राकेश बापटचे ‘व्हॉट्सॲप लव’ होणार व्हायरल

हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेता राकेश बापट सध्या समाजमाध्यमांमध्ये गाजत असलेल्या त्याच्या ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. राकेश आणि अभिनेत्री अनुजा साठे या दोघांमधील हेच ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरण आज जगजाहीर होणार आहे.

Mumbai
whats app love movie releasing now
राकेश बापटचे ‘व्हॉट्सॲप लव’ होणार व्हायरल

व्हॉट्सॲप माहीत नाही असा एकही माणूस भारतात शोधून सापडणार नाही. एक प्रकारे व्हॉट्सॲप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजचा, स्मायलीचा किंवा इमोजीचा अर्थ आपण आपल्या सोयीने घेत असतो. बहुतांशवेळा त्यामुळे अनेक समज-गैरसमज निर्माण होतात आणि पुढे प्रसरण पावतात. व्हॉट्सॲपमुळे संवाद सहज शक्य झाल्याने प्रेमभावना व्यक्त करणंही खुप सोपं झालंय. एखाद्याकडून आलेला पहिला “HI” असा मेसेजही समोरच्या भिन्नलिंगी व्यक्तिला बरेच सिग्नल देतो. आणि पुढे जे काही घडतं त्यालाच ‘व्हॉट्सॲप लव’ म्हणतात. हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेता राकेश बापट सध्या समाजमाध्यमांमध्ये गाजत असलेल्या त्याच्या ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. राकेश आणि अभिनेत्री अनुजा साठे या दोघांमधील हेच ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरण आज जगजाहीर होणार आहे. फक्त अनुजा साठेच नाही तर इराणहून भारतात थिएटर आर्ट्स शिकण्यासाठी आलेली पर्शियन अभिनेत्री सारेह फर, हिंदी कार्यक्रमांची सुत्रसंचालिका पल्लवी शेट्टी या दोघीही या प्रकरणाचा भाग आहेत. आणि त्यांच्या जोडीला अनुप चौधरी आणि अनुराधा राजाध्यक्ष आदी कलावंतही व्हॉट्सॲप लव प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

काय आहे ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरण?

व्हॉट्सॲप लव हे प्रकरण म्हणजे आजपासून प्रदर्शित होणारा एच.एम.जी एंटरटेनमेन्ट निर्मित आणि जम्पिंग टोमॅटो प्रस्तुत ‘व्हॉट्सॲप लव’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा ही जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात या न त्या मार्गाने घडत आहे. सुखासिन आयुष्य जगणाऱ्या साध्या सरळ माणसाच्या आयुष्यात एका अनोळखी व्यक्तिकडून व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजमुळे कसे बदल होत जातात? आणि पुढे त्याचे रुपांतर कशात होते आणि परिणाम काय होतात? हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. संगीत या सिनेमाचा आत्मा आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, जावेद अली, श्रेया घोषाल, पायल देव, सुफि गायक शबाब साबरी आदींनी स्वरसाज चढविला आहे. अजिता काळे आणि साहिल सुल्तानपुरी यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना नितीन शंकर यांनी संगीतबद्ध केले आहे. कॉन्सर्ट किंग म्हणून संगीत विश्वात ओळखले जाणारे हेमंतकुमार महाले यांची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला तसेच अजिता काळे यांची पटकथा-संवाद असलेला ‘व्हॉट्सॲप लव’ ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्याने टीपला आहे. आणि तो मोठ्या पडद्यावर पाहणं स्वत:लाच ट्रीट देण्यासारखं आहे.

व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे प्रकरण होऊ शकते. खासकरून प्रेमात पडलेल्या, पडू इच्छिणाऱ्या आणि विवाहीत असलेल्या प्रत्येकाने या व्हॉट्सॲप पासून कसे सावध राहायला हवे, जेणेकरून त्यांच्या मधुर संबंधामध्ये मीठाचा खडा पडणार नाही, हे या चित्रपटात अत्यंत गमतीदार पद्धतीने मांडण्यात आले आहे, त्यामुळे प्रत्येक व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांनी हा सिनेमा अवश्य पाहावा.
– कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता हेमन्तकुमार महाले

हेही वाचा – Video: खिलाडीकुमार अक्षयच्या ‘मिशन मंगल’चा टिझर आऊट