मिशन मंगल, बाटला हाऊस आज रिलिज

दोन बिगबजेट सिनेमांची मेजवानी

Mumbai

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बाटला हाऊस आणि मिशन मंगल हे दोन चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सूकता ताणली आहे. दोन्ही चित्रपटांमधील कथानकांमधून देशप्रेम, शौर्य अधोरेखित होत आहे. म्हणून या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी १५ ऑगस्ट हा मुहुर्त ठरवण्यात आला. सुदैवाने या दिवशीच रक्षाबंधन आहे. अशा या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी उद्या भारतभरातील हजारो चित्रपटगृहे कुुटुंबकबिल्यासह येणार्‍या दर्शकांन ‘हाऊसफुल्ल’ होणार आहे.

प्रभास आणि श्रद्धा कपूरचा बिगबजेट ‘साहो’ हा चित्रपटदेखील १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर रिलिज करण्याचे निर्मात्यांनी ठरवले होते. मात्र काही कारणामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनासोबतच रक्षाबंधनाचा जल्लोष असा दुहेरी योग यंदा साधून आला आहे. श्रावण महिन्यात सलग येणार्‍या सणांमुळे थोडा रिलॅक्स मूड असल्याने बॉलिवूडने याच दिवसांत चित्रपटांची ही मेजवानी आणली आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा असे मोठे स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा भारताच्या मंगळयान मोहिमेच्या कथानकावर आधारीत आहे.

भारतासाठी महत्वाकांक्षी असलेली मंगळयान मोहीम आणि अंतराळातील घेतलेली मोठी झेप या देशाभिमानाच्या विषयासाठी १५ ऑगस्टपेक्षा मोठा दिवस चित्रपटाच्या रिलिजसाठी आणखी कोणता असू शकतो? असा विचार करूनच मिशन मंगलच्या निर्मात्यांनी हा दिवस रिलिजसाठी निवडला आहे. दुसरीकडे जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस चित्रपटाचा विषय हा २००८ रोजी दिल्ली पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरच्या वादावर आधारित आहे. या प्रकरणी दुहेरी मतप्रवाह असला तरी यातून पोलिसांचे शौर्य अधोरेखित झाल्याचा मजबूत मतप्रवाह आहे.

बकरी ईद नंतर नारळी पौर्णिमा, स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, पतेती, पारसी नववर्षारंभ अशा सण-उत्सवांची मालिकाच ऑगस्ट या महिन्यांमध्ये असल्यामुळे नागरिकांचा मूड हा सुट्टी एन्जॉय करण्याचा आहे. बॉलिवूडने हाच मूड ओळखून सुट्टीचे इन कॅश करण्यासाठीच एकाच दिवशी दोन बिगबजेट सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले आहेत.