घरमनोरंजनशिक्षणाच्या बाजारात विद्यार्थ्यांची उंदीरदौड

शिक्षणाच्या बाजारात विद्यार्थ्यांची उंदीरदौड

Subscribe

शिक्षणाच्या शर्यतीत पटावरील घोडे बनवलेल्या विद्यार्थ्यांवर रक्कम लावून जिवाच्या आकांताने त्यांना दौडवलं जात आहे. शिक्षणक्षेत्रातली ही गैरसमजाची परिस्थिती इतकी बिघडली आहे की, या स्पर्धेत उतरल्याशिवाय गत्यंतर नसल्याने आपल्या मुलामुलीचं भविष्य धूसर होण्याचा भीतीने पालकसुद्धा या स्पर्धेत विद्यार्थ्याच्या जगण्याचा बळी घेऊ लागले आहेत. या उंदीरदौडीत यश मिळवणं महत्वाचं, त्याचा मार्ग कोणताही असो, त्याने फरक पडत नाही. व्हाय चिट इंडियाचा विषय हाच आहे.

भ्रष्ट शिक्षणव्यवस्थेचा विषय हिंदी पडद्यावर अभावानंच मांडला गेला आहे. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आरक्षण’ मध्ये शिक्षण व्यवस्था आणि राखीव जागांच्या प्रश्नावरून निर्माण होणार्‍या वादाच्या विषयाला हात घातला होता. जातींच्या राखीव जागांच्या प्रश्नावरून आरक्षणचा विषय शिक्षणक्षेत्राच्या व्यावसायीकरणाकडे नाईलाजाने वळवल्यानंतर विस्कळीत झालेल्या पटकथेमुळे अमिताभ, सैफ अली खान आणि मनोज वाजपेयींसारखे मोठे कलाकार असतानाही चित्रपटाचा पुरेसा परिणाम प्रेक्षकांवर झाला नाही. सैमित्र सेन यांनी ‘व्हाय चिट इंडिया’ तून पुन्हा शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराचा विषय पडद्यावर आणला आहे. कथा, पटकथा, संवाद विषयाला पूरक आहेत. गाण्यांचा भडीमार नसल्याने चित्रपटाचा आशय विस्कळीत होत नाही. तर आपल्या रोमँटीक इमेजमधून बाहेर आलेल्या इमरान हाश्मीची ‘शांघाय’नंतर प्रगल्भ अभिनयाकडे वाटचाल सुरू आहे. ‘व्हाय चिट इंडिया’ हा त्यासाठी महत्वाचा टप्पा आहे.

सामान्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित कथानकाचा विषय निवडून कमी बजेटमध्ये चित्रपट साकारण्याचे प्रयत्न अलिकडे यशस्वी होत आहेत. तसाच प्रयत्न दिग्दर्शक सौमित्र सेनने या सिनेमात केला आहे. शिक्षणक्षेत्रात संधीची समानता मिळत नसल्याच्या कारणामागे राखीव जागांचा विषय असल्याचा भ्रम आजच्या तरुणांमध्ये राजकीय हेतूने जाणीवपूर्वक रुजवला जात आहे. मात्र, त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती शिक्षणाचा केवळ व्यावसायिक नाही तर निव्वळ धंदेवाईक वापर झाल्याने निर्माण झाली आहे. इंजिनियरींग, मेडिकल, एमबीए, मास्टर्स, नोकरी किंवा परदेशात गलेलठ्ठ पगाराची हमी देणार्‍या बोगस शिक्षण संस्थांनी शिक्षणाचा बाजार बनवला आहे. या आणि अशा बोगस बाजाराच्या मालकांनी शिक्षणक्षेत्राच्या मैदानात ही जीवघेणी स्पर्धा सुरू केली आहे. यात घोडे बनलेल्या विद्यार्थ्यांवर रक्कम लावून जिवाच्या आकांताने त्यांना दौडवलं जात आहे. ही गैरसमजाची परिस्थिती इतकी बिघडली आहे की, या स्पर्धेत उतरल्याशिवाय गत्यंतर नसल्याने आपल्या मुलामुलीचं भविष्य धूसर होण्याचा भीतीने पालकसुद्धा आपल्या मुलांच्या जगण्याचा बळी घेऊ लागले आहेत. शिक्षणक्षेत्रातल्या या स्पर्धेसाठी क्लास, क्षमता आणि कौशल्यविकासाच्या नावाखाली स्पर्धा परिक्षा, प्रवेशपूर्व परिक्षा असे टप्पे तयार झाल्यानंतर ही स्पर्धा आणखी जीवघेणी होत चालली आहे. एकीकडे ही स्पर्धा जेवढी वाढत आहे. दुसरीकडे शिक्षणव्यवस्थेचा बाजारही तेवढाच वधारत आहे. मग या बाजारात यश मिळवण्यासाठी कुठल्याही नैतिक, अनैतिक तडजोडी करून जागा बळकावण्यासाठी डमी बसवणे, बोगस डीग्री बनवणे, पेपर फोडणे अशा गुन्हेगारीचा मार्ग निवडला जात असल्याचे चित्र व्हाय चिट इंडियाच्या पडद्यावरून समोर येते.

- Advertisement -

शिक्षण घेऊन मोजक्या पगारात करिअर करण्यापेक्षा शिक्षणाचाच बाजार करून गुणवत्तेची हमी विकून त्यातून बक्कळ पैसा कमावण्याचा विचार राकेश सिंह (इमरान हाश्मी) च्या मनात येतो. मग मोठ्या सधन घरातल्या मुलामुलींसाठी मोठमोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी उपलब्ध सीट विकण्याची कामे तो करतो. यातून एक रॅकेट उभं राहातं. या रॅकेटमध्ये शिक्षणसंस्था, शिक्षणविभागातील अधिकारी, राजकीय मंडळींची एक नियोजनबद्ध काम करणारी साखळी असते. शिक्षण कायद्याच्या चौकटीत बेकायदा कामे बसवण्यात राकेश सिंह वाकबगार आहे. क्रिकेटच्या मैदानातल्या स्पर्धेतून पैसा कमावणार्‍या सामान्य तरुणाची भूमिका त्याने याआधी जन्नतमध्ये केली होती. गल्लीबोळात फिरणार्‍या एखाद्या तरुणासारखा सामान्य चेहरा असलेला इमरान बॉलिवूडचा रुढ्यार्थाने हिरो कधीही नव्हता. शहारुख, आमिर, सलमान किंवा ऋतीकची ओळख असलेलं हे हिरोपण इमरानकडे कधीच नव्हतं. मात्र आपल्या सामान्य चेहर्‍याचा कथानकाच्या विषयाने खुबीने वापर करण्याची प्रगल्भता त्याने अलिकडच्या काळात व्हाय चिट इंडियासारख्या चित्रपटांतून वाढवली आहे.

कथानक उलगडत नसल्यामुळे चित्रपटाचा सुरुवातीचा भाग खिळवून ठेवतो. मात्र, काही प्रसंग चित्रपटाची वेळ उगाचच वाढवतात. त्यामुळे मध्यंतरानंतर चित्रपट रटाळ होतो. परंतु शिक्षणासारख्या दुर्लक्षित आणि नव्या विषयाची मांडणी सिनेमातून करताना दिग्दर्शकाने केलेले धाडस महत्वाचे आहे. पार्श्वसंगित कथेला साजेसं आहे.संवादात वैविध्य आहे. शिक्षणव्यवस्थेतल्या या स्पर्धेत होणारी विद्यार्थ्यांची दमछाक मांडण्यात दिग्दर्शक सौमित्र यशस्वी झाला आहे. शाळेत किंवा शिक्षणात नैतिकतेचे धडे म्हणून जे काही शिकवलं जातं, शाळेतून बाहेर पडल्यावर त्याविपरित परिस्थिती असते. केवळ मोठ्या आकडेवारीच्या सर्टीफिकेटवरच गुणवत्ता ठरवल्या जाणार्‍या शिक्षण व्यवस्थेत तरुणाई भरडली जात असल्याचा गंभीर विषय कुठलेही समुपदेशन न करता पडद्यावर येतो. नवोदीत श्रेया धन्वंतरीचा पडद्यावरचा वापर आत्मविश्वासाचा आहे.

- Advertisement -

ऐंशीच्या दशकात एन चंद्रा यांच्या अंकुशमध्ये नाना पाटेकरने साकारलेल्या गरीब विद्यार्थ्याची घुसमट होती. त्यावेळी भ्रष्ट शिक्षणव्यवस्थेशी तडजोड करायला नाना नकार देतो. म्हणून त्याला परिक्षा सुरू असताना मारहाण करून बाहेर काढलं जातं. काळ्या आणि पांढर्‍या अशा नैतिकतेच्या स्पष्ट संकल्पनांमुळे त्या काळातला नायक अन्यायाला विरोध करणारा होता. मात्र व्हाय चीट मध्ये इमरानची व्यक्तीरेखा ही ग्रे शेडची आहे. शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या विचारांता झालेला हा बदल चार दशकात झालेल्या भवतालच्या परिस्थितीच्या फरकातून आलेला आहे. व्हाय चिट इंडिया पाहाताना हा फरक आणखीच गडद होत जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -