घरमनोरंजनअभिनेत्री विशाखा सुभेदारच्या पुढाकाराने साकारणार कलावंतांसाठी वृद्धाश्रम

अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या पुढाकाराने साकारणार कलावंतांसाठी वृद्धाश्रम

Subscribe

कलावंतांची आयुष्याची संध्याकाळ निवांत आणि सुरक्षित ठिकाणी व्यतीत व्हावी यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी पुढाकार घेतला.

नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून समाजातील सर्व वर्गातील नागरिकांचे दोन घटका मनोरंजन करून त्यांचा ताण हलका करणाऱ्या कलावंतांची आयुष्याची संध्याकाळ निवांत आणि सुरक्षित ठिकाणी व्यतीत व्हावी यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी पुढाकार घेतला आहे. अंबरनाथ येथील अक्कलकोट स्वामी सेवा मंडळाने त्यांच्या कर्जत तालुक्यातील मोग्रज येथील आनंदवाडी या मठाजवळ या प्रकल्पासाठी दीड एकर जागा विनामूल्य देऊन बहुमुल्य अशी मदत केली आहे.

वृद्धापकाळात कलावंतांना आसरा

अलिकडेच गुढी पाडव्याच्या संध्याकाळी खास कलावंतांसाठी असणाऱ्या स्वामीधाम कलाश्रय या नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. वृद्धापकाळी कलावंतांना आसरा मिळावा, या हेतूने हा प्रकल्प उभारला जात आहे. यावेळी स्वामीधामचे अध्यक्ष चिंतामणी राहतेकर, अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेता दिगदर्शक महेश सुभेदार, लेखक सचिन मोटे, दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेता पंढरीनाथ कांबळी, निरंजन कुलकर्णी, सुशील इनामदार, निखिल बने, मराठी चित्रपट महामंडळाच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष श्याम लोंढे, दत्तात्रय उर्फ दादा हाडप, गिरीश सोमणी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisement -

आदिवासी विद्यार्थांसाठी उपक्रम

जनसेवा हीच इश्वारसेवा हे तत्त्व अनुसरून अंबरनाथ येथील श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळाने कर्जत तालुक्यातील मोग्रज येथील आनंदवाडीत वृद्धाश्रम, परिसरातील आदिवासी विद्यार्थांसाठी अन्नछत्र आदी उपक्रम सुरू केले आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी संस्थेने बांधलेल्या नव्या अन्नछत्र दालनाचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थांना विनामूल्य भोजन देऊन त्यांच्यातील कुपोषण दूर करणे, तसेच त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्याचे काम या ठिकाणी चालते. त्याचप्रमाणे येथील वृद्धाश्रमात वृद्ध दाम्पत्यांना किफायतशीर दरात उत्तम दर्जाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर रविवारी याठिकाणी आरोग्य शिबीर आयोजित केले जाते. त्यात परिसरातील नागरिकांची वैद्याकीय तपासणी होते.

कलावंत जोपर्यंत काम करतो, तोपर्यंत लोक त्यांना डोक्यावर उचलून धरतात. मात्र काम मिळेनासे झाले, की कलावंत एकाकी होतात. त्यांना कुणाचाही आधार नसतो. त्यांना कुणी निवृत्ती वेतन देत नाही. अशा बुजुर्ग कलावंतांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याची इच्छा होती. श्री अक्कलकोट स्वामी सेवा संस्थेच्या चिंतामणी राहतेकर यांनी कर्जतजवळील मोग्रज येथील प्रकल्पात दीड एकर जागा दिल्याने आता मनातील कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल. प्रत्येक कलावंताने स्वत:च्या मिळकतीतील छोटी रक्कम बाजूला काढली, तरी त्यातून ही वास्तू उभी राहू शकेल. – विशाखा सुभेदार, अभिनेत्री.

पहिले वृद्ध कलावंतांचे वृद्धाश्रम उभे राहणार

मूळच्या अंबरनाथकर असणाऱ्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी काही महिन्यांपूर्वी या केंद्राला भेट दिली होती. त्याभेटीत त्यांनी अशाच एखाद्या ठिकाणी कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्याची कल्पना मांडली. संस्थेचे अध्यक्ष चिंतामणी राहतेकर यांनी त्वरित त्या कल्पनेला प्रतिसाद देत संस्थेतर्फे दीड एकर जागा विनामूल्य देण्याची तयारी दाखवली. त्यातून आता राज्यातील किंवा बहुधा देशातील पहिले वृद्ध कलावंतांचे वृद्धाश्रम उभे राहणार आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन अन्नछत्र दालनाचे उद्घाटन आणि कलाश्रय प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. निलेश आंबेकर यांनी प्रास्तविक तर जगदीश हाडप यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

विशाखासारखे कलावंत कायम रसिकांचे मनोरंजन करीत असतात. त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ उत्तम ठिकाणी व्यतीत व्हावी, यासाठी कलाश्रय प्रकल्प उपयोगी ठरेल. स्वामीधामतर्फे आम्ही समाजऋण फेडणारे विविध प्रकल्प राबवीत आहोत. ‘कलाश्रय’ प्रकल्पही लवकरच साकार होईल.  –  चिंतामणी राहतेकर, अध्यक्ष, श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -