छोट्या पडद्यावर सिद्धार्थ चांदेकरचं कमबॅक! ‘या’ मालिकेतून येणार भेटीला

जिवलगा या मालिकेनंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. जिवलगा या मालिकेनंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘सांग तू आहेस का’ असे या नव्या मालिकेचे नाव असणार आहे. खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही असे म्हणत, ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या निमित्ताने अशीच एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी मुख्य भूमिकेत असून लवकरच ही मालिका भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत ‘सांग तू आहेस का’ या मालिकेचे निर्माते विद्याधर पाठारे असून दिपक नलावडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

‘एखादी गोष्ट रसिकांना खिळवून ठेवते त्यांची उत्कंठा वाढवते असं ऐकलं की, ती गोष्ट सांगायला अजून हुरुप येतो. सांग तू आहेस का अशीच मालिका आहे. त्याचं कथानक अनेक प्रश्न पडत पुढे पुढे सरकणारं आहे. लव्हस्टोरी आणि त्यात गूढ असा या मालिकेचा बाज असल्यामुळे पुढे काय उलगडेल याची हुरहुर सतत मनाला लागून राहिल.’, असे या मालिकेचे वेगळेपण सांगताना कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी सांगितले.


सिद्धार्थ आणि मितालीने दिली ‘गोड बातमी’