घरमनोरंजनतिला काही सांगायचंय!

तिला काही सांगायचंय!

Subscribe

सध्या मराठी रंगभूमीवर उत्साहाचे वातावरण दिसते आहे याचा अर्थ प्रेक्षक सर्वच नाटकांना गर्दी करतात असे नाही. झी समूह नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात झी मराठीच्या सहकार्याने उतरलेला आहे. फक्त निर्मितीच करत नाहीत तर त्यातील दर्जाही टिकून राहिले हे या समुहाने पाहिलेले आहे. भव्यदिव्य निर्मिती आणि त्याचबरोबर सेलिब्रिटी कलाकार हा त्यांच्या निर्मितीचा मुख्य केंद्रबिंदू राहिलेला आहे. ‘हॅम्लेट’, ‘अलबत्या-गलबत्या’, ‘अरण्यक’, ‘नटसम्राट’ यासारख्या अनेक नाटकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. ‘तिला काही सांगायचंय’ हे त्यांच्या सादरीकरणातील आणखीन एक नाटक आहे. त्याच्या निर्मितीची जबाबदारी लता नार्वेकर यांच्यावर सोपवलेली आहे. निर्मातीइतकेच संस्थेचेही नाव प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील अशा अनेक नाटकांची निर्मिती ‘श्रीचिंतामणी’ या नाट्य संस्थेने केलेली आहे. ‘तिला काही सांगायचंय!’ हे नाटकही त्याच परंपरेतील आहे, ज्याचे लेखन-दिग्दर्शन हेमंत एदलाबादकर याने केलेले आहे. याकामी मंगेश कुलकर्णी याचे सहकार्य लाभलेले आहे. लग्नाचा पहिला वाढदिवस.

बारा वाजण्यासाठी काही तासांची अवधी, एकमेकांना सरप्राईज देण्याची उत्सुकता यात चर्चा रंगायला लागते. अनपेक्षितपणे खणखणणारा फोन कोणाचा याचा शोध घेताना समज, गैरसमज वाढायला लागतात. टोकाचे भांडण होते. अगदी एकमेकांना सोडण्यापर्यंतची भाषा उद्भवते. अशा स्थितीत तो काही सांगून जातोच; पण तिलाही काही सांगायचे असतेच. नाटक दोन पात्रांचे आहे परंतु सभोवताली अनेक पात्रे वावरत असल्याचा भास हे दोन कलाकार निर्माण करतात. यात कुतूहल आहे, उत्कंठा आहे. पुढे काय घडणार याचा शोध प्रेक्षकांना घ्यायला लावण्याचे सामर्थ्य या कथेत आहे. काही सकस वेगळे पाहिल्याचे समाधान हे नाटक देते.

- Advertisement -

मिताली सहस्त्रबुद्धे आणि यश पटवर्धन हे दोघे पती-पत्नी आहेत. यश कार्पोरेट क्षेत्रात वावरत आहे तर मिताली ही स्त्रीवादी संघटनेशी संबंधित आहे. हे दोघे पथनाटकाच्या निमित्ताने एकत्र आले. मैत्रीतून पुढे विवाहबद्ध झाले. लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याचे सेलिब्रेशन कसे करायचे त्या रात्रीची ही कथा आहे. पती-पत्नी नात्यापेक्षा मैत्रीचेही नातं त्यांच्यात घट्ट आहे; पण कामाच्या निमित्ताने दोघांच्या सान्निध्यात येणारे स्त्री-पुरूष त्यांच्या दोघांत संशय निर्माण करतात. सुरुवातीला समजुतीने बोलणे होते, पुढे या बोलण्यातून तपशिलाचा उलगडा होतो आणि मग त्यातून त्या स्त्री-पुरूषाशी संबंध असल्याचे ठोसपणे दोघांकडून सांगितले जाते. यश हा मितालीचे राजदीपशी संबंध असल्याचे दाखले देतो तर मिताली ही यश हा गीतामध्ये गुंतल्याचे सिद्ध करत असते. ज्या बाराच्या ठोक्याला वाढदिवस साजरा करायचा असतो त्यावेळी हे दोघे एकमेकांपासून विभक्त होण्याची भाषा करू लागतात. असे नेमके काय घडते ते मात्र नाटकातच पहाता येईल.

पती-पत्नीच्या नात्यातील दुरावा हा विषय तसा नवीन नाही; पण लेखक, दिग्दर्शक हेमंत याने या नाटकासाठी हाताळलेला विषय पूर्णपणे नवीन आहे. नाटकात दोनच पात्रं असल्यामुळे यात अभिनय जसा महत्त्वाचा आहे तेवढेच यातले संवादही महत्त्वाचे आहेत. हेमंत हा स्वत:च दिग्दर्शक असल्यामुळे प्रेक्षक काय विचार करू शकतात, कुठल्या नजरेने नाटक पाहू शकतात याचा गाढा अभ्यास करून हे नाटक त्याने प्रेक्षकांसमोर सादर केलेले आहे. पती-पत्नीतील नाते, त्यांच्या कामातील विभागणी, समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन या दोघांमध्ये खुलत जाईल हे दिग्दर्शकाने पाहिलेले आहे. पण अंतिम टप्प्यात समज-गैरसमज निर्माण होईल अशा एकहून अधिक प्रकरणांना प्राधान्य दिल्यामुळे शेवटच्या क्षणाला कथा थोडी ताणल्यासारखी वाटते. यावेळी सादर केला जाणारा प्रसंग आटोपशीर असायला हवा होता असे वाटायला लागते.

- Advertisement -

तेजश्री प्रधान, आस्ताद काळे या छोट्या पडद्यावर गाजलेल्या कलाकारांनी मिताली आणि यश यांच्या व्यक्तिरेखा साकार केलेल्या आहेत. गप्पांतला मोकळेपणा, थट्टामस्करी ही या भूमिकेची गरज असली तरी यातला मोठा टप्पा हा भावनिक आहे. पती-पत्नीच्या नातेसंबंधावर आधारित असल्यामुळे अभिनयाचे जे विविध पैलू असतात ते दाखवण्याची मुभा या दोघांना मिळाली आणि ती त्यांनी समर्थपणे पेलली. या दोघांचा अभिनय हीच मुळात या नाटकाची जमेची बाजू आहे जी प्रेक्षकांना बरेच काही सांगते म्हणण्यापेक्षा आनंद देऊन जाते. या दोघांबरोबर तांत्रिक बाजूसुद्धा तेवढ्याच उत्तमरितीने जुळून आल्यामुळे ही कथा प्रभावी वाटायला लागते. ही कामगिरी राहुल रानडे(संगीत) संदेश बेंद्रे(नेपथ्य) शितल तळपदे(प्रकाशयोजना) मंगल केंकरे(वेशभूषा) यांनी चोखपणे सांभाळलेली आहे.

-नंदकुमार पाटील 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -