समाजवादाचा उद्गाता

भारतातील समाजवादी नेते जयप्रकाश नारायण हे राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा स्मृतिदिन. ११ ऑक्टोबर १९०२ रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे त्यांचा जन्म झाला.

Mumbai
jayprakash narayan

भारतातील समाजवादी नेते जयप्रकाश नारायण हे राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा स्मृतिदिन. ११ ऑक्टोबर १९०२ रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे त्यांचा जन्म झाला. जन्मगावी प्राथमिक शिक्षण पार पडल्यानंतर पुढे पाटणा येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण पार पडले. वयाच्या १८व्या वर्षी प्रभावती देवी यांच्याशी ते विवाहबंधनात अडकले. त्यांचे सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील प्रसिद्ध वकील आणि एक राष्ट्रीय नेते होते. उच्च शिक्षणासाठी १९२२ मध्ये ते अमेरिकेला गेले. त्या ठिकाणी विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशास्त्रातील एम.ए. पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर १९२९ मध्ये ते भारतात परतले.
अमेरिकेत असतानाच जयप्रकाश यांची मार्क्सवादी विचारांशी ओळख झाली. मार्क्स, लेनिन, ट्रॉट्स्की यांच्या साहित्याचा पगडा त्यांच्यावर पडला. ते कट्टर मार्क्सवादी बनले. भारतात परतल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९३० मध्ये तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी जयप्रकाश यांना काँग्रेसच्या कामगार विभागाच्या प्रमुखपदी नेमले. सत्याग्रह चळवळीच्या दुसर्‍या पर्वात सर्व पुढारी कारावासात असताना जयप्रकाश नारायण यांनी चळवळीची सूत्रे सांभाळली. १९३३ मध्ये त्यांना मद्रासमध्ये अटक झाली. त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाला सामोरे जावे लागले. त्यानंतर १९३४ मध्ये अन्य समाजवादी तरुणांच्या मदतीने त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश यांची या पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमणूक झाली. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी युद्धविरोधाचे आणि स्वातंत्र्य लढा अधिक उग्र करण्याचे धोरण अवलंबले. परिणामी १९३९ मध्ये त्यांना अटक होऊन ९ महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली. १९४१ मध्ये राजस्थानच्या देवळी तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असताना तेथील राजबंद्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी ३१ दिवस उपोषण केले. या उपोषणाद्वारे त्यांनी सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनाला सुरुवात झाली. त्यावेळी बिहारमधील हजारीबाग तुरुंगात असलेल्या जयप्रकाश नारायण यांनी तुरुंगाच्या भिंतींवरून उडी मारून ते फरारी झाले. त्यानंतर ते भूमिगत संघटनेचे नेतृत्व करू लागले. त्यावेळी सरकारने त्यांना पकडून देणार्‍यास इनाम जाहीर केले. १७ सप्टेंबर १९४३ रोजी अमृतसर रेल्वे स्थानकावर त्यांना पकडण्यात आले. १९४६ साली त्यांची सुटका झाली. ब्रिटिशांच्या वाटाघाटीला, त्यांनी नेमलेल्या संविधान परिषदेला आणि देशाच्या फाळणीला जयप्रकाश यांचा विरोध होता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर जयप्रकाश यांनी १९४८ मध्ये अन्य सहकार्‍यांच्या मदतीने स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९४८ ते १९५० च्या दरम्यान त्यांनी कामगार व किसान संघटनेकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या प्रयत्नामुळे हिंद मजदूर सभा, हिंद किसान पंचायत या संघटना स्थापन झाल्या. १९५२ मध्ये आचार्य कृपलानी यांचा कृषक मजदूर प्रजा पक्ष व समाजवादीपक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रजासमाजवादी पक्ष अस्तित्वात आला, पण पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षाचा पराभव झाला. दरम्यान, टपाल व तार खात्यातील संबंधित मंत्र्यांच्या वचनावर विश्वास ठेवून कामगारांचा संप मागे घेतला, पण मंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने जयप्रकाश अस्वस्थ झाले. त्यानंतर पुण्यात उपोषण करत त्यांनी जाहीररित्या मार्क्सवादाचा त्याग केला. १९५३ नंतर विनोबाजींच्या भूदान आंदोलनात त्यांनी भाग घेण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी पक्षीय राजकारणाला अलविदा म्हटले. १९५४ ते १९७२ या कालावधीत ते भूदान आंदोलनातच मग्न होते. १९७० पासून भूदान आंदोलनाबद्दल त्यांना असमाधान वाटू लागले. भूदान आंदोलनात केवळ अनुनयावर भर आहे, पण त्यांतून फलनिष्पत्ती होत नाही, असे त्यांना वाटू लागले.
१९६५ मध्ये त्यांना शांतता कार्याबद्दल रेमन मॅगसेसे हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २५ जून १९७५ पासून देशात आणीबाणी जाहीर झाली. यावेळी त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आले. पुढे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. ८ ऑक्टोबर १९७९ रोजी त्यांचे निधन झाले.