घरमनोरंजन‘नमन’ जागर ते जागृती

‘नमन’ जागर ते जागृती

Subscribe

आंबा उत्पादन, पर्यटन स्थळ याच्याबरोबर परंपरेने आलेल्या विविध लोककलांसाठी कोकण प्रसिद्ध आहे. शेती कामाबरोबर इथल्या लोकांनी लोककलेला अधिक प्राधान्य दिलेले आहे. दशावतार, जाखडी नृत्याबरोबर इथला नमनही आता लोकप्रिय झालेला आहे. रमेश मोरे या दिग्दर्शकाने या कलाप्रकारावर माहितीपट तयार केलेला आहे. नमन या लोककलेला श्रद्धेने जपणार्‍या कलावंतांवर प्रकाशझोत टाकणारा हा माहितीपट आहे, तर दुसरीकडे अशोक दुदम या लोककलाकाराने नमनची विक्रमी नोंद होईल असे प्रयत्न केलेले आहेत. ‘कलर ऑफ हॅपिनेस’ हे मोरे यांच्या माहितीपटाचे नाव आहे, तर दुदम यांनी ‘मानाचा नारळ’ या नावाने नमनचे मुंबईत विविध प्रयोग करण्याचे ठरवलेले आहे. ‘नमन जागर ते जागृती’ असा प्रयत्न या दोन्ही व्यक्तींकडून होत आहे. त्यानिमित्ताने घेतलेला मागोवा.

कोकणात जे अनेक लोककलाप्रकार आहेत त्यात नमन या लोककलेचा समावेश आहे. या कलेचा मागोवा घेतल्यानंतर काही गावांत पाच पिढ्यांनी या कलेसाठी योगदान दिल्याचे दिसते. फार वर्षांपूर्वी गावातील देवतांचा जागर करण्यासाठी ही कला सादर केली जात होती. या कलेत श्रद्धा आहे म्हटल्यानंतर संपूर्ण गाव ही कला पाहण्यासाठी एकत्र येत होते. आज ज्याप्रमाणे करमणुकीसाठी अनेक साधने उपलब्ध आहेत तशी त्यावेळी नव्हती. विद्युत पुरवठ्याचा अभाव त्यावेळी होता, आजही आहे. नमन या कलेला आता लोककला म्हणून ओळखत असले तरी त्यावेळच्या प्रेक्षकांसाठी तो खेळ होता. रत्नागिरीबरोबर अन्य गावांत ही कला फोफावली असली तरी त्याचे उगमस्थान रत्नागिरी आहे. अठरा जातीच्या लोकांनी या कलेला आपलेसे केलेले आहे. नमनात काम करणे म्हणजे देवी-देवतांची सेवा करणे, असे सहभागी कलाकारांचे म्हणणे आहे. यात आर्थिक उलाढाल फारशी नसतानासुद्धा संपूर्ण कुटुंब ही कला घरातल्या सदस्याने जपावी, असा आग्रह धरत होते.सर्वच लोककलेचा आत्मा ईश्वराशी निगडित असतो. तसे नमनचेही सांगता येईल.

उत्सव जत्रा यांचे निमित्त घेऊन ही कला सादर केली जाते. पूर्वी दिवस मावळण्यापूर्वी या कलेचे सादरीकरण केले जात होते. पुढे मशाली वापरण्यात आल्या. प्रेक्षक अशा कलेसाठी रात्रभर बसण्याची तयारी दाखवतात म्हटल्यानंतर पेट्रोमॅक्स्च्या दिव्यांखाली नमन करणे सुरू झाले. त्यापूर्वी उत्स्फूर्त अविष्कार, उपलब्ध असलेले कपडे असे काहीसे त्याचे स्वरूप होते. त्यासाठी खास संवाद लिहिले जात नव्हते. देव दिवाळी ते पाडवा या दरम्यानचा कालखंड या कलेसाठी महत्त्वाचा मानला जात होता. आज पूर्णपणे या कलेला वाहून घेतलेली पाचवी पिढी कोकणात अस्तित्त्वात आहे. जसजशी समज येऊ लागली तसतसे या नमन खेळात बदल होत गेलेले आहेत. त्यातही एक शिस्त आलेली आहे. गण-गवळणच्या निमित्ताने श्रीकृष्ण, पेंद्या, मावशी अशा अनेक व्यक्तिरेखा या नमनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. श्रृंगारिक गवळण हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग मानला जातो. त्यानंतर अलीकडे लोकनाट्य सादर करणे वाढलेले आहे. पौराणिक, ऐतिहासिक कथांचा यात समावेश असतो.

- Advertisement -

फार वर्षांपूर्वी कोकणातल्या माणसाला मुंबईत येणे तसे अवघड जात होते. त्यातूनही आला तर मनी ऑर्डर पाठवून प्रापंचिक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागत होत्या. अशा स्थितीत कलाकारांचा ताफा घेऊन मुंबईत येणे तसे अवघड. कोकणातला माणूस नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आला. याचा अर्थ मुंबईचा त्यावेळी सांस्कृतिक विकास झाला होता, असे नाही. मुंबईकरही त्यावेळी मनोरंजनाच्या प्रतीक्षेत होतेच. तमाशा सादर करणारी नाट्यगृहे त्यावेळी उदयाला आली असली तरी पैसा खर्च करून मनोरंजन करून घेणे त्यावेळी चाकरमान्यांना अशक्य होते. त्याचा परिणाम असा झाला की समूहाने राहणार्‍या या कोकणवासीयांना नमन, दशावतार यासारखे कार्यक्रम करण्याची गरज वाटू लागली. कोकणात ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन नमनचा खेळ केला जातो तसे मुंबईतही होऊ लागले. जे काही मानधन मिळेल त्यावर गावाचा विकास हा एकच हेतु त्यांच्या सादरीकरणात होता.

आता मुंबईत, गावात होणारे नमन खेळ ज्याला आजच्या भाषेत प्रयोग म्हणता येईल त्यात अमुलाग्र बदल झालेला आहे. कोणतीही कला सादर करायची तर ती तालीम करूनच करायची हे यात सहभागी झालेल्या कलाकारांना वाटायला लागलेले आहे. या अनुषंगाने गीत-संगीत-गायन-रंगभूषा-वेशभूषा यात व्यावसायिकपणा आलेला आहे. तो संवाद लेखनातून व्यक्त होताना दिसतो. त्याचा परिणाम असा झाला की या नमनला मर्यादा आल्या. मोकळ्या मैदानात, देवळाच्या आवारात, चावडीवर होणारा हा कार्यक्रम मुंबईतील बंदिस्त नाट्यगृहात आला. साहित्य संघ, दामोदर हॉल हे नमनच्या प्रयोगांचे हक्काचे ठिकाण. कुठली संस्था, कोणते गाव, शाहिराचे नाव, सहभागी कलाकार यांचा अंदाज घेऊन प्रेक्षक अशा कार्यक्रमांना गर्दी करतात. नमनचा विषय आणि त्यास सादर केलेले देखावे हा प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग असतो. आयोजक आपल्या पद्धतीने ते जपण्याचा प्रयत्न करीत असतात.

- Advertisement -

लोककला म्हणून नमन भारताच्या विविध भागांत पोहोचलेली आहे. परंपरेने आलेले नमन आणि नमनाला व्यवसाय म्हणून स्वीकारलेले आयोजक अशा दोन प्रकारात नमन अलीकडे सादर होताना दिसते. प्रेक्षकांना आकर्षून घेण्यासाठी व्यावसायिक निर्मात्यांनी परंपरेने आलेले नमनचे नियम बाजूला सारून ऐच्छिक नमन सादर करण्याला प्राधान्य दिलेले आहे. ज्या नमनमध्ये सर्वच भूमिका पुरुषांकडून सादर केल्या जातात, स्त्री-विरहीत जे नमन असते त्याला खर्‍या अर्थाने मान्यता आहे. हे जरी खरे असले तरी अलीकडचे युवक उत्तम कलाकार असतानासुद्धा स्त्री वेशात पात्रे साकारण्यास त्यांना स्वत:ला आवडत नाही. त्यामुळे नमन सादर करणार्‍या संस्थांना नमनची निर्मिती करायची म्हणजे थोडे अडचणीचेच वाटते. म्हणून आयोजक प्रयोग करण्याचे थांबवत नाहीत. तडजोड करून आपला प्रयोग करत असतात. कारण गावाबद्दलची आस्था, निष्ठा ही जुन्या कलाकारांना महत्त्वाची वाटत असते.

रमेशचा ‘कलर ऑफ हॅपिनेस’
रमेश मोरेने नमन या खेळावर ‘कलर ऑफ हॅपिनेस’ हा माहितीपट तयार केलेला आहे. रत्नागिरीतल्या हरकरे या गावात ही कला गेल्या पाच पिढ्यांपासून जपैली जात आहे, जी परंपरेने सादर करण्यात इथल्या लोकांनी पुढाकार घेतलेला आहे. रमेश मोरे हा नाटक, चित्रपट दिग्दर्शक आहे. शूर आम्ही सरदार, आम्ही का तिसरे, चिरंजीव या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केलेले आहे. त्याच्या ‘चॅम्पियन’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘आमचं आकाशच वेगळं’ या नाटकाला त्या वर्षात बावीसहून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. चित्रीकरणाच्या निमित्ताने अरुण नलावडे यांनी डॉ. भगवान हरकरे यांची ओळख करून दिली. त्यानिमित्ताने लोककलेच्या प्रांतात नमनला असलेले स्थान, यातील कलाकारांनी जिवाभावाने, श्रद्धेने जपलेली कला, शासन दरबारी नमनची न घेतली गेलेली दखल यावर चर्चा झाली आणि नमनवर माहितीपट यावा असे ठरले. रमेशने त्या संदर्भांचा अभ्यास केला. माहितीपट फक्त मनोरंजन करणारा न होता नमनचा प्रदीर्घ प्रवास सांगणारा व्हावा, त्यात अभ्यासपूर्ण तपशील यावा, परंपरा- संस्कृती यांची सांगड यात दिसावी, गावकर्‍यांची नमनवरची निष्ठा आणि त्यात सहभागी असलेल्या कलाकारांची श्रद्धा यांचा आंतर्भाव यात असायला हवा, ज्यांनी नमनसाठी योगदान दिले आणि हयात आहेत अशा दिग्गज कलाकारांना यात बोलते करताना ज्यांनी नमन कला जपली त्यांचे स्मरणही यात झालेले आहे. रमेशने मोठ्या कल्पकतेने ते मांडताना मनोरंजनाबरोबर नमनची प्रदीर्घ कारकीर्द उभी राहील, असेही पाहिले आहे. चाकरमान्यांनी मुंबईत येऊन आपल्या पद्धतीने नमन ही कला जपली त्याप्रमाणे नमनवर आधारित हा माहितीपट महोत्सवात, उत्सवांत, प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात दाखवला जावा, असे दिग्दर्शक रमेश मोरे याला वाटते.

अशोकने केले नमनचे विक्रमी प्रयोग
अशोक दुदम हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या गोळवली गावचा आहे. काव्य, गायन, दिग्दर्शन, वादन या कला त्याला अवगत आहेत. गुरूंकडून ही कला आत्मसात केल्यानंतर त्याने स्वत:हून पुढाकार घेऊन नमनचे प्रयोग करणे सुरू केलेले आहे. या नमनला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, विक्रमी यादीत त्याची नोंद व्हावी यासाठी तीन वर्षांपूर्वी मुंबईतल्या षणमुखानंद हॉलमध्ये नमनचा प्रयोग केला होता. त्यानिमित्ताने ‘नाद पंढरीचा’ हे लोकनाट्य त्याने सादर केले होते. बंदिस्त नाट्यगृहात तीन हजार प्रेक्षकांनी या नमनचा आनंद घेतला होता. पुढे नमनच्या निमित्ताने ‘अदृष्य रंगकर्मी’ ही कलाकृती सादर केली होती. एकाच नाट्यगृहात सलग तीन प्रयोग करून विक्रमांच्या यादीत नमनचे नाव जाईल असे त्याने पाहिले होते. यातून जो निधी उभा राहिला तो त्याने गावातील नागरिकांसाठी खर्च केलेला आहे. नमनमध्ये सहसा कोणीही एलसीडी स्क्रीन वापरत नाही. अशोकने आपल्या नमनात या नव्या तंत्रज्ञानाला प्राधान्य देऊन नमन ही कला काळाप्रमाणे बदलली आहे याचा त्याने दाखला दिलेला आहे. आता वेगवेगळ्या नाट्यगृहांत ‘मानाचा नारळ’ ही कलाकृती नमनच्या निमित्ताने करण्याचे ठरवले आहे. रविवार १३ जानेवारी रात्री ८.४५ वाजता दामोदर नाट्यगृहात या नमनचा प्रयोग होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -