अखेर पकडला गेला राकेश रोशन यांचा हल्लेखोर

बॉलीवूड दिग्दर्शक निर्माता राकेश रोशन यांच्यावर २००० साली झालेल्या हल्ल्यात सहभागी गुन्हेगार आणि शार्पशूटरला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी पॅरोलवरून फरार झालेला सुनील गायकवाड या गुन्हेगाराला अखेर पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला कळवा येथील प्रशिक सर्कल भागातून काल, शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस लवकरच सुनीलला पंत नगर पोलिसांच्या स्वाधीन करतील, त्यानंतर त्याला तुरूंगात पाठवण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

यासंबंधीत मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीविरूद्ध ११ खुनाची प्रकरणे आणि ७ खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी एक प्रकरण म्हणजे दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर २००० मध्ये करण्यात आलेला प्राणघातक हल्ला. जानेवारीमध्ये, मुंबईच्या सांताक्रूझ येथील राकेश यांच्या ऑफिसच्या बाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर पोलिसांनी सुनील गायकवाडला अटक केली होती.

कोण आहे हा सुनील गायकवाड 

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका खून प्रकरणात गायकवाडला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले. तर २६ जून रोजी २८ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल संपल्यानंतर तो तुरुगांत परत न येता फरार झाला. बराच शोध घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा –

चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘अजित पवार, आम्ही तुमचे बाप आहोत!’