मानसिक आजार आणि आत्महत्या

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांनाच शारीरिक दुखणे, आजारांना सामोरे जावे लागते. वेळीच उपचार घेऊन आपण त्यावर मात करतो, पण मानसिक आजारांबाबत तसे होताना दिसत नाही. मानसिक आजार वेळीच लक्षात न आल्याने किंवा त्यांकडे दुर्लक्ष केल्याने व्यक्ती मानसिक आजाराची बळी ठरते. मानसिक आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी १० ऑक्टोबर हा दिवस जगभर मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

Mumbai
world mental health day

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांनाच शारीरिक दुखणे, आजारांना सामोरे जावे लागते. वेळीच उपचार घेऊन आपण त्यावर मात करतो, पण मानसिक आजारांबाबत तसे होताना दिसत नाही. मानसिक आजार वेळीच लक्षात न आल्याने किंवा त्यांकडे दुर्लक्ष केल्याने व्यक्ती मानसिक आजाराची बळी ठरते. मानसिक आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी १० ऑक्टोबर हा दिवस जगभर मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जागतिक आरोग्य फेडरेशनच्या पुढाकाराने १९९२ मध्ये प्रथम साजरा करण्यात आला. रोजच्या जीवनात ताणतणावाला सामोरे जात असताना निद्रानाश, उदासीनता, नैराश्य, आत्महत्येचे विचार येणे अशा विविध स्वरूपामध्ये समाजात मानसिक आजार दिसून येतात. आजही आपल्या देशात मानसिक आजारांबाबत जनजागृती झालेली दिसत नाही. परिणामी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित असेल तरच ती व्यक्ती कामाच्या ठिकाणी, घरात, आप्तेष्टांमध्ये वावरताना आत्मविश्वासाने वावरु शकते, पण आत्मविश्वासाच्या अभावी व्यक्तीच्या मनःस्थितीवर परिणाम होऊन त्याच्या वर्तनावर तसेच एकूणच कामावर आणि नातेसंबंधावर परिणाम दिसून येतो. दरवर्षी वर्ल्ड मेंटर हेल्थ फेडरेशनद्वारे या दिनानिमित्त एका विशिष्ट संकल्पनेवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘आत्महत्या रोखा’ या संकल्पनेवर हा दिन साजरा करण्यात येत आहे.
मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये तसेच त्याच्या नातेवाईकांमध्ये मानसिक आजाराबाबत असलेल्या न्यूनगंडामुळे हा आजार लपवून ठेवण्याकडे या लोकांचा कल असतो. परिणामी या आजाराचे प्रमाण वाढत आहे. यामुळे समाजामध्ये विध्वंसक प्रवृत्ती व आत्महत्येच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. रोजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात मानसिक आजाराने ग्रस्त लोकांची संख्या ४५० दशलक्ष आहे. भारतात १.५ दशलक्ष लोकांमध्ये मानसिक आजार आढळतो. २५ टक्के लोकांमध्ये मानसिक आजार आढळतो. चिंतेची बाब म्हणजे हे प्रमाण वाढत आहे. दैनंदिन दिवसातील ताणतणावासोबतच व्यसनाधीनता सुद्धा मानसिक आजाराला कारणीभूत ठरते. दररोज प्रत्येक चाळीस सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य बिघडून आत्महत्या करण्याच्या घटना रोखण्यासाठी समाजामध्ये मानसिक आजार आणि नैराश्य याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आरोग्य सप्ताह व त्या अनुषंगाने सर्व समाजामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता तयार करण्यात यावी असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. यावर्षीचे बोधवाक्य मानसिक आरोग्याविषयी जागरुकता वाढवा व आत्महत्येचे प्रमाण घटविण्यास मदत करा, असे आहे. मानसिक विकारामध्ये व्यक्तीच्या आजुबाजूची परिस्थिती आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये तफावत निर्माण होऊन व्यक्ती आलेल्या परिस्थितीला सामोरी जाण्यास असमर्थ ठरते. अशावेळी व्यक्तीला मानसिक विकार जडतात. मानसिक आरोग्याची गरज लक्षात घेऊन भारत सरकारने १९८२ मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात आले होते, पण आजही भारतात मानसिक आरोग्याबाबत जागृती झालेली नाही. त्यामुळे मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे आवश्यक बनले आहे.