समाजसुधारणेसाठी व्रस्तस्थ लोकहितवादी!

एकोणिसाव्या शतकातील मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक रावबहादूर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा आज स्मृतिदिन. लोकहितवादी या टोपणनावाने त्यांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. १८ फेब्रुवारी १८२३ रोजी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झाला.

Mumbai
Gopal_Hari_Deshmukh

एकोणिसाव्या शतकातील मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक रावबहादूर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा आज स्मृतिदिन. लोकहितवादी या टोपणनावाने त्यांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. १८ फेब्रुवारी १८२३ रोजी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झाला. कोकणातील वतनदार घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव सिद्धये असे होते. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रुढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. गोपाळराव देशमुख यांना ग्रंथसंग्रह करण्याची आणि वाचनाची आवड होती. त्यातही इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. इतिहास विषयावर त्यांनी दहा पुस्तके लिहिली आहेत. १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांमध्ये गोपाळ हरी देशमुख हे एक होते. मराठी शाळेत शिक्षण सुरू असतानाच त्यांनी इंग्रजीचे धडे गिरवले. वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते सदर अदालतीची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९६२ मध्ये ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक, सातारा येथील न्यायालयात काम केले. लोकांनी ज्ञानी व्हावं, जुन्या रुढी परंपरांना बाजूला ठेवावं, त्याप्रमाणेच इंग्रजी भाषेवर असावं, असे लोकहितवादींना नेहमी वाटायचं. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबर तंत्रज्ञान आणि नानाप्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती.
रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी १८४२ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी ‘हिंदुस्थानचा इतिहास’ हे पुस्तक लिहिले, पण पुस्तकाचे प्रकाशन १८७८ मध्ये झाले. १८४८ पासून त्यांनी मुंबईतून निघणार्‍या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लेखन करण्यास सुरुवात केली. या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्राद्वारे लेखन केले. अशाप्रकारे १८४८ ते १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान’ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. ‘मातृभाषेतून शिक्षण’ या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर हेन्री ब्राउन यांच्या पुढाकाराने गोपाळरावांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला. गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते. ९ ऑक्टोबर १८९२ मध्ये या थोर समाजसुधारकाचे निधन झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here