‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’, कंगना- रेणुका शहाणे यांच्यात रंगलं ट्विटर वॉर!

renuka shahane - kangana
रेणुका शहाणे- कंगना

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या ट्वीटमुळे चांगलीच चर्चेत आहे. गुरूवारीच कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली असल्याने कंगनाच्या या वक्तव्यामुळे मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच संतप्त झाले असून तिच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगणाने ट्विटवरुन केली आहे.  कंगनाच्या या ट्विटनंतर तीच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. कलाकारांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला चांगलच फैलावर घेतलं आहे. याच वक्तव्यावरुन आता कंगनाला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुनावलं आहे. त्यानंतर कंगना आणि रेणुका शहाणे यांच्यात ट्विटर वॉर रंगलं.

रेणुका शहाणे यांनी कंगनाच्या पाकव्याप्त काश्मिरबद्दल केलेल्या वक्तव्यावक ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला‘ म्हणत सणसणीत उत्तर दिलं आहे. मात्र त्यावरही कंगनाने रेणूका शहाणे यांना उत्तर दिलं आहे. त्यावर रेणुका यांनी पुन्हा कंगनाला ‘मला मुंबईची पीओकेशी केलेली तुलना आवडली नाही,’ असं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे.

काय म्हणाल्या रेणूका शहाणे

रेणूका शहाणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे, ‘प्रिय कंगना, मुंबई हे ते शहर आहे तिथे तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. या शहराचा तू थोडो तरी मान ठेवावा अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची तुलना केली हे पटल नाही हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असं ट्विट केलं आहे.

रेणुका यांच्या या ट्विटला कंगनानेही उत्तर दिलं. “प्रिय रेणुकाजी, सरकारी धोरणांवर टीका करणं हे एखाद्या जागेचं कौतुक न करण्यासारखं कधीपासून झालं. तुम्ही इतक्या भोळ्या तर नक्कीच नाही. की तुम्हीही इतर गिधडांप्रमाणे माझे लचके तोड्याची वाट पाहत होता?, तुमच्याकडून अधिक चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे,”

कंगनाच्या या उत्तरावर पुन्हा एकदा रेणुका शहाणे यांनी उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, “प्रिय कंगना, सरकारवर टीका करायला माझी काहीच हरकत नाही. पण मुंबई पिओकेसारखी वाटू लागली आहे हे मला मुंबई आणि पिओकेची थेट तुलना केल्यासारखं वाटतं. हे खूप वाईट आहे. एक मुंबईकर म्हणून मला ही तुलना आवडली नाही. तुझ्याकडून चांगल्याची अपेक्षा करणं हा माझाच वेडेपणा असेल’.

काय आहे प्रकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली.


हे ही वाचा – ‘९ तारखेला मुंबईत येते, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा’; कंगनानं दिलं Challenge