शंकर संगीतातला कलंदर

बर्‍याचशा अमराठी गायकांनी मराठी गीते गायिलेली आहेत; पण शंकर महादेवन हा असा एक अमराठी गायक आहे ज्याचे हिंदीबरोबर अन्य भाषिक संगीतासाठी अनेक वर्षांचे योगदान राहिलेले आहे. त्याला कारण म्हणजे तो कट्टर मुंबईकर आहे. तामीळ समाजाचा असतानासुद्धा ज्येष्ठ दिवंगत गायक श्रीनिवास खळे यांना आपले गुरु मानून त्यांच्याकडून हिंदुस्तानी संगीताचे धडे घेतले. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये गायक, संगीतकार असा त्याचा प्रवास राहिलेला आहे. इतकेच काय तर ‘एक से बढकर एक’ या दूरदर्शन मालिकेत काम केल्यानंतर लोकप्रिय ठरलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटात त्याने मुख्य भूमिका निभावली होती. आजवर अनेक चित्रपटांसाठी त्याने गाणी गायिलेली आहेत. महासोहळ्यात तो दिसलेला आहे. रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याने आपला प्रभाव दाखवलेला आहे. परंतु ब्रेथलेसच्या पद्धतीने त्याने गायिलेले गाणे हे अजरामर ठरलेले आहे. एहसान-लॉय यांच्याबरोबर तो संगीत दिग्दर्शनाचे काम करतो. कल हो ना हो, माँ, बोलो ना या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यंदाचा पद्मश्री पुरस्कारही त्याला प्राप्त झालेला आहे. त्यानिमित्ताने शंकर महादेवनशी साधलेला सुसंवाद. . .

Mumbai
Shankar Mahadevan

पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला, काय सांगशील?
जबाबदारी वाढली असंच म्हणावे लागेल. केंद्र सरकारच्यावतीने जे महत्त्वाचे पुरस्कार दिले जातात, त्यातला हा महत्त्वाचा पुरस्कार आहे. छान वाटते. एवढी वर्षे संगीतासाठी कार्य करतो आहे. हा पुरस्कार मिळावा यासाठी अनेकांची धडपड असते. मला पुरस्कार दिला जाणार हे कळले त्यावेळी मला थोडासा धक्काच बसला होता. फारशी कल्पना न देता दखल घेतली गेली याचा मला आनंद वाटतो आहे. संगीतातले योगदान महत्त्वाचे आहेच, परंतु जिथे देशाचा संबंध येतो तिथे मी गाण्यातून माझे देशप्रेम व्यक्त केलेले आहे. देशभक्तीपर गाण्याला संगीत द्यायचे म्हणजे किती नावीन्य आणायचे असा प्रश्न प्रत्येक संगीतकाराला पडतो. तो मला फारसा कधी पडला नाही. एहसान, लॉय या माझ्या संगीतकार मित्रांमुळे जवळजवळ सर्वच गाण्यात उत्साह, जोश आणण्यात मला यश आलेले आहे. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटासाठी ‘विजय भव’ या गीताला संगीतबद्ध करण्यासाठी असाच प्रश्न उद्भवला होता. पण रसिक प्रेक्षकांनी याही गीताचे तेवढेच स्वागत केलेले आहे.

रायझिंग स्टार या रिअ‍ॅलिटी शो मध्ये फारच गुंतून राहिलास असे वाटत नाही का?
हा हिंदी कलर्स वाहिनीचा रिअ‍ॅलिटी शो आहे. तिसर्‍या पर्वाला सुरुवात झालेली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे तिन्ही पर्वामध्ये मी परीक्षक म्हणून काम केले आहे, करतो आहे. यापूर्वी मी अनेक वाहिन्यांसाठी परीक्षक म्हणून काम केलेले आहे. परंतु रायझिंग स्टार या रिअ‍ॅलिटी शोमध्ये गुंतण्याचे कारण म्हणजे याशोसाठी काम करणारी टीम ही शिस्तीला आणि वेळेला महत्त्व देते. जे ठरवले आहे ते वेळेत, अपेक्षेप्रमाणे पूर्ण करण्याचा या टीमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आमच्यासारखे वेळ देऊ पहाणारे कलाकार आणि करिअर करू पहाणारे स्पर्धक यांच्यासाठी असे नियोजनबद्ध काम आजच्या घडीला महत्त्वाचे वाटते. केवळ स्पर्धा घेणे आणि मनोरंजन करणे हा या शोचा मुख्य उद्देश राहिलेला नाही. तर सहभागी कलाकारांना कामही मिळवून दिले जाते. बर्‍याचशा वाहिन्या जे आहे त्यात फारसा बदल करत नाहीत. रायझिंग स्टारने प्रत्येक पर्वात बदल दाखवलेला आहे.

आजच्या संगीताबद्दल तू समाधानी आहेस का?
यावर उत्तर देणे तसे अवघड आहे. मीही त्या क्षेत्रात वावरतो आहे म्हटल्यानंतर दुसर्‍यावर कुरघोडी करणे मला उचित वाटत नाही. परंतु मराठी आणि इतर भाषा यांचा तुलनात्मक विचार करायचा झाला तर हिंदी संगीताचा दर्जा थोडासा घसरलेला आहे. नव्याने येणार्‍या संगीतकारांमध्ये शोधकवृत्ती राहिलेली नाही. बरेचसे संगीतकार निर्मात्याच्या सांगण्यावर अवलंबून राहतात. त्यामुळे जुन्या चित्रपटातील गाणी रिमिक्स करून चित्रपटात आणणे वाढलेले आहे. या झटपट प्रयत्नाला माझा विरोध आहे. मराठीत मात्र अशा गोष्टी टाळल्या जातात. आजच्या घडीला हिंदीपेक्षा मराठी गाणी मला अधिक आवडतात. प्रत्येक संगीतकार आपल्या पद्धतीने नवीन देण्याचा प्रयत्न मराठीत करतो.

महानगरपालिकेच्या मुलांबद्दल काय सांगाल?
माझ्या स्वत:च्या नावाची संगीत अकॅडमी आहे. महानगरपालिकेत शिकणारी बरीचशी मुलं ही सामान्य कुटुंबातील असतात. फक्त संगीताविषयीच त्यांना आवड नाही तर कलेच्या सर्वच प्रांतात या मुलांना काही वेगळे करण्याची इच्छा असते. काही कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर मला ते जाणवले. आपण लक्ष केंद्रीत केले तर भविष्यात चांगले गायक उपलब्ध होऊ शकतील हा आशावाद निर्माण झाला. सध्या या सर्व मुलांची प्राथमिक चाचणी सुरू केलेली आहे. निवडलेल्या मुलांमधून स्पर्धा घ्यायची आणि त्यात विजयी ठरलेल्या मुलांवर श्रम घेऊन त्यांना उच्च प्रतीचे शिक्षण देऊन या संगीताच्या प्रवाहात आणायचे हा त्यापाठीमागचा मुख्य उद्देश आहे. अमृता फडणवीस या कार्यात सक्रिय झाल्यामुळे पाच हजारांच्यावर विद्यार्थ्यांना या उपक्रमात सामावून घेणे शक्य झालेले आहे.

परदेशातीलही गायक तुमच्या संपर्कात आहेत का?
सोशल नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण जग हे जोडले गेलेले आहे. गाण्याची आवड नसलेला देश सापडणे तसे कठीण. भारतीय नागरिक अनेक देशांत मुक्काम करून आहेत. भारतातील जुन्या-नव्या गाण्यांचे आकर्षण आजही त्यांच्यात आहे. जवळजवळ शहात्तर देशांतील भारतीय संगीताची आवड असलेले गायक, संगीतकार, वादक हे आमच्या अकॅडमीशी संबंध जोडून आहेत. मी आणि माझी टीम सतत या गायक कलाकारांशी संपर्कात असतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या त्या देशात जाणे होते, त्यावेळी प्रत्यक्ष गाठीभेटी मी घेत असतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here