घरमनोरंजनराजेश वैविध्यपूर्ण कलांचा संगम

राजेश वैविध्यपूर्ण कलांचा संगम

Subscribe

 राजेश देशपांडे लेखक, दिग्दर्शक म्हणून सध्या सांस्कृतिक क्षेत्रात परिचयाचा असला तरी अधूनमधून अभिनय करण्याचा आपला मोह त्याला काही आवरता आलेला नाही. ऑल द बेस्ट, हे वय असच असतं, आमच्या या घरात या नाटकांपासून तर ते अगदी दामिनी, बंदिनी, श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं, मंथन या मालिकेपर्यंत त्याने विविध भूमिका केलेल्या आहेत. वक्त की रफ्तार या हिंदी मालिकेतसुद्धा तो दिसला होता. गंगूबाई नॉन मॅट्रीक या मालिकेतसुद्धा व्यक्तीमत्त्वाची वेगळी रुपे दिसतील असे त्याने पाहिले होते. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक म्हणून आपला प्रभाव दाखवताना कितीतरी प्रतिष्ठेच्या सोहळ्यांना वेगळे आयाम देण्यात त्याचे लिखाण कारणीभूत ठरलेले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘धुडगूस’ या चित्रपटाला अनेक पारितोषिके प्राप्त झाली होती. नंतर त्याने काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. राजेश स्वत: कवी आहे. त्याचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे, त्यामुळे अनेक चित्रपटात त्याची गीत लेखन प्रतिभाही दिसलेली आहे. ‘होते कुरुप वेडे’ हे त्याच्या लेखन, दिग्दर्शनातले नाटक व्यावसायिक रंगमंचावर दाखल झालेले आहे. वैविध्यपूर्ण कलांचा संगम असलेल्या राजेशशी त्यानिमित्ताने साधलेला सुसंवाद.

होते कुरुप वेडे विषयी काय सांगशिल?
इमोशन, ट्रॅजिडी निर्माण करणारे हे गंभीर, तेवढेच विनोदी नाटक आहे. करुन गेलो गाव, सासू माझी ढाँसू, ती फुलराणी ही नाटके केल्यानंतर थोडंस पुढच पाऊल म्हणून थोडे वेगळे लिहिले जावे यादृष्टीने एक वर्ष या नाटकाचा विचार करुन हे नाटक लिहिले गेलेले आहे. या विषयावर पटकन मोकळेपणाने बोलता येत नाही परंतु प्रत्येक माणसामध्ये काही ना काही न्यूनगंड हा दडलेला असतो. बुटकेपणा, काळे रुप, तोतरेपणा या अनुवंशीक गोष्टी आहेत परंतु माणसाला हिणवण्यासाठी त्याचा सर्रास वापर समाजात, मित्रमंडळींत केला जातो. इतकेच काय तर कुटुंबातही अशा व्यक्तीला डावलले जाते. अशा स्थितीत अशा वेगळ्या असणार्या माणसाला कोणाचेतरी व्यक्तीमत्त्व आवडायला लागते. तो इच्छा धरतो आणि कर्मधर्म संयोगाने ती पूर्ण होते. अशा स्थितीत जे वातावरण निर्माण होते, ते म्हणजे ‘होते कुरुप वेडे’ हे नाटक सांगता येईल. संजय नार्वेकर याने माझ्या या विषयाला पुरेपूर न्याय दिलेला आहे.

चित्रपटासाठी काही करणार आहे की नाही?
मी आजवर सहा चित्रपट केलेले आहेत. पण प्रत्येक चित्रपटाच्याबाबतीत काही ना काही घडलेले आहे. त्यातून ‘धुडगूस’ ला पदार्पणातच भरपूर पुरस्कार मिळाले होते. पण चित्रपट प्रदर्शित झाला आणि काही दिवसांतच दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्याचा परिणाम माझ्या चित्रपटावर झाला. साधारण एक चित्रपट लिहायचा झाला तर संपूर्ण वर्ष त्यासाठी द्यावे लागते. नंतर निर्माता शोधणे हा त्यातला एक भाग असतो. निर्मात्याची स्वत:ची अशी एक विचारसरणी असल्यामुळे त्याला जे हवे ते देणार्या लेखकांपैकी मी नाही. शक्यतो मला जे हवे ते करणारा निर्माता मिळाला तर मला लिहायला आवडेल. त्यातूनही दोन चित्रपट मी लिहिलेले आहेत. आता प्रतिक्षा आहे निर्मात्याची.

- Advertisement -

मालिकेच्या बाबतीतसुद्धा असेच म्हणणे आहे का?
‘गंगूबाई नॉन मॅट्रीक’ ही मालिका जेव्हा मी केली त्यावेळी चॅनलवाले फारसे मध्यस्ती करत नव्हते. लेखक, दिग्दर्शक म्हणून मला मुभा दिली होती. त्यामुळे मी ती मालिका उत्तम करु शकलो. रोजच्या जीवनातील समस्या इथे हाताळल्या जात होत्या. मालवणी डे, तुझे माझे जमेना, कॉन्स्टेबल कामना कामतेकर, सतराशे साठ सासूबाई, जाडूबाई जोरात अशा अनेक मालिका मी केल्या. पण आता मालिकेत काय असायला हवे हे ठरवणारी वाहिनीची टीम असते. टीआरपी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे त्याचा मूळ कथेवर जास्त परिणाम होतो. त्यातूनही माझ्यातला लेखक, दिग्दर्शक कसा सांभाळला जाईल हे मी पहात असतो.

पुढे कामाचे स्वरुप कसे असणार आहे?
सध्यातरी जे येईल ते स्वीकारायचे. लेखन, दिग्दर्शन, गीत लेखन, वेळप्रसंगी अभिनय या सार्या गोष्टी माझ्यात आहेत म्हणण्यापेक्षा मला त्या करायला आवडतात. यासाठी मी पु.ल.देशपांडेंना आदर्श मानलेले आहे. त्यांनीही कुठल्या एका क्षेत्राला प्राधान्य दिलेले नाही. ज्याच्यात आनंद त्याला प्राधान्य हा काहीसा स्वभाव मी अंगिकारला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी नोंद घ्यावी अशी गोष्ट माझ्याकडून झालेली आहे. पुढे कोणाकडून होईलच हे सांगता येणे कठीण आहे. अर्थात हे होण्याला त्यावेळची परिस्थिती कारणीभूत आहे हे मला नाकारता येणार नाही. प्रेक्षकांना हवी वाटणारी गंगू ही नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांत दिसली. शिवाय ‘ताई बोले तो गंगूबाई’ या नावानेसुद्धा ही गंगू हिंदी मालिकेतही दिसली होती. एकाचवेळी माझी पाच नाटके चालू होती. त्यात बड्या कलाकारांचा सहभाग होता हेसुद्धा विशेष म्हणावे लागेल. हिमालयाची सावली, गुंतता ह्रदय हे ही जुनी नाटके आणि मी लिहिलेले नवे नाटक याच वर्षात रंगमंचावर येणार आहे.

- Advertisement -

नव्याने येणार्या लेखकाविषयी काय सांगशील?
मालिका, नाटक, चित्रपट यांच्यासाठी लेखन करणारी ‘मानाचि’ लेखक संघटना सध्या कार्यरत आहे. त्यात मी सक्रिय आहे. आम्ही नव लेखकांना लेखनाविषयी मार्गदर्शन करत असतो. मालिकांचे युग सुरु होण्यापूर्वी एकांकिका, दीर्घांक, नाटक, मालिका नंतर चित्रपट असा लेखकाचा टप्पा असायचा पण आता एखाद दुसरी एकांकिका गाजली की त्याला थेट मालिका लिहिण्यासाठीच बोलावले जाते. नवलेखक हा पूर्णवेळ देत असतो शिवाय चॅनलवाल्यांना काय अपेक्षित आहे ते लिहिण्याची त्याची तयारी असते. त्यामुळे या गतीशील प्रवासात अपेक्षित लिखाण होत नाही. नव कलाकारांनी लेखकाची कार्यपद्धत लक्षात घेऊन काम केले तर मालिकांबरोबर त्यांचे भविष्यही उज्ज्वल होईल असे वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -