‘बिग बॉस १३’ चे विजेतेपद सिद्धार्थ शुक्लाकडे

Mumbai

गेले काही महिने वाद विवादाने भरलेलं ‘बिग बॉस १३’ हे पर्व अखेर संपलं. अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं ‘बिग बॉस १३’चं जेतेपद पटकावलं आहे. सिद्धार्थ शुक्ला पर्वाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा लाडका बनला होता. सिद्धार्थ ट्रॉफी आणि ४० लाख रुपयांचं रोख बक्षिसाचाही मानकरी ठरला आहे.

तेरव्या पर्वाच्या अंतिम सोहळा सुरू झाल्यानंतर सर्वात आधी पारस छाब्राने बिग बॉसच्या घरातून पाय काढला. त्यानं सलमान खानची दहा लाखांची ऑफर घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांच्यात अंतिम लढत झाली. शहनाझ गिल, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांनीही बिग बॉसच्या घरातून पाय काढला. अखेर सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज यांच्यामध्ये बिग बॉसच्या जेतेपदाची लढत झाली. अंतिम निकालासाठी १५ मिनिटांसाठी लाइव्ह व्होटिंग लाइन ओपन करण्यात आली. यामध्ये प्रेक्षकांनी सिद्धार्थच्या पारड्यात भरभरून मते टाकली.

१३ व्या सिझनची खास ट्रॉफी

बिग बॉस १३ ची ट्रॉफी फार सुंदर आहे. ट्रॉफीमध्ये सीझन १३ च्या लोगोप्रमाणे BBचं साइन तयार करण्यात आलं आहे. BB च्या चारही बाजूंना डायमण्ड लावण्यात आले आहेत. तसेच ट्रॉफीला निळ्या रंगाचं बॅकग्राउंड देण्यात आलं आहे. गेल्या सीझनच्या ट्रॉफीपेक्षा १३ व्या सीझनची ट्रॉफी पूर्ण वेगळी आहे.

सलमान खानचे होस्टींग ठरले बेस्ट

‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळ्याला सलमानच्या होस्टने चार चांद लावले. शिवाय सलमान खानने हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफसोबत सेटवर क्रिकेटही खेळला. सुनिल ग्रोवरच्या कॉमिडीच्या तडक्यानंही प्रेक्षकांचं चांगलेच मनोरंजन झाले.