सारा अली खानला सुशांत प्रपोज करणार होता? त्या व्यक्तीच्या दाव्यामुळे संभ्रम

sushant singh rajput and sara ali khan
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक चर्चांना पुन्हा एकदा नव्याने फोडणी दिली जात आहे. सुशांतच्या आयुष्यात आलेले त्याचे सहकारी, मित्र वेगवेगळे दावे करत असल्यामुळे त्याची पुन्हा नव्याने चर्चा होते. सुशांतच्या आयुष्यात येणाऱ्या गर्लफ्रेंडबाबती चवीने चर्चा केली जाते. अशातच केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारा अली खान आणि सुशांतच्या अफेअरच्या चर्चांनाही पुन्हा सुरुवात झाली आहे. केदारनाथमध्ये सुशांत आणि साराची चांगलीच केमिस्ट्री जुळून आली होती. तेव्हा देखील त्यांच्या गुपचूप भेटीच्या चर्चा होत होत्या. आता सुशांतच्या फार्महाऊसवरील केअर टेकर रईसनेही या चर्चांना दुजोरा दिला असून आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

सुशांतच्या फार्महाऊसचा केअर टेकर रईसने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यामध्ये त्याने सुशांत आणि साराबद्दल भाष्य केले. “सारा अली खान ही २०१८ नंतर अनेकदा सुशांतसोबत फार्महाऊसवर आली होती. दोघेही आल्यानंतर ३ ते ४ दिवस तिथे राहत असत. तसेच डिसेंबर २०१८ मध्ये देखील दोघांनी एकत्र थायलंडची सफर केली होती. त्या ट्रिपनंतर देखील दोघेही विमानतळावरुन थेट फार्महाऊसवर आले होते. त्यावेळी रात्रीचे ११ वाजले होते. तसेच त्यांच्यासोबत एक आणखी मित्रही होता.”

रईसने पुढे सांगितले की, सारा अली खान फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांसोबत अतिशय प्रेमाने वागत असे. तिचा स्वभाव अगदी साधा होता. फार्महाऊसवर काम करणाऱ्या महिलेला ती सुशांतप्रमाणेच मावशी म्हणून हाक मारायची तर मला रईस म्हणायची.

Sushant Singh sara ali khan
सुशांत सिंग, सारा खान

रईसने या मुलाखतीत दावा केला की, “सुशांत सारा अली खानला प्रपोज करण्याचा विचार करत होता. सुशांतने दमन ट्रिपला गेल्यावर तिथेच तिला प्रपोज करण्याचा निश्चय केला होता. एवढेच नाही तर सारासाठी तो गिफ्ट घेण्याचाही विचार करत होता. मात्र ट्रिप काही कारणांमुळे रद्द झाली. त्यानंतर त्यांनी केरळ ट्रिपचे नियोजन करायला सुरुवात केली. मात्र तिथेही दोघे जाऊ शकले नाहीत. त्यानंतर २०१९ च्या मार्च महिन्यात त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले. त्यानंतर सारा फार्महाऊसवर कधीही आली नाही.”