Saturday, August 8, 2020
Mumbai
29 C
घर मनोरंजन सुशांतसिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे देणार नाही; मुख्यमंत्र्यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

सुशांतसिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे देणार नाही; मुख्यमंत्र्यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

Mumbai
sushant singh rajput

सुशांतसिंग प्रकरणावरून राजकारण तापले असून बिहार पोलिसांनी आक्रमक तपास सुरू केला असताना हा तपास सीबीआयकडे देण्यावरून राज्य सरकारवर दबाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायचा नाही, यावर एकमत झाल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेतल्या. या भेटीपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी चर्चा केली. त्यावर देशमुख यांनी हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले. ते सीबीआयकडे देण्याची गरज नाही. महाराष्ट्र पोलीस या पूर्ण प्रकरणात व्यवस्थित तपास करत असून सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सक्षम असल्याचेही देशमुख म्हणाले. या प्रकरणाचे सगळे धागेदोरे मुंबई पोलीस तपासून पहात आहेत, असे ट्विट देशमुख यांनी या बैठकीनंतर केले. सुशांतसिंग राजपूतच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी होत असलेल्या आरोपांची मुंबई पोलिसांनी शहानिशा करायला सुरुवात केली असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. जरी बिहार पोलिसांनी फौजदारी दंड संहिता प्रक्रिया कलम व १२ व १३ अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला असला तरी प्रत्यक्ष जागी गुन्हा घडला त्याजागी तपास होणे आवश्यक आहे. हा गुन्हा सीबीआयकडे सोपवण्यास मी नापसंती दर्शवतो असेही देशमुख म्हणाले.

दरम्यान सुशांत सिंग राजपूत तपास प्रकरणावरून बिहार पोलीस आक्रमक झाले आहेत. पटना शहराचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याची बिहार पोलिसांची तक्रार आहे. त्यामुळे बिहार पोलिसांच्या एका टीमनंतर आता पोलीस अधीक्षकांना बिहार सरकारने मुंबईत धाडले आहे. बिहार पोलिसांकडून सुशांतसिंग राजपूत प्रकरणांमध्ये रिया चक्रवर्ती हिला अटक केली जाण्याची शक्यता आहे. तर भाजप नेते सातत्याने सीबीआय चौकशी आणि या प्रकरणाचे राजकीय धागेदोरे तपासण्याची मागणी केली जात आहे. सुशांतसिंग राजपूतची पीए दिशा सालियन हिने आपल्या आत्महत्येपूर्वी आयोजित पार्टीत कोण कोण सामील होते, हे जाहीर करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत तपासाच्या विविध बाबीवर आणि मुंबई पोलिसांच्या पुढच्या भूमिकेवर चर्चा झाल्याचे समजते.

अर्णब गोस्वामीवरही चर्चा?

दरम्यान सुशांतसिंग राजपूतची पीए दिशा सालियन हिने देखील सुशांतसिंगपूर्वी आत्महत्या केली आहे. दिशाने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये शिवसेनेचा कोणी नेता सामील असल्याचा आरोप होत आहे. अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या शो मध्ये या प्रकरणात शिवसेनेचा कोणता छोटा अथवा मोठा नेता सापडला तर शिवसेनेचे सरकार कोसळेल असे वक्तव्य केले आहे. तसेच दिशा सालीयनने आयोजित केलेल्या पार्टीत शिवसेना नेता असल्याचे सांगत हे ठाकरे सरकार बॉलिवूड माफियाना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. त्यावरही उध्दव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक आणि आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here