घरमनोरंजन‘उडता पंजाब’ : नशेच्या गर्तेत बुडता पंजाब

‘उडता पंजाब’ : नशेच्या गर्तेत बुडता पंजाब

Subscribe

सिनेमातील हिंसा मुख्यतः दोन प्रकारची असते असं म्हणता येईल. एक म्हणजे मुळातच येईल अशी वास्तवातील हिंसेचं समर्पक चित्रण करणारी हिंसा आणि दुसरी म्हणजे हेतूपुरस्सररित्या विनोदी स्वरूपाची हिंसा. अर्थात यातही पुन्हा भारतीय चित्रपटांत आढळते तशी नकळतपणे विनोदी प्रकारात मोडणारी हिंसा असे उपप्रकार पडत जातील. पण तूर्तास वर उल्लेखलेले दोन मुख्य प्रकार आहेत, इतकं महत्त्वाचं. तर ‘उडता पंजाब’मधील हिंसा ही पहिल्या प्रकारात मोडणारी, अंगावर येणारी आणि बहुतांशी वेळा घृणास्पद वाटणं अपेक्षित असणार्‍या प्रकारची हिंसा आहे. जे दिलेला विषय पाहता योग्यच आहे.

‘उडता पंजाब’ हा क्वेंटिन टॅरंटिनो किंवा रॉबर्ट रॉड्रिग्जच्या चित्रपटांप्रमाणे काम करतो. म्हणजे या दिग्दर्शकांच्या चित्रपटात एरवी कधीही एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत अशा व्यक्तींचे रस्ते काही कारणाने एकत्र येतात आणि त्या समान धाग्यामुळे या सर्व पात्रांची कथा-उपकथानकं जोडली जाऊन एकसंध कथासूत्र निर्माण होते. ‘उडता पंजाब’चं कथानकदेखील अगदी त्याच रीतीने मांडले जाते. इथे मुख्य चार पात्रांना जोडण्याचं काम ‘ड्रग्ज’ करतं.

टॉमी सिंग (शाहिद कपूर) हा पंजाबमधील तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेला पॉपस्टार गायक आहे. एकीकडे कोकेनच्या व्यसनाधीन असलेल्या टॉमीसारखी तरुणांवर प्रभाव टाकणारी प्रतीकं समोर असताना त्याच्या फॉलोअर्सना टॉमीला आवडत असलेल्या सगळ्याच गोष्टी आत्मसात करणं गरजेचं वाटतं. टॉमीची बेपर्वा, अनअपॉलजेटिक वृत्ती आणि कृत्यांमुळे तो वरून ऑर्डर सोडण्यात प्रभावी ठरणार्‍या लोकांच्या रडारवर आलेला आहे. त्याला अटक करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारा सरताज सिंग (दिलजीत दोसांझ) हा पंजाब पोलीसमध्ये कार्यरत असलेला सबइन्स्पेक्टर आहे. भ्रष्टाचारी व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनलेल्या आणि आपल्या डोळ्यांसमोर घडत असलेल्या अंमली पदार्थ आणि द्रव्यांच्या तस्करीकडे कानाडोळा करणार्‍या सरताजचा धाकटा भाऊ, बल्लीच अंमली द्रव्यांच्या व्यसनाधीन बनलेला असतो. हे कळतं त्याचवेळी त्याची भेट प्रीतशी (करीन कपूर) होते. पोलिसांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रवृत्तीमुळे सरताजला खडसावणार्‍या प्रीतमुळे तो एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या कामी लागतो.

- Advertisement -

कुमारी पिंकी ऊर्फ बौरिया (आलिया भट) ही पंजाबमधील शेतात काम करणारी एक निर्वासित मुलगी आहे. पंजाब-पाक सीमारेषेवरील शेतातून ड्रग्जची देवाणघेवाण होत असलेल्या शेतातच काम करत असते. परिणामी एके दिवशी तिच्या हाती हेरॉईनचं पॅकेट लागतं. ते विकून मुबलक पैसे कमवत या गुलामगिरीच्या आयुष्यातून सुटका करून घ्यावी, असं तिला वाटू लागतं. बरंच काही अनपेक्षित घडतं आणि ती नको त्या परिस्थितीत अडकते. एकीकडे हिचा शारीरिक पातळीवरील, अंगावर येईल अशा प्रकारचा; तर दुसरीकडे ‘नशेडी’ म्हणून आपली होत असलेली बदनामी, साधं एक गाणंही पूर्ण करता येणार नाही अशी मानसिक आणि शारीरिक परिस्थिती यामुळे टॉमीचा आंतरिक पातळीवरील लढा सुरू आहे.

या सगळ्या पात्रांच्या ओव्हरलॅप होत राहणार्‍या उपकथानकांमध्ये ‘उडता पंजाब’च्या संकल्पना दडलेल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे केऑस, अर्थात गोंधळ. हा गोंधळ जितका पडद्यावर दिसणारा, चित्कारांमधून ऐकू येणारा आहे, तितकाच आंतरिक स्वरूपाचा आहे. द्विधा मनस्थितीत अडकलेली पात्रं, ड्रग्जच्या विळख्यातून सुटण्याचा पॅसिव्ह किंवा अ‍ॅक्टिव्ह कुठल्या ना कुठल्या पातळीवरील प्रयत्न अशा बर्‍याच पातळीवर हा गोंधळ दिसून येतो. आता याच गोंधळाचे पुढील एक्स्टेंडेड रूप आणि सदर चित्रपटातील दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे हिंसा. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही हिंसा मुख्यत्वे जिचं अंगावर येणं अपेक्षित आहे त्या प्रकारात मोडते. आता ही हिंसा जितकी पडद्यावरील हिंसक कृत्यांमधून दिसते, तितकीच चित्रपटातील मुद्दामहून लांबवलेल्या दृश्यांद्वारे त्या त्या पात्राच्या मानसिक पातळीवरील संघर्षातूनही दिसते. परिणामी चित्रपटात गोंधळ आणि हिंसा या दोन्हींची अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष दोन्ही रूपं तितक्याच समर्थपणे दिसून येतात.
‘उडता पंजाब’चा सहलेखक आणि दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या चित्रपटांमध्ये संगीताचं विशेष स्थान असतं, अगदी लेखन-दिग्दर्शन त्याने आधी ज्याला सहाय्य केलं त्या विशाल भारद्वाजच्या चित्रपटाप्रमाणेच. मग तो चौबेचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘इश्किया’ असो की त्याचा पुढील भाग ‘डेढ इश्किया’, संगीत हा त्याच्या चित्रपटांचा अविभाज्य घटक राहिलेलं आहे. इथेही अमित त्रिवेदीचा साऊंडट्रॅक हा चित्रपटाला नवीन आयाम प्राप्त करून देतो. यासोबतच नरेन चंदावरकर आणि बेनेडिक्ट टेलरचं पार्श्वसंगीत चित्रपटातील गडद पार्श्वभूमीला अधिक गहिरे रंग प्राप्त करून देतं.

- Advertisement -

समोरील पात्रांच्या मानसिक-शारीरिक स्वरूपातील हिंसक-केऑटिक संकल्पनांना दिलेलं मूर्त स्वरूप आणि त्याला संगीत-पार्श्वसंगीताची दिलेली जोड अशा सर्वच ‘उडता पंजाब’ पातळीवर दाहक वास्तवाचं समर्पक चित्रण करतो. याखेरीज ‘सदर चित्रपटातील घटना आणि पात्रं काल्पनिक आहेत’ अशा अर्थाची सूचना केली तरी तो पंजाब प्रांतातील अंमली पदार्थांची समस्या समोर आणल्यावाचून राहत नाही. त्यामुळे समोर घडणारी दृश्यं ही प्रखर वास्तवाचंच एक एक्स्टेंडेड रूप आहेत, ही भावना मनात निर्माण होतेच. चित्रपटाच्या ओपनिंग सीनमध्ये पाकिस्तानमधून पंजाब प्रांतात फेकल्या गेलेल्या हेरॉईनच्या पॅकेटवर ‘उडता पंजाब’ हे शब्द उमटतात. पुढच्याच क्षणी हे शब्द टॉमी सिंगच्या ‘चिट्टा वे’ गाण्याच्या सुरू असलेल्या सादरीकरणाच्या फ्रेमवर विरून जात असले तरी या शब्दांचा, चित्रपटाचा आणि त्यातील दाहक वास्तवाचा परिणाम मात्र चित्रपट संपून गेल्यानंतरही तसाच उरतो, एवढं मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -