आंधळ्याच्या गाई

रघु एकदा सकाळी गुरं घेऊन गेला की, संध्याकाळी बरोबर सूर्यास्ताला परत घेऊन येत असे. लोकांना त्याच्या कामगिरीचे कौतुक होतं, पण त्याचबरोबर त्या लोकांना हा आंधळा माणूस आपली गुरं कशी सांभाळत असेल याचं कुतुहूल होतं. म्हणून एक दिवस गावातले टवाळखोर लोक सकाळी त्याच्या मागावर गेले. रघुला आपल्याबरोबर कोण आले आहेत हे कळत नव्हतं. रघु गुरांना घेऊन रानात आला. आणि नेहमीप्रमाणे एका झाडाच्या खाली बसला. टवाळखोर त्याच्या मागावर होतेच....ते रघु नक्की गुरे कशी राखतो ते बघत होते. रघु झाडाखाली बसून होता. पण गुरांच्या बरोबर कोणीतरी होता, रघु जर इथे बसला तर गुरांबरोबर कोण ? ..... ह्या आंधळ्याच्या गाई कोण राखत असेल ? .... ह्या आंधळ्याच्या गाई देव राखतो.

Mumbai
Vaibhav satam lekh photo

मे महिन्याच्या सुट्टीतली रात्र, सगळ्यांची जेवणं आटोपली की, आम्ही मुलं खळ्यात चोपाळ्यावर बसून गावगजाली ऐकत बसू. खळ्यात रात्रीच्या त्या मिट्ट काळोखात छान हवा यायची. समोरच्या फणसाच्या झाडातून वारा वाहत खळ्यात थांबायचा. एकदा असा वारा वाहू लागला की, समोरच्या बिटकीच्या बिटक्या टपाटप खाली पडत, त्याचं वेळी खळ्यात गजालींना पूर येई.

आमचे मोठे चुलते-त्यांना आम्ही सर्वजण दादा म्हणायचो-ते तर जगन्मित्र. संध्याकाळी गावातला कोणी त्यांना भेटायला आला की, जेवणाची वेळ होत आली तरी दादांच्या आणि भेटायला आलेल्या माणसाच्या गप्पा पूर्ण होत नसतं. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली की, काकी बाहेर येऊन जेवक वाडू काय वो ? असं विचारत बाहेर यायची. तेव्हा दादा काकीला उद्देशून …..गो ..आयक, ह्यो सोन्यासारखो माणूस इलो हा ….त्याका पण दोन घास वाड…..काकी आत जायची दोघांची पान मांडायची. दोघांची जेवणं झाली की, पुन्हा गप्पा सुरु ….आम्ही ह्या गप्पा ऐकत बसू. त्या गप्प्पात अशाच कोणत्या माणसाने गजाल सांगितली. ती गजाल लक्षात राहिली ती कायमची.

त्याचं असं झालं की, दादांना भेटायला आलेला कोणी माणूस रात्री जेवला आणि घरी जाऊन काय करणार …? घरी कोण नसणार …. त्यापेक्षा इथेच राहू म्हणून खळ्यात पथारी पसरून तो पडला. आम्हा पोरांना गप्पा मारताना बघून येवा हकडे मी तुमका गोष्ट सांगतय…. माणूस तसा गप्पिष्ट होता. मघाशीच दादांबरोबर अख्खी संध्याकाळ त्या माणसाने गप्पांचा फड रंगवला होता. त्यामुळे ह्या माणसाची गोष्ट ऐकायला हवीच…असे वाटून आम्ही त्या माणसाच्या पुढ्यात कोंडाळे करून बसलो.

गोष्ट सुरू झाली. त्याचं असं झालं. कोकणातल्या त्या गावात कोणी सीताराम आणि जानकी म्हणून शेतकरी दांपत्य रहात होतं, त्यांना रघु नावाचा मुलगा होता. घरातली परिस्थिती तशी बेताचीच. त्यात हा मुलगा जन्मांध होता. त्यामुळे ह्याचा शेतीच्या कमी काही उपयोग होणार नाही असं सीतारामला नेहमी वाटायचे. तरीपण निदान रघुने वाड्यातली गुरं तरी सांभाळावी अशी त्याची अपेक्षा होती….तेव्हा सीतारामने ह्या रघुला रोज रानात गुरं राखण्याची कामगिरी सोपवली. त्याप्रमाणे रघु रोज गुरं घेऊन रानात जाऊ लागला …. ह्या आंधळा गुरं राखतो कसा हे एक मोठ्ठ कोडं सर्वाना होतं.

हळूहळू लोक आपली गुरंदेखील रघुकडे सुपूर्द करू लागले. रघु एकदा सकाळी गुरं घेऊन गेला की, संध्याकाळी बरोबर सूर्यास्ताला परत घेऊन येत असे. लोकांना त्याच्या कामगिरीचे कौतुक होतं, पण त्याचबरोबर त्या लोकांना हा आंधळा माणूस आपली गुरं कशी सांभाळत असेल याचं कुतुहूल होतं. म्हणून एक दिवस गावातले टवाळखोर लोक सकाळी त्याच्या मागावर गेले. रघुला आपल्याबरोबर कोण आले आहेत हे कळत नव्हतं. रघु गुरांना घेऊन रानात आला. आणि नेहमीप्रमाणे एका झाडाच्या खाली बसला. टवाळखोर त्याच्या मागावर होतेच….ते रघु नक्की गुरे कशी राखतो ते बघत होते. रघु झाडाखाली बसून होता. पण गुरांच्या बरोबर कोणीतरी होता, रघु जर इथे बसला तर गुरांबरोबर कोण ? ….. ह्या आंधळ्याच्या गाई कोण राखत असेल ? …. ह्या आंधळ्याच्या गाई देव राखतो.

त्या माणसाची गोष्ट संपली …आम्ही ऐकणारी मुलंच होतो ….त्यांच्या गोष्टीला हसू लागलो. तो माणूस नाराज झाला. आम्ही आपलं कायव आसा तुमची गोष्ट ….अशा जगातल्या सगळ्या आंधळ्या लोकांची ढोरा देव राखीत तर बगूक नुको. आमच्या ह्या बोलण्यावर दादा म्हणाले आरे, ही पोरा आचरट हत…तू झोप बगू ….तो माणूस झोपून गेला. पण कोकणातल्या गावागावात जुन्या लोकांनी ही लोककथा अशीच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पोचवली आहे. पण मला ही लोककथा आता का आठवली याला तसाच एक प्रसंग कारणीभूत आहे.

जून महिन्यातला पहिला पाऊस सुरु झाला. हल्ली कोरोना प्रकरणामुळे कुठे बाहेर येणे नाही की, जाणे नाही. घरात बसून ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्याने बाहेरच्या दुनियेशी तसा संबंध येत नव्हता, टीव्हीवर किंवा मोबाईलवर कोरोनाच्या बातम्या. क्वचित पावसाच्या बातम्या. घरात बसून अगदीच कंटाळा आला तर बाहेर दूध किंवा भाजी आणायच्या निमित्ताने शहराच्या एका टोकापर्यंत चालत जाऊन बाहेर नक्की काय चाललं आहे याचा अंदाज घेता येत होता. असाच एका संध्याकाळी घरातून बाहेर पडलो, रस्ता ओलांडून चालत राहिलो. स्टेशनच्या मागच्या बाजूला तीन चार झोपड्या बांधल्या होत्या. झोपडीच्या समोरच्या बाजूला तीन चार पुरुष निवांत बसले होते. त्यांच्या स्त्रिया तिथेच चूल मांडून काही स्वयंपाक करत होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असं दृश्य जिकडे तिकडे बघायला मिळत होतं. पुढचे दोन तीन दिवस मुंबई, नवी मुंबई भागात पुष्कळ पाऊस पडला. टीव्हीवर सगळीकडे जनजीवन कसं विस्कळीत झालं याच्या बातम्या बघायला मिळत होत्या. अनेक घरात पाणि शिरलं होतं. आधीच कोरोनाची महामारी, त्यात पावसाचे निमित होऊन लोक रस्त्यावर आले होते. तिसर्‍या दिवशी पावसाचा जोर थोडा कमी झाला . तसा मी घराच्या बाहेर पडलो आणि पुन्हा चालत स्टेशनच्या मागच्या बाजूला आलो ….बघतो तर त्यादिवशी ज्या झोपड्या उभारल्या होत्या, त्या सगळ्या त्या पावसात कोसळून गेल्या होत्या.

ती जाग उताराची आहे, त्या भागात पाणी साचून रहात. खाली मोठा नाला आहे. ते दृश्य बघून मला वाटलं त्या दोन दिवसाच्या तुफानी पावसात ह्या माणसांचे नक्की काय झालं असेल….? .त्यांच्या मुलांचे काय झालं असेल ? , वरून येणार्‍या पाण्याच्या लोटामुळे ही माणसं नाल्यात वाहून तर गेली नसतील ?. त्या नाल्याच्या काठावरच्या झोपड्या बघून मला ही शंका आली. माझ्या मनात भुंगा गुणगुणू लागला.आजूबाजूला कोणी दिसेना, कोणाला विचारणार ? ….तसाच घरी आलो….रात्री अंथरुणावर पडल्यावर मला डोळ्यासमोर, त्या झोपड्या दिसू लागल्या… वरून येणार्‍या पाण्याच्या झोताबरोबर त्या झोपड्या नाल्यात वाहून गेल्या आणि त्या बरोबर ती माणसं, मुलं यांचा काय आक्रोश झाला असेल …अशा अनेक शंका मनात येऊ लागल्या. डोळ्यावरची झोप उडाली.

दुसर्‍या दिवशी पाऊस थांबला. तसा पुन्हा घरातून बाहेर पडून, तिकडेच स्टेशनजवळ आलो. बघतो तर झोपड्या तशा पडलेल्या अवस्थेत होत्या. पण दोन तीन माणसं त्याठिकाणी काम करत होती. मी तिकडे गेलो आणि त्यांना इकडे आठ दिवसापूर्वी झोपड्या होत्या, त्यात माणसं रहात होती ती कुठे गेली असं विचारताच….एवढा पांढरापेशा माणूस ह्या झोपडीतल्या माणसाबद्दल का विचारतो ….अशा नजरेने बघत होता. त्यावर त्यातल्या एका माणसाने ती माणसं होय….परवा जसा पाऊस सुरु झाला तशी ती माणसं झोपडी सोडून स्टेशनच्या आश्रयाला गेली. ती काय हल्ली ट्रेन बंद असल्यामुळे त्यांनी आपला संसार तिकडे मांडला आहे. मी तिकडे बघितलं तर खरंच ती सगळी माणसं तिकीट घराच्या समोरच्या जागेत आपला संसार मांडून बसली होती.

पाऊस आला, तसा पाण्याचा लोट त्यांच्या झोपडीत जाऊन झोपड्या कोलमडल्या, पण ही माणसं त्याच्या आधीच स्टेशनच्या आश्रयाला गेली होती. मी तिकडे बघून हसलो. तसा हा माणूस आंधळ्यांच्या गाई देव राखतो साहेब, असं म्हणाला आणि मला लहानपणी ऐकलेली ही लोककथा आठवली. लोककथा कधी जुन्या होतं नाहीत, त्यांच्या घटनेतील प्रसंग हे पुन्हा पुन्हा घडत असतात. पावलोपावली ह्या लोककथा घडत असतात.त्यांचा अन्वयार्थ ह्या महामारीत लावता येऊ शकतो. त्याक्षणी मला मधुभाई कर्णिक यांच्या कथेतील सखाराम गवस आठवला, लोककथेत असणारं गारुड मनावरून उतरवता येत नाही हे मात्र खरं !

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here