घरफिचर्ससुशांतचे मारेकरी कोण ?

सुशांतचे मारेकरी कोण ?

Subscribe

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे, याप्रकरणात आधी नेपोटीजमचा मुद्दा गाजला, नंतर रिया चक्रवर्ती आणि मग दिशा, पण संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक आरोप झाले ते मुंबई पोलिसांवर आणि त्यांच्या तपास पद्धतीवर, हायप्रोफाईल केसेसमध्ये पोलिसांची भूमिका फार महत्वाची असते, त्यातल्या त्यात जिथे मीडियाचे कॅमेरे पोलिसांवर असतात तिथे प्रत्येक पाऊल विचार करून ठेवणे पोलिसांकडून अपेक्षित असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय, म्हणून सर्वात आधी पोलिसांची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. तपासातील प्रगती मीडियासोबत शेअर करू नये हे मान्य आहे, पण ज्या तपासात स्टेटमेंट बाहेर येतात तिथे आपल्या बचावासाठी पोलिसांनी भूमिका स्पष्ट का केली नाही? पोलिसांवर असे आरोप लावले गेले आहेत, ज्या आरोपांचं खंडन होणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा यालाच जोडून आहे, तो म्हणजे राजकारण. सुशांत प्रकरणाचा राजकीय पुढार्‍यांनी पुरेपूर फायदा घेतला आहे. याचसोबत मीडियाने आपला टीआरपी वाढवण्यासाठी या प्रकरणाचा हवा तसा वापर केला आहे. त्यामुळे सुशांतचे मारेकरी कोण, याचा शोध घेणे अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

सामान्य माणूस गेला की दुःख होतं आणि स्टार गेला की बातमी… सध्याच्या काळात जिथं बातमी बनवावी लागते, तिथं स्टारचं जाणं मीडियासाठी मुद्दा बनतो. जिथे मूळ मुद्दे बाजूला ठेऊन थुकरट मुद्यांना हवा दिली जाते, तिथे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चा होणे साहजिक आहे. पण ती चर्चा जर दीड महिने चालत असेल आणि चर्चेच्या नावाखाली स्वतःच्या वेगळ्या थिअरीज समोर आणून मूळ मुद्याला बाजूला सारलं जात असेल, तर एकदा विचार करायला हवा. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला जितकी वळणं मिळाली आहेत, त्या सर्वांवर प्रत्येक जण आपापल्यापरीनं बोलतो आहे आणि आपलं मत मांडतो आहे. पण थिअरिजच्या भाऊगर्दीत मूळ मुद्दा बाजूला राहिलाय, सुशांत सिंह राजपूत प्रकरण मीडियामध्ये इतका काळ का गाजतंय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचं उत्तर आहे की लोकांना इंटरेस्ट असलेले सर्व विषय हे एकट्या सुशांत सिंह प्रकरणात आहेत. सिनेमा, राजकारण, क्राईम आणि स्त्री हे असे विषय आहेत, ज्यात भारतीय नागरिकांना सर्वाधिक रस असतो. सुशांतच्या बाबतीत हे चारही विषय असल्याने साहजिकच माध्यमांनी याला उचलून धरलंय. आज हे लिहिताना मी स्वतःची कुठली एक थिअरी इथे मांडणार नाहीये, ना कुणाचं समर्थन वा विरोध करणार आहे. केवळ ज्या थिअरीज सांगितल्या गेल्या आहेत किंवा जी वळणं या प्रकरणाला सुरुवातीपासून आजपर्यंत मिळाली आहेत, त्यांची सत्यता आणि प्रासंगिकता दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

सुशांतच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे, याप्रकरणात आधी नेपोटीजमचा मुद्दा गाजला, नंतर रिया चक्रवर्ती आणि मग दिशा, पण संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक आरोप झाले ते मुंबई पोलिसांवर आणि त्यांच्या तपास पद्धतीवर, हायप्रोफाईल केसेसमध्ये पोलिसांची भूमिका फार महत्वाची असते, त्यातल्या त्यात जिथे मीडियाचे कॅमेरे पोलिसांवर असतात तिथे प्रत्येक पाऊल विचार करून ठेवणे पोलिसांकडून अपेक्षित असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय, म्हणून सर्वात आधी पोलिसांची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

पोलीस प्रशासन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण

14 जून रोजी सुशांत सिंहने आत्महत्या केली ही बातमी ज्या घाईने माध्यमांवर झळकली, तिथूनच काहींना पोलिसांवर संशय घेण्यासाठी जागा मिळाली. पोलिसांनी कुठलीही अधिकृत घोषणा करण्याआधीच बातमी घटनास्थळावरून बाहेर आली आणि मीडियात झळकली, हायप्रोफाईल केसेसमध्ये मीडियाला इंटरेस्ट अधिक असल्याने शक्य तितकी गुप्तता बाळगली पाहिजे, पोलिसांनी प्राथमिक माहिती गोळा करण्याआधीच ही बातमी माध्यमांच्या हाती लागण्यास प्रशासनातील काही लोक जबाबदार आहेत. अशा प्रकरणांच्या तपासात एक चूक किंवा एक छोटी अफवा बातमी बनण्यासाठी पुरेशी असते, सुशांत प्रकरणात ही चूक पोलीस प्रशासनाकडून झाली. आता दुसरा आरोप होतोय तो मुंबई पोलीस योग्य रीतीने तपास करत नाहीयेत आणि सुशांतच्या मृत्यूबाबत बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीयेत असा, यातही काही गोष्टी आहेत ज्या आधी आपण समजून घ्यायला हव्यात, सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मिक मृत्यूची नोंद वांद्रे पोलीस ठाण्यात झाली होती. म्हणून तिथे एफआयआर ऐवजी एडीआर फाईल करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने तपास सुरू झाला, याउलट बिहारमधील पाटणा पोलिसात सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केला ज्यानुसार बिहार पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

आता कायद्यानुसार सुशांतच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांव्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही. कारण घटना ही मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात झालेली आहे. (याला अपवाद सीबीआय किंवा तत्सम संस्था आणि दिल्ली पोलीस आहेत, जे देशातील कुठल्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास करू शकतात, पण बिहार पोलीस सुशांतच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात करू शकत नाहीत.) बिहारचे पोलीस मुंबईमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची तपासणी करण्यासाठी आलेले नाहीत, तर रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा जो आरोप त्याच्या वडिलांनी लावला आहे, त्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आले आहेत. या दोन केस मुळातच वेगळ्या आहेत. मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची प्राथमिक चौकशी घटनेनंतर केलेली होती. पण ती चौकशी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपावरून केलेली नसून, जी कारणं आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आधी मुंबई पोलिसांच्या लक्षात आली होती, उदाहरणार्थ सुशांतच्या फिल्म करिअरमध्ये त्याला बाधा आणणारे लोक, अपयशाला जबाबदार असलेले लोक याबद्दल रियाची चौकशी झाली. आता मुंबई पोलिसांनी एडीआरऐवजी एफआयआर दाखल केला असता, तर कदाचित वेगळ चित्र पाहायला मिळालं असतं. या केसमध्ये घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना शहर सोडून जाण्याची परवानगी मिळाली, सिद्धार्थ (सुशांतचा मित्र) बंगलोरला गेला. क्राईम सिन जो इतर कुठल्या वेळी किमान महिनाभर सील असतो, तो इकडे तीन दिवसात मोकळा झाला. हायप्रोफाईल केस जी मीडियामध्ये गाजते आहे, ज्या केसमध्ये देशातील कोट्यवधी जनतेला इंटरेस्ट आहे, अशावेळी हलगर्जीपणा महाग पडू शकतो, हे बहुधा मुंबई पोलिसांच्या लक्षात आले नाही.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. सुशांत सिंह राजपूत केस प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी माहिती दिली. पत्रकार परिषदेत ते एका पत्रकारावर थोडे चिडलेदेखील. त्याला कारण तसंच होतं म्हणा, गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये मुंबई पोलिसांच्या कार्यशैलीवर बरीच चिखलफेक सुरू आहे. त्यातच सुशांत सिंहच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती प्रकरणी, मुंबई पोलिसात तक्रार दाखल न करता किंवा पोलिसांना साक्ष देताना या प्रकरणाचा उल्लेख न केल्याने, त्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नव्हता का? असा प्रश्न पोलिसांना विचारला जात आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी 50 हून अधिक जणांचे जबाब नोंदविले आहेत, त्यापैकी अनेक मोठ्या व्यक्ती होत्या ज्यांचे ऑफिशियल स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाले, पोलिसांना दिलेले स्टेटमेंट व्हॉट्सअ‍ॅपवर पाहायला मिळत असेल, तर अशा वेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच प्रश्न उभे राहणार. त्यातच पोलिसांना स्टेटमेंट देताना आणि बाहेर मीडियासोबत बोलताना अनेक व्यक्तींनी त्यांचे जबाब बदलले, ज्यामुळे पोलिसांनादेखील तपास करताना अडचण आली.

मीडियाच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांवरचा दबाव वाढला, ज्या व्यक्ती पोलिसांना उपलब्ध झाल्या नाहीत त्या खुलेआम टीव्हीवर मुलाखती देत होत्या. ज्या व्यक्तींची चौकशी पोलिसांनी करणे अपेक्षित होते, त्या व्यक्ती चॅनेलवरील चर्चेत आपली मते मांडत होत्या, हे कसं घडलं? सुशांतसोबत तीन वर्षांपूर्वी काम करणारा कर्मचारी चॅनेलवाल्यांना मिळतो आणि तो काही महत्त्वाचे खुलासेदेखील करतो. ज्यातून केसचे रूप पलटू शकत होते, मग या व्यक्ती पोलिसांकडे का उपलब्ध होत नव्हत्या? आणि जर झाल्या असतील तर त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी काय अ‍ॅक्शन घेतली? एडीआरऐवजी एफआयआर फाईल केली का ? असे अनेक प्रश्न आहेत. तपासातील प्रगती मीडियासोबत शेअर करू नये हे मान्य आहे, पण ज्या तपासात स्टेटमेंट बाहेर येतात तिथे आपल्या बचावासाठी पोलिसांनी भूमिका स्पष्ट का केली नाही? पोलिसांवर असे आरोप लावले गेले आहेत, ज्या आरोपांचं खंडन होणं गरजेचं आहे. पण हा फक्त एक पैलू झाला ज्याबद्दल चर्चा सुरू आहे, आता दुसरा मुद्दा यालाच जोडून आहे, तो म्हणजे राजकारण.. सुशांत प्रकरणाचा राजकीय पुढार्‍यांनी पुरेपूर फायदा घेतला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि राजकारण

मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाण्यातही राजकारण्यांचा कोणी हात पकडू शकत नाही, अशा आशयाची एक म्हण आमच्याकडे प्रचलित आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर असाच काहीसा प्रकार राजकारणातही पाहायला मिळाला. कदाचित पोलीस प्रशासनावरील आरोपामुळे आणि मीडियात असलेल्या चर्चेमुळे राजकारण्यांना या प्रकरणात मुद्दा दिसला. संधीचं सोनं कसं करावं हे आपल्या पुढार्‍यांपेक्षा अधिक कुणालाही जमत नाही आणि तसंच घडलं. बिहारच्या पुराबद्दल ब्र देखील न काढणारे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार, सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची भाषा करू लागले. महाराष्ट्र सरकार याप्रकरणी योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला, मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीत, असेही ते म्हणाले. यात भर की काय म्हणून बिहारचे एक मंत्री महेश्वर हजारी यांनी तर कुठल्याही पुराव्याशिवाय रिया चक्रवर्तीला चक्क विषकन्या असं संबोधलं. न्यायालयाआधी निर्णय सुनावण्याची माध्यमांची सवय, बहुदा राजकारण्यांनादेखील लागली असावी.

बिहारची विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना तेथील युवकांना आणि सुशांतच्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारची विधानं करून तो मुद्दा एनकॅश करण्याचा नितीश कुमार यांचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातदेखील या प्रकरणावरून राजकारण तापलेले दिसते, नारायण राणे असोत किंवा भाजपाचे इतर नेते. त्यांनी ठाकरे सरकारला या प्रकरणावरून चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारचा भाग असणार्‍या राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांनीदेखील आपली फॅन फॉलोइंग वाढविण्यासाठी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. सुशांतसिंह राजपूत हा बॉलिवूडमध्ये नव्याने करियर करू इच्छिणार्‍या लाखो तरुणांचा चेहरा होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांना दुःख झाले आहे, पण तेच दुःख आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रकार राजकारणी, टीव्ही मीडिया आणि काही विशिष्ट लोकांनी सुरू केलाय.

रिया चक्रवर्ती, दिशा आणि सुशांत सिंह राजपूत

सुशांत सिंहच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, मीडियामध्ये तिच्याविरोधात अनेक आरोप लावले गेले आहेत. सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असल्यापासून ते जादूटोणा करेपर्यंत आणि पंधरा कोटी रुपये हडपल्यापर्यंत विविध आरोप मीडियाने रियावर लावले आहेत. पटना पोलिसांनी याप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशीदेखील सुरू केलीये, पण त्यांचा तपास पूर्ण होण्याआधीच रियाला माध्यमांनी आरोपी सिद्ध केलंय. या प्रकरणात सत्य काय हे चौकशीनंतर समजून येईलच, पण पुराव्याशिवाय अशा प्रकारचे आरोप माध्यमांनी लावणे योग्य नाही. कदाचित हे आरोप खरे असू शकतील, पण तरीही न्यायालयाच्या निर्णया अगोदर आरोपीला दोषी ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. सुशांतच्या मृत्यूच्या अगोदर काही दिवसांपूर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशाचा मृत्यू झाला होता, या दोघांच्या मृत्यूचे काहीतरी कनेक्शन आहे, अशी एक थिअरी माध्यमावर दाखवली गेली. याबाबत कुठलाही ठोस पुरावा पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने, सत्य अजून बाहेर आलेले नाही. पण जशा काही चुका सुशांतच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासामध्ये घडल्या होत्या, तशाच काही चुका या दिशा प्रकरणामध्येदेखील घडल्या आहेत. मध्यंतरी सोशल मीडियावर एक पोस्ट माझ्या वाचनात आली, ज्यामध्ये अनेक व्यक्तींवर सुशांतच्या हत्येचे आरोप लावण्यात आले होते. ज्यात खुद्द आदित्य ठाकरेंवरदेखील आरोप लावण्यात आले होते.

रिया चक्रवर्तीने कशाप्रकारे सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले, नव्हे नव्हे तर तिनेच सुशांतची हत्या केली, असेही एका पोस्टमध्ये वाचले होते. अशा काही घटनानंतर प्रत्येकामधील शेरलॉक होम्स जागा होतोच, पण कथांच्या आधारावर कुणाला न्याय मिळू शकत नाही आणि याप्रकरणी ज्या कथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्याच कथा जर एखाद्या सिनेमाच्या निर्मात्याला मिळाल्या, तर त्यावर एक सुंदर मसाला चित्रपट बनू शकतो, अशा त्या आहेत. बाकी व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या फॉरवर्डमध्ये नसतं, तसंच त्या पोस्टमध्ये देखील काहीही तथ्य नव्हतं.

नेपोटिजम आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सर्वात आधी ज्या मुद्याची चर्चा झाली किंवा मुंबई पोलिसांनी ज्या विषयाबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली होती, त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सिनेसृष्टीतील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून सुशांतने आत्महत्या केली का? त्याच्या मृत्यूनंतर सुरुवातीचे काही दिवस, केवळ बॉलिवूडच्या काही लोकांवर त्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे आरोप लावण्यात आले. हॅशटॅग चालवले गेले. याप्रकरणी अनेकांची चौकशीदेखील मुंबई पोलिसांनी केली. आदित्य चोपडा, संजय लीला भन्साळी, कंगना रानौत यांसारख्या फिल्म इंडस्ट्रीमधील महत्त्वाच्या लोकांची चौकशी झाली. कंगना रानौत हिने त्याच्या मृत्यूनंतर प्रथमतः एका व्हिडिओच्या माध्यमातून बॉलिवूडमधील काही लोकांना सुशांतच्या मृत्यूला जबाबदार ठरवले. त्यानंतर अनेकांनी तिचे समर्थन केले. सामान्य प्रेक्षकांनी आणि सुशांतच्या चाहत्यांनी स्टार किड्सला ट्रोल केले. त्यांना सोशल मीडियावर अनफॉलो करण्यात आले. इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी तर या नेपोटिजमच्या नावाखाली, आपले वैयक्तिक वाददेखील चव्हाट्यावर आणले. पण सुशांतच्या मृत्यूला सिनेसृष्टीतील काही लोक जबाबदार होते का ? याबद्दल कुठलेही ठोस पुरावे सध्या पोलिसांकडे उपलब्ध नाहीत. अनेकवेळा मूळ विषय भरकटविण्यासाठी वेगवेगळे मुद्दे निर्माण केले जातात. कधीकधी मोठ्या माशांना वाचविण्यासाठी छोट्या माशांचा बळी दिला जातो. सुशांतच्या बाबतीत ही शक्यतादेखील नाकारून चालणार नाही. ज्याप्रकारे संपूर्ण तपासाचा फोकस अचानक बदलला गेला आणि ज्या पद्धतीने माध्यमांच्या भाषेत बदल झाला, त्यावरूनही संशय निर्माण होण्यासाठी जागा आहे.

या संपूर्ण प्रकरणात माध्यमांची भूमिका ही फार महत्त्वाची राहिली आहे. सोयीनुसार ब्रेकिंग न्यूज न मिळाल्यास सुशांत केस प्रकरणी कुठलीही बातमी ब्रेकिंग न्यूज करून त्यांनी स्वत:च्या टीआरपीची संपूर्ण काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले. राफेल आणि राम मंदिर असे दोनही टीआरपी देणारे विषय संपल्यानंतर त्यांना याच मुद्याकडून अपेक्षा होती आणि 12 तास सलग हे पाहून आपण सर्व त्यांच्या फायद्याच्या अपेक्षेप्रमाणे वागलो आहोत. आतापर्यंत गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा वापरली जात असे, त्यांच्याकडून नाही झालं तर सीबीआयसारख्या यंत्रणांची मदत घेतली जात असे, पण ज्या पद्धतीने या केसमध्ये टीव्ही मीडियाने अभ्यास केलाय, त्यावरून तर भविष्यात एखादी केस जर सीबीआय सोडवू शकली नाही, तर ती चॅनेलवाले सोडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे आणि ती पूर्ण ही होईल, पण यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्या यंत्रणेमधील त्रुटी, राजकारण, माध्यमांचा खरा चेहरा, सिनेसृष्टीतील वास्तव आणि समाज म्हणून आपलं प्रचंड प्रतिक्रियावादी असणं समोर आलंय, जे जास्त दाहक आहे.

-अनिकेत म्हस्के 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -