सब कुशल मंगल

Mumbai
Sab kushal mangal

चित्रपट उद्योगाला जगभर मान्यता मिळत असली तरी काही वर्षांपूर्वी स्त्रियांना या क्षेत्रात यायचे म्हणजे कुटुंबाचे, समाजाचे अनेक अडथळे पार करून चित्रपटसृष्टीत यावे लागत होते. आता मात्र या क्षेत्रात आपल्या मुला-मुलींनी नाव मिळवावे यासाठी धडपडणारा पालकवर्ग निर्माण झालेला आहे. हिंदी चित्रपटांची आजवरची वाटचाल लक्षात घेतली तर पृथ्वीराज कपूर यांच्या निमित्ताने चौथी पिढी या क्षेत्रात कार्यरत झालेली दिसते. यातसुद्धा घरातील मुलगी चित्रपटात दिसणार नाही याची पुरेपुर काळजी घेतलेली होती. करिष्मा, करिना आई बबिताच्या सांगण्यावरून चित्रपटात आल्या. तसा घरातून विरोधच होता. थोडक्यात काय तर स्टारसन म्हणून बर्‍याचदा मुलगाच पुढे आलेला आहे. मधल्या काळात कृष्ण-धवल आणि रंगीत युग अनेक स्टार कलाकारांनी गाजवले होते. पुढे त्यांच्या मुलांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आणि आता त्यांची तिसरी पिढी या रुपेरी पडद्यावर दिसू लागलेली आहे. नायिका म्हणून ज्या अभिनेत्रींनी रुपेरी पडदा गाजवला त्या पद्मिनी कोल्हापुरेचा आपल्याला विसर पडणार नाही. अनेक बड्या स्टार कलाकारांबरोबर तिने काम केलेले आहे. याच बळावर आपली बहीण तेजस्विनी कोल्हापुरे हिला रुपेरी पडद्यावर आणले होते. आता तिचा चिरंजीव प्रियंक शर्मा हा आता ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंदी, भोजपुरी पडदा गाजवणार्‍या रवीकिशनची कन्या रिवा किशन हीसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.

पद्मिनीचा मुलगा प्रियंक या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रेक्षकांच्या म्हणण्यापेक्षा बॉलिवूडकरांच्या अपेक्षा या वाढणार आहेत. त्याचे कारण म्हणजे पद्मिनीने हिंदी, मराठी चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका करताना अ‍ॅक्टिंग अकादमीची संचालिका म्हणूही काम केलेले आहे. अनेक नव कलाकारांना अभिनयाचे शिक्षण देण्यात तिने पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे अभिनयाला आवश्यक असणारे गुण, त्याविषयीच्या टिप्स प्रियंकला तिने दिलेल्या आहेत. रिवा हिने अभिनयाबरोबर नृत्यालाही प्राधान्य दिलेले आहे. नामवंत नृत्य दिग्दर्शकांकडे तिने प्रशिक्षणही घेतलेले आहे. यापूर्वी काही चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ‘सब कुशल मंगल’ हा खर्‍या अर्थाने तिच्यासाठी पदार्पणाचा चित्रपट असणार आहे. नव्याने दिसणारी ही जोडी प्रेमप्रकरणात गुंतलेली दाखवली गेली असली तरी निव्वळ मनोरंजन हा दिग्दर्शकाचा उद्देश आहे. मसाला म्हणावा असा हा चित्रपट असणार आहे, ज्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी करण कश्यप याच्यावर सोपवलेली आहे. यापूर्वी ‘बंटी और बबली’, चक दे इंडिया, रावण अशा कितीतरी चित्रपटांमध्ये तो सक्रिय होता. तो अनुभव गाठीशी घेऊन ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केलेले आहे. अक्षय खन्नाचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here