आरॉन : आई- मुलाच्या नात्याची वेगळी बाजू

mumbai
aaron movie poster
आरॉन चित्रपटाचे पोस्टर

कृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला असला तरी त्याला त्याच मायेने यशोदेने वाढवले. भारतीय कुटूंब व्यवस्थेत मुलाला जन्म देण्याबरोबरच त्याला आईच्या मायेने वाढवणं हे देखील महत्त्वाचे आहे. अगदी आरॉन मध्येही असेच काहीसे घडते.

आयुष्यात नाती जपणं खूप महत्त्वाचं असतं. अनेकदा रक्ताच्या नात्यापेक्षा सहवासाने तयार झालेली नाती दिर्घकाळ टिकतात. काही नाती वरून खूप साधी सरळ दिसत असली तरी खूप गुंतागुंतीची असतात. आई-मुलाचं नातेही काहीसे असेच असतं. कोणत्याही नात्यापेक्षा महत्त्वाचं नातं. या नात्यात कोणत्याच अटी, बंधनं नसतात. ज्याप्रमाणे कृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला असला तरी त्याला त्याच मायेने यशोदेने वाढवले. त्यामुळे भारतीय कुटूंब व्यवस्थेत मुलाला जन्म देण्याबरोबरच त्याला आईच्या मायेने वाढवणं हे देखील महत्त्वाचे आहे. अगदी आरॉनमध्येही असेच काहीसे घडतं. त्यामुळे अधिकच नात्यातली ही गुंतागुंत वाढत जाते.

आरॉन म्हणजेच बाबू (अथर्व पाध्ये) कोकणात आपल्या काका (शशांक केतकर)- काकूंकडे (नेहा जोशी) रहात असतो. खरतर बाबूचा जन्म पॅरिसचा. बाबूच्या वडिलांनी एका फ्रेंचमुलीशी लग्न केलेलं असतं. त्यामुळे सुरूवातीचे काही दिवस बाबू पॅरिसला आपल्या आई वडिलांबरोबर राहतो. मात्र, वडिलांच्या अपघातानंतर बाबूला सांभाळणं त्याच्या आईला अ‍ॅलीटाला (स्वस्तिका मुखर्जी) कठीण होतं. त्यामुळे ती त्याला कोकणात असणार्‍या त्याच्या काका काकूंकडे सोडते. मात्र, ती आरॉनची जबाबदारी कधी नाकारत नाही. ती कायम पत्रांच्या माध्यमातून बाबूशी संवाद साधत असते. एकदा पत्रातची बाबूला दहावी झाल्यानंतर पॅरिसला घेऊन जाण्याचं आश्वासन देते. तर दुसरीकडे बाबू पोटचा मुलगा नसतानाही त्याला पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवणारी त्याची काकू नंदीता आणि बाबूमध्ये एक वेगळं भावनिक नातं तयार होतं. बाबूच्या खाण्याच्या सवयींपासून ते अगदी त्याच्या अभ्यासापर्यंत सगळी काळजी नंदा अगदी मनापासून घेत असते. काकाही बाबूच्या शिक्षणात, त्याला वाढण्यात कोणतीच कसूर सोडत नाही. पण अखेर तो दिवस येतोच बाबूची दहावीची परीक्षा झाल्यानंतर काका बाबूला पॅरिसला घेऊन जातो. बाबूला त्याची आई भेटते का? की बाबू काकूच्या प्रेमापोटी पुन्हा कोकणात येतो? या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला चित्रपट बघावाच लागेल.

कथा जरी आई- मुलाच्या नात्यावर असली तरी लेखकाला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे चित्रपट संपला तरी कळत नाही. वरवर जरी चित्रपट दिसताना चांगला दिसत असला तरी कशासाठी केला हा अट्टाहास असे चित्रपट बघताना मनात येत राहतं. अनेक ठिकाणी प्रसंग अर्धवट राहिल्यासारखे वाटतात. त्याचप्रमाणे बाबूला किक्रेट क्लासला घालताना दहावेळा पैशांचा विचार करणारं हे कुटूंब पॅरिसमध्ये अगदी महाबळेश्वराला फिरल्यासारखे फिरतात. त्याचप्रमाणे चित्रपटात असलेलं पार्श्वसंगीत हे प्रसंगांना अनुरूप वाटत नाही. कानाला त्रासदायक वाटतं. त्याचप्रमाणे कोकणातील शुटींग ज्याप्रमाणे मस्त जमून आलं आहे. तसं पॅरिसच्या बाबतीत होत नाही. पॅरिसचा प्रभाव चित्रपटात जाणवत नाही. चित्रपटात असलेलं गाणं तुमच्या लक्षात रहात नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या चित्रपटात अनेक त्रुटी जाणवतात.

मात्र, सगळ्याच कलाकारांनी आपल्या भुमिका चोख बजावल्या आहेत. बाबूचं काम करणारा अथर्व पाध्ये याचं कामही उत्तम झालं आहे. त्याचप्रमाणे शशांक केतकर, नेहा जोशी यांच्या भूमिका उत्तम वठल्या आहेत. अथर्व आणि नेहा जोशीची केमिस्ट्री चित्रपटात जमून आली आहे. त्यामुळे नेहमीप्रामणेच नेहा जोशीच अभिनयात या चित्रपटातही वरचढ ठरली आहे. शशांकनेही उत्तम साथ दिली आहे. पण मराठीतील हा पहिला हिंग्लीश चित्रपट होता. त्यामुळे या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट बघितल्यानंतर या अपेक्षा पूर्ण होत नाहीत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here