अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता विकी कौशल, पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी तयार झाला आहे. विकीचा ‘उरी…दि सर्जिकल स्ट्राइक’ (URI) हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. या चित्रपटाचं कथानक २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे. भारतीय लष्कराच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या उरी…दि सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. टीझरमध्ये आपल्याया विकीच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळते आहे. विकीने साकारलेला भारतीय सैनिक टीझर पाहणाऱ्या प्रत्येकावर छाप पाडून जात आहे. इतिहासात घडून गेलेल्या एखाद्या घटनेशी निगडीत असलेलं पात्र, अनेक वर्षांनंतर तितक्या ताकदीने साकारणं हे कोणत्याही कलाकारासाठी सोपं नसतं. मात्र, त्याहून कठीण असतं अशा चित्रपटाचं ‘डबिंग’ करणं. एखादा युद्धाचा, फायरिंगचा अॅक्शन सीन शूट करतेवेळी कलाकार आपल्या देहबोलीतून, आवाजातून आणि हावभावातून तो प्रसंग जिवंतपणे प्रेक्षकांसमोर उभा करतो. मात्र, शूटिंगनंतर त्या सीनचं तशाच आविर्भावत डबिंग करणं सोपं नसतं.
गंभीर सीनचं डबिंग विनोदी…
‘URI’ चित्रपटामधील अशाच एका अॅक्शन सीनचं डबिंग करतानाचा एक व्हिडिओ विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा विकी कौशलच्या कामाप्रती असलेल्या डेडिकेशनची, त्याच्या मेहनतीची प्रचिती येते. विकी आपला संपूर्ण जीव ओतून आणि तितक्यात ताकदीने त्या अॅक्शन सीनचं डबिंग करताना या व्हिडिओमध्ये दिसतो आहे. हा खास व्हिडिओ शेअर करतेवेळी विकीने लिहीलं आहे, की ‘एखाद्या गंभीर किंवा अॅक्शन सीनचं डबिंग करणं हे अनेकदा विनोदी असंत आणि मुख्य म्हणजे ते तसं दिसतं.’ यासोबतच URI चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार असल्याचंही त्याने या पोस्टद्वारे प्रेक्षकांना सांगितलंय.
URI पुढल्यावर्षी होणार प्रदर्शित
‘उरी…दि सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाची निर्मीती रॉनी स्क्रूवाला यांनी केली असून, चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. भारतीय लष्कराने २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. हा चित्रपट पुढील वर्षात ११ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात प्रमुख भूमिका साकारत असलेल्या विकी कौशलने ट्रेलरपूर्वी चित्रपटाचं एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.