळणं काही ठिकाणी कठिण गेलं होतं. सैराटचा फिव्हर वाढत गेला तसा मल्टीप्लेक्सचालकांना बागीचं पोस्टर उतरवून सैराट लावावा लागला. याचा फटका काही प्रमाणात त्याच वेळी आलेल्या अलबेला या भगवानदादांच्या मराठी बायोपिकलाही बसला.

केवळ चित्रपटाने रेकॉर्ड मोडावेत या अट्टहासासाठी दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे मराठा मंदिरमध्ये अनेक वर्षे मॉर्निंग शोसाठी जागा अडवून बसला होता. मिनर्व्हाच्या शोलेने केलेला विक्रम मोडण्याचा प्रयत्न त्यात होता. पण मिनर्व्हात ७ वर्षे चाललेला शोले रिलिज झाल्यावर पहिला आठवडा चालला नव्हता. त्यावेळी जी.पी.सिप्पींनी चित्रपटाचा शेवट बदलण्याचा विचार केला होता. पण प्रेक्षकांच्या माऊथ पब्लिसीटीने घडवलेला इतिहास ज्ञात आहेच. चित्रपट स्वीकारायचा किंवा नाकारायचा हा हक्क त्यावेळी प्रेक्षकांकडे अबाधित होता. आज तशी परिस्थिती नाही. भूक लागल्यावर जे ताटात पडेल ते गपगुमान खावं, या मानसिकतेमुळे जे ताटात पडलंय तेच गोड मानण्याचा घातक पायंडा हिंदी पडद्यावर पाडला गेला आहे.
बिगबजेट बॅनरच्या नावांमुळे हे हिंदीतल्यांना शक्य होतं. जिथं गरज नसेल तिथंही पडदा अनेक वर्षे असा ताब्यात ठेवता येतो आणि मराठीची एखाद्या जुजबी शोवर बोळवण केली जाते. उस्मानाबाद मध्यवर्ती शहरातल्या न्यू महावीर या पत्र्याच्या थिएटरमध्ये १९९१ मध्ये जवळपास एक वर्ष माहेरची साडी दाखवला गेला होता.

मात्र त्यात चित्रपटानं विक्रम करण्याचा अट्टहास नव्हता. सिनेमागृह चालवणार्‍या आणि चित्रपटाचं भाडं देणार्‍या निर्मात्यांनाही असा अट्टहास परवडणारा नव्हता. त्यामुळेच माहेरच्या साडीला एक वर्ष झाल्यावर थिएटर मालकाने पंचक्रोशीत गावजेवण दिलं होतं. हा फरक होता, प्रेक्षकांवर लादलेली आणि स्वतःची इच्छा जपण्यातला. अभिनेता सुबोध भावेनं हिंदी पडद्यावरचे संवाद म्हणायला एका चॅनलवर नकार देत याबाबत सूचक वक्तव्य नुकतंच केलं. तो म्हणाला इथं तुम्हालास मराठीला मोठं करायला हिंदीचा पडदा येणार नाही. तुम्हालाच दर्जेदार कथानक, संवाद आणि कलाकृती बनवावी लागेल. मराठीत हे शक्य आहे.

दक्षिणेकडील सिनेमांचं यश आणि तिथल्या प्रेक्षकांच स्थानिक कलाकारांवरचं प्रेम पाहून ही बाब ध्यानात येते. रंजिथ पा चा काला करिकलनचा विषय मुंबईतला असतानाही दक्षिणेत तूफान चालतो. रजनीकांतचं मूळ महाराष्ट्रात असल्यानं रजनीप्रेमींना फरक पडत नाही. त्यामुळेच हिंदीला तोडीस तोड चित्रपटसृष्टी उभारण्यात दक्षिणेकडील सिनेमांना यश मिळालंय. आपल्याकडे हिंदीत एके काळी नावाजलेले आणि उतरत्या काळात हिंदीने नाकारलेले मराठी कलाकार नाईलाज म्हणून मराठीकडे वळतात. ही शोकांतिका असते.

सैराट नंतर निर्माण झालेलं मराठी चित्रपटांसाठी आशादायी असलेलं हे चित्र हे पहिल्यांदाच घडत होतं असं नाही. दादा कोंडकेंच्या सिनेमांनीही अनेकदा हिंदी पडद्याला आव्हानं दिली होती. मुंबईतल्या भारतमाता, प्लाझा शिवाय उर्वरित खास करून ग्रामीण भागातील महाराष्ट्रात हिंदी सिनेमांचे खेळ उतरवण्यात दादा यशस्वी ठरले होते. नुकत्याच रिलिज झालेल्या …आणि काशिनाथ घाणेकरला मिळालेल्या यशामुळे कोट्यवधींचं हिंदीतील बिग बजेट सिनेमांविरोधात मराठीतला दर्जेदार सिनेमा असं चित्र पुन्हा पहायला मिळालं. प्रेक्षकांनी ठग्ज ला नाकारून …आणि काशिनाथ घाणेकरच्या पदरात आपलं माप टाकलं. रंगभूमीवर वाहवा मिळवणार्‍या डॉक्टरांच्या बायोपिकलाही प्रेक्षकांनी दाद दिली. प्रेक्षक धुंदीतून बाहेर पडत नाहीत तोच पुन्हा नागराजचं नाव जोडलेल्या नाळसाठी तिकिटांच्या ब्लॅक होत असल्याची बातमी आलीय. प्रेक्षकांशी ही पुन्हा जोडली गेलेली नाळ मराठीसाठी निश्चितच उमेद जागवणारी आहे.

मागील वर्षी २२ डिसेंबरला एकाच दिवशी टायगर जिंदा है आणि मराठी चित्रपट देवा रिलिज झाला होता. बिगबजेट, मोठ्या बॅनरमुळे मराठी देवा ला हिंदीतल्या टायगरमुळे मल्टीप्लेक्सनावाच्या चित्रमंदिरात पुरेशी जागा मिळाली नव्हती. मुंबई, पुणे आणि राज्यातील सर्वच महानगरातील स्क्रिन्स टायगरने व्यापल्या होत्या. या विषयाचं पुरेपूर राजकारण झालं. पण ठाम तोडगा निघाला नाही. त्याच वर्षी घुमा नावाच्या मराठी चित्रपटालाही मल्टीप्लेक्सचा पडदा नाकारण्यात आला. महेश मांजरेकरांच्या काकस्पर्शच्या वेळीही मराठी चित्रपटासाठी पुरेशा स्क्रिन्स उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी मांजरेकरांनी उघड नाराजी व्यक्ती केली होती. तर त्याआधी मराठी चित्रपट काकणच्या निमित्ताने मल्टीप्लेक्स नाकारल्याचा प्रकार घडला होता. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या कोर्टलाही मल्टीप्लेक्सचा पडदा नाकारण्यात आला होता. प्रेक्षकांची कमतरता असल्याच्या कारणाने मराठी चित्रपटांच्या मल्टीप्लेक्सचे शोज रद्द केले जातात. मराठीसाठी ऑनलाईन बुकींगची सेवाही जुजबी असते. मात्र तेच सिनेमे हिंदीतल्या बलाढ्य बॅनर्सचे असतील तर नेटाने ओढून ताणून चालवले जातात. त्यासाठी हंड्रेड क्लबचा बागोलबुवा जाणीवपूर्वक उभा केला जातो. सैराटसारखं उदाहरण अपवादानंच होतं.

हिंदीने स्वतःच्या फायद्यासाठी कलाकृतीचा दर्जा वगळून सुरू केलेल्या या केवळ आर्थिक गणितावरच्या पडद्यामागील हंड्रेड करोड क्लबच्या खेळीत मराठी पडद्याचा बळी पडायला नको. मराठी सिनेमाची नाळ कथानक, संवाद, अभिनयाशी जोडली गेलेली आहे. हिंदी बिगबजेट चित्रपटांवर पैसा लावणार्‍या दिग्गजांकडून मराठीतल्या पुरस्कारविजेत्या कोर्ट, फँड्री, सैराट, श्वासचं कौतूक केलं जातं. पण आपल्या मोठी गुंतवणूक असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची वेळ येते तेव्हा मल्टीप्लेक्स ताब्यात ठेवून मराठीचं त्यांचं हे प्रेम पुतनामावशीचा पान्हा असल्याचं स्पष्ट होतं. हे दुटप्पीपण मराठी पडद्यानं वेळीच ओळखायला हवं. मराठी पडद्यावर प्रेम करणार्‍या कलाकार, निर्मात्यांनीही एकीचे बळ ठेवून हे संकट थोपवावं, मराठी चित्रपटांवर प्रेम करणारा दर्दी प्रेक्षक त्यावेळी बॉक्स ऑफिसवर मराठी पडद्याला एकटं पाडणार नाही हे स्पष्ट झालं आहेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -