किशोर विनोदाचा प्रधान

कुरळे केस, डोळ्यांवर काळ्या काड्यांचा चष्मा, साधी राहणी, कमरेत किंचित वाकलेल्या अशा व्यक्तिमत्त्वामध्ये लबाड, बावळट, कंजुष, स्वार्थी असे अनेक भाव चेहर्‍यावर दाखवून भूमिका खुलवणारा अभिनेता म्हणून किशोर प्रधान यांचे हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नाव होते. इंग्रजी रंगभूमीवर हमखास टाळ्या घेणारे ते एकमेव मराठी कलाकार होते. बुद्धीबळातल्या प्रधानाला आपले अस्तित्त्व दाखवण्यासाठी सर्व चाली चालण्याची मुभा असते. तसेच काहीसे किशोर प्रधान यांचे रंगभूमीवरचे स्थान होते. त्यांच्या निधनाने विनोदाचा प्रधान खर्‍या अर्थाने पडद्याआड गेला असेच म्हणावे लागेल.

Mumbai
Marathi actor Kishor Pradhan passes away at age of 86
ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान

साधारण पन्नास वर्षांपूर्वी नाटकात काम करणार्‍या कलाकारांची स्थिती तशी अवघड होती. आजच्या सारख्या वाहिन्या त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. यू-ट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जे येते, जे भावते ते दाखवण्याची सोय नव्हती. नाटक एके नाटक करायचे ठरवले तर कोणत्यातरी एका गोष्टीचा त्याग करावा लागतो, ही शिकवण किशोर प्रधान यांना त्यांच्या आईकडून मिळाली होती. नोकरीच्या निमित्ताने प्रधान हे मुंबईत स्थिरावले असले तरी त्यांच्या कलेचे उगमस्थान घर हे होते. घरातून परिसरात आणि परिसरातून रंगमंचावर असा त्यांचा सुरुवातीला प्रवास झाला होता.

मालती प्रधान या त्यावेळीच्या नाट्य कलावती म्हणून लोकप्रिय होत्या. प्रधान यांचा जन्म नागपूरमधला. इथल्याच शाळेत, महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. नाट्य ही कला त्यांनी आपल्या आईकडून अवगत केली. नागपूरमधे नावाजलेल्या ज्या चार पाच नाट्यसंस्था होत्या त्यात पुरुषोत्तम दारव्हेकर यांची ‘रंजन कला मंदिर’ ही संस्था नावाजलेली होती. प्रधान यांच्या आईचे येणे जाणे त्या संस्थेत होते. त्यामुळे किशोर प्रधान यांना आपले अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी इथेच प्राप्त झाली. अनेक बाल नाटकांचे दिग्दर्शनही प्रधान यांनी केले होते.

त्यांच्या कार्याची प्रेक्षक दखल घेत होते, परंतु नाटकाला व्यवसाय म्हणून स्वीकारावे हे त्यांना मान्य नव्हते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची त्यावेळी त्यांना दोन वर्षांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. त्या बळावर मास्टर्स ऑफ सोशल सायन्सची पदवीही संपादन केली. नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले आणि त्यांनी इथेच राहण्याचे ठरवले. त्यापाठीमागचे कारण म्हणजे नाटकात काम करण्याची इच्छा नोकरीबरोबर पूर्ण होत होती. ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीन मालकीन दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘संभव असंभव’, ‘हॅड्सअप’, ‘लैला ओ लैला’, ‘ती पाहताच बाला’, ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘काका किशाचा’, ‘सावित्री’, ‘हनिमून झालाच पाहिजे’ अशा कितीतरी नाटकात त्यांनी काम केले होते.

मधल्या काळामध्ये कामावरील जबाबदार्‍या अधिक वाढल्या. नाट्यछंदाला की नोकरीच्या निमित्ताने कर्तव्याला प्राधान्य द्यायचे यात त्यांनी काही काळ नाटक करणे थांबवले. प्रसिद्ध अभिनेत्री शोभा प्रधान यांचे त्यावेळी मराठी आणि गुजराती रंगभूमीवर काम चालू होते. त्यामुळे घरातील एक कोणीतरी रंगभूमीवर आहे ना ही त्यांना दिलासा देणारी गोष्ट होती. पण त्यातूनही जर चित्रपट, मालिकेत, जाहिरातीत काम आले तर ते करत होते. ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘भिंगरी’, ‘मामा भाचे’ या चित्रपटांत त्यांनी अनेक भूमिका निभावल्या. महेश मांजरेकर यांच्या बर्‍याचशा निर्मितीत प्रधान यांचा सहभाग होता. ‘लालबाग परळ सोन्याची मुंबई’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ असे काही मराठी चित्रपट सांगता येतील. ‘जब वुई मेट’, ‘लगे रहो मुन्नाभाई ’या हिंदी चित्रपटात संस्मरणीय अशा भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. ‘ब्रेव्हहार्ट’, ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘शुभ लग्न सावधान’ या अलीकडच्या चित्रपटांमध्ये प्रधान यांनी भूमिका केलेल्या आहेत.

निवृत्त झाल्यानंतर कलाकाराला काम मिळेलच याची खात्री देता येत नाही. आत्माराम भेंडे यांच्यामुळे भरत दाभोळकर यांच्याशी प्रधान यांची ओळख झाली. गंमत म्हणून, एखादे इंग्लिश नाटक करता येईल का असा प्रश्न पुढे आला. भारतीय प्रेक्षकांना जी इंग्रजी, हिंदी मिश्रीत भाषा ज्ञात आहे त्याचा वापर करून नाटक लिहायचे असे ठरले. ‘बॉटम्सअप’, ‘दॅट्स माय गर्ल’, ‘कॅरि ऑन हेवन’ अशा अनेक नाटकांत काम करून देश-विदेशात त्यांनी प्रयोग केलेले आहेत. भरत दाभोळकर, विजु खोटे, विहंग नायक, आत्माराम भेंडे, अतुल काळे, लीलाधर कांबळी अशा अनेक कलाकारांचा सहवास प्रधान यांना या नाटकाच्या निमित्ताने लाभला.

अतुलसाठी प्रधान वडील होते
किशोर प्रधान हे माझ्या संपर्कात आले ते माझी आई अभिनेत्री मंगला संझगिरी यांच्यामुळे. आई त्यावेळी अनेक नाटकांत काम करत होती. त्यामुळे भरत दाभोळकर, विजु खोटे यांचे प्रधान यांच्यासोबत घरी येणे-जाणे होते. पुढे नाटकात काही करण्याच्या उद्देशाने मीही त्यांच्यासोबत काम करू लागलो. ‘कॅरि ऑन हेवन’, ‘बॉटमअप्स’ अशा कितीतरी नाटकांत मी त्यांच्यासोबत काम केलेले आहे. परदेशातही त्याचे बरेचसे शो झालेले आहेत. बर्‍याचवेळा त्यांचा रुम पार्टनर म्हणून मी त्यांच्यासोबत होतो. मला वडील नसल्यामुळे त्याकाळात कलावंतापेक्षा त्यांच्यातला वडीलपणा मला जास्त भावला.

कलाकारापेक्षा त्यांच्याबरोबर माझे मित्रत्वाचे बोलणे हे अधिक होत होते. कलावंत आणि दिग्दर्शक म्हणून मला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ‘बाळकडू’, ‘संदूक’ असे अनेक चित्रपट मी केले, पण प्रत्यक्षात माझ्या दिग्दर्शनात ‘असा मी अशी ती’ या चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. महेश मांजरेकर यांच्या सुरुवातीच्या बर्‍याचशा चित्रपटांसाठी सह-दिग्दर्शक म्हणून मी काम केले होते. त्यावेळी आमचे घरोब्याचे बोलणे होत होते. गेल्या सहा महिन्यांपासून मी त्यांना भेटायला यावे अशी त्यांची इच्छा होती. पण कामाच्या व्यापामुळे भेटता आले नाही. काही दिवसांपूर्वी भेटलो त्यावेळी त्यांना बोलताही येत नव्हते आणि आता ते निघूनच गेल्याची वार्ता ऐकून मी दु:खी झालो आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते, गायक, दिग्दर्शक अतुल काळे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here