घरफिचर्स१ कोप चाय...

१ कोप चाय…

Subscribe

माझी एव्हाना भजी संपली होती. चहा कधीचाच झाला होता. थोडीशी शांतता झाली होती. त्यामुळे थोडं तेल ओतावं म्हणून म्हणालो, काका, आता काय होणार वो? हा संत्या काही राडा तर नाही ना करणार? आबा हसत हसत म्हणाले, अरे झिला, कसलो राडो नि कसला काय? हे तकडे गेल्यार हेंका कळतला बघ, की आपले साय्बच कल दुसर्‍या पक्षात गेलेत ते. तेवढ्यात पाटील गुरुजी तिथे चहासाठी येत म्हणाले, अरे बाळा, हे सगळे खेळ आहेत रे यांचे. उंदराला मांजर साक्षी तसला हा खेळ. सगळे एकमेकांंना मिळालेले.

‘चाय की एक चुस्की हरएक मुश्किल का हल होती है’ असं म्हटलं जातं. समस्या कोणतीही असो एका घोटासोबत- चहाच्या-ती चुटकीसरशी सुटून जाते. ‘सुर्र्… के पिओ और खुल के जिओ.’ म्हणूनच मोकळं आणि टेंशन फ्री जगण्यासाठी प्राचीन काळापासून चहा आणि चहावाल्यांना जाम किंमत असावी. त्यामुळेच तर आपल्याकडचे चहावाले बंगले बांधू शकतात. गाड्या घेऊ शकतात. अजून काही ना काही करू शकतात. आपण जाणताच ते.

परवाच गावी जावून आलो. वातावरण लई उकडलेलं हाय गावी. त्यात परत उकळती चाय. म्हणजे गरमागरम वड्यासोबत गरमागरम सागोती मिळावी, असाच. टपरीवर आलो. जाम गर्दी. पहिली त्या पोस्टरांची मग माणसांची. टपरीच्या बाहेर दोन दोन झेंडे. तेही विरूद्ध पक्षांचे. बाकं शिल्लक नव्हती. कुठं बसू कळना. मग बाळा काकांनी सरकून जागा दिली आणि आपणच आरडर केली, ‘ये बबन्या, या बाबूक एक कोप चाय घेव्न ये रे नि पिलेटभर कांद्याची भजी आण. पैशे मी दितलय.’ मी आश्चर्याने उडालोच. गावात ‘चिकू’ म्हणून ओळखले जाणारे हे काका आज मला स्वतःच्या पैशाने चहा पाजताहेत? मग हळूहळू सारा प्रकार लक्षात येऊ लागला. काका आपल्या साहेबांचा प्रचार करत फिरत होते. ‘असं होय, म्हणून ही एवढी गर्दी!’ नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ‘एकवीस तारखेक येवचाच हा हा. तुझे उताराचे पैशे काय हत ते माका सांग तू. तुका मी देतलय. भियाचा काम नाय. काय लागला तर कळवीत जा.’

- Advertisement -

‘वाटेत येताना तुमच्या विकासाच्या दगडाक आपटान आंगठो फुटलो. लय लागला.’ हेच सांगणार होतो. पण तोंडात फ्री मधली चाय आणि हातात भजीचा तुकडा होता ना. मग कसं बरं बोलणार?
चल येतय. चला रे. राती माळावर जमाचा हा. येवा, ‘सोय’ हा.

येतव येतव. असे दोनतीन जण म्हणाले आणि काका ‘येव्न येव्न येणार कोण, सायबांशिवाय आसाच कोण.’ असल्या काही घोषणा देत गाडीतून निघून गेले. ते जाताना दिसताच तात्या आपल्या हातातला रिकामा कोप टेबलावर आपटत ‘कोपात’ म्हणाले, मेलो मायझयो सोय करतलो म्हंता. अरे त्या धा-बारा मांसांका बरोबर घेव्न फिरतस तो जरा भाता कापूक घेव्न ये. अरे, हकडे आमका माणसा वशेधाक मिळनत नाय नि ह्यो डझनावर माणसा घेव्न फिरताहा.

- Advertisement -

खरा हा रे तातल्या. काल त्या रुपल्याक जरा भात कापूक बोलवलय तर म्हंता कसो, आजून चारपाच दिस तरी येव्क मिळाचा नाय. प्रचाराक फिराचा हा. निवडणूक जवळ इली हा. लय कामा हत. पाचशे रुपये दितत ते माणसामागे. नि खावची पिवची सगळी सोय.

सगळी आपली पोटा भरूची कामा हत हेंची. ह्या मेल्यांका कधी कळतला देवाक म्हाय्त. आबा भजीचा दाढेत अडकलेला तुकडा पोटात ढकलत बोलते झाले.

बाजूला संतो निमकर चहा पित पित या दोन म्हातार्‍या माणसांचं ऐकत होता. चहा पिवून होताच कप खाली ठेवत म्हणाला, तातानू, मी येतय आजपासून भात कापूक. पण एक अट हा. दिवसाचे पाचशे रुपये दिलास तर येय्न नि जेवचा अलग.
पांडूही त्याच्या सुरात सूर मिसळत म्हणाला, हा पिवचा आमी बघताव काय ता. तुमी फक्त दिवसाक पाचशे रुपये मजूरी देवा.

अरे पाचशे खयना देतलाव आमी? चारशेपर्यात देय्न.
नाय जमाचे ना पाचशे? मग विषय कट. आता बोलायचा नाय. आमका पाचशे रुपये मिळतत प्रचाराक जाव्न. शिवाय वरना खाना पिना सगळा फ्री. नि कामपण काय आसता, निसता फिराचा हा बोंबलत हयसून थय.

होय त नि टिशर्टा पण भेटली दोन नयी. चार टोपये. वरना सायबांनी शब्द दिल्यानी हा, ‘एकदा मी आमदार झालय काय सगळ्यांका कायमचो धंद्याक लावतलय म्हणान.’ शिवाय फ्री मधे शिकाची पण सोय करतलेहत आमचे साय्ब. तुमची भाता कापूक येव्न ह्या सगळा मिळना आसता काय आमका?

जांव्दे रे, हेंका काय कळतला. हे मरमर मेले खपान. आमका असा मराचा नाया. आमका कामधंदो होयो हा. आमका स्वत:च्या पायार उभ्या होव्चा हा. त्यासाठी साय्बांकाच निवडान आणूचा लागतला.

संतोष बोलत असतेवेळीच दत्ता धावत आला. धापा टाकत टाकतच म्हणाला, संत्या घात झालो रे घात.
संत्यासकट आम्ही सगळे भीतीने गार झालो. काय झालंय नक्की?
अरे मेल्या सरळ काय ता सांग. काय झाला?

संत्या, अरे परबांच्या आळीतले चारजाण आज विरूद्ध पार्टीच्या मोर्च्यात घोषणा देताना दिसले. पार्टी बदलल्यानी मेल्यानी.
संत्या दातओठ खात म्हणाला, गद्दार साले. खाल्ल्या मिठाक जागनत नाय. खयत ते. चल बघूया तेंका. असं म्हणत तिघेही जण धावत गेले. तात्या नि आबा त्यांच्या धावपळीकडे पाहत राहिले.

माझी एव्हाना भजी संपली होती. चहा कधीचाच झाला होता. थोडीशी शांतता झाली होती. त्यामुळे थोडं तेल ओतावं म्हणून म्हणालो, काका, आता काय होणार वो? हा संत्या काही राडा तर नाही ना करणार?

आबा हसत हसत म्हणाले, अरे झिला, कसलो राडो नि कसला काय? हे तकडे गेल्यार हेंका कळतला बघ, की आपले साय्बच कल दुसर्‍या पक्षात गेलेत ते. मग हेपण फिरतले तेंचो झेंडो खांद्यार घेव्न.

तेवढ्यात पाटील गुरुजी तिथे चहासाठी येत म्हणाले, अरे बाळा, हे सगळे खेळ आहेत रे यांचे. उंदराला मांजर साक्षी तसला हा खेळ. सगळे एकमेकांंना मिळालेले. इथे राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नाही नि शत्रूही नाही. हे आता मोफत शिक्षण, रोजगाराचं म्हंताहेत ना, ते यांनी दिलं तर या संतोषसारखे कार्यकर्ते कसे काय रे मिळतील यांना? हे यांचे साहेब आता यांना रोजगार देणार म्हणून सांगतात. पण हे अजूनपर्यंत बेरोजगार का राहिलेत, याचा विचार कधी या मुलांनी केलाय का? ‘अडला हरी…’ त्यातली ही गत. पाच रुपयात, दहा रुपयात जेवन देणारेत हे. पण महागातली थाळी कमवण्यासाठी हाताला काम देणारेत का? जे प्रश्न अस्तित्त्वातच नाहीत ते खणून काढलेत आणि जे खरेच प्रश्न आहेत ते कुठल्यातरी गटारात फेकून दिलेत.

ताच तर वो गुरजीनू. ताता. अवो, हाली ते 370 काय ती कलमा काढल्यानी म्हणान सांगत फिरतत. पण हयची आंब्या, काजूची कलमा जगनय नाय. पावसात कुसान मेली. तेची भरपाई देवचा हेंच्या जाहीरनाम्यात खयच दिसना नाय. बेडूक हत सगळे बेडूक.

होय वो तात्यानू. आधी त्या इटलीवालीवांगडा फिरत नि आता त्या किटलीवाल्याच्या पाठना. चहा गुरुजींच्या कपात ओतत सावंत म्हणाले आणि ‘खो खो’ हसले.

चहाचा घोट पोटात रिचवत गुरुजी परत बोलते झाले. अरे हल्ली मोठमोठे हायवे होताहेत. ‘आरे’सारखं जंगल तोडून मेट्रो येतेय. समृद्धी महामार्ग होतोय. पण यात पर्यावरणाचा आणि सर्वसामान्य जनतेचा किती विचार केला जातोय? मोठमोठे हायवे दिसतात. पण गावागावाला जोडणारे रस्ते खड्ड्यात गेलेत ते दिसत नाहीत. मोफत बससेवा सुरु करायची म्हणताहेत हे. ती काय हवेतून जाणार काय?

मागे ती कर्जमाफी काय ती दिल्यानी. आमका कसली जागच लागली नाय. आमी आजून ‘इठ्ठला इठ्ला कर्ज कधी फिट्टला’ असाच म्हणत जगतव.

आणि तुमची मुलं ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ म्हणत या नेत्यांच्या शेपट्या बनून त्यांच्या मागून फिरतायत. सगळा खेळ आहे हा राजकारण्यांचा. वेळीच सावध करा यांना. नाहीतर हे असंच चालत राहिल कायमचं.

होय वो गुरजीनू. काय सांगतलाव पन आमी? आमचा येड्यांचा आयकतत होय ती? उठली की, ‘माकडाच्या हातात कोलित घेतल्यासारखी खयव आग लावूक तयार. पण बघताव आमी सांगून. तुमीव जरा मदतीक येवा. आबा असं म्हणत उठले.

हो, हो नक्की. बदल घडेल. चला आता मी निघतो. शाळेची वेळ झालीय. चल रे बाळा, येतो, काळजी घे. असं म्हणत गुरुजी सावंतांना पैसे देऊन शाळेकडे निघाले. आबा आणि तात्याही कोयती घेऊन भात कापायला गेले. मीही मग पाकीटातून चहा भजीचे पैसे काढून काकांना दिले आणि घराकडे निघालो. वाटेत एका पक्षाची रॅली घोषणा देत येताना दिसली. पलिकडून अजून एका पक्षाची माणसं आरोळ्या देत येत होती. पुढे संत्या होता. खांद्यावर निराळाच झेंडा होता. मी रस्त्यातले खड्डे चुकवत पुढे निघालो.

चहाच्या टपरीवर असे अनेक विषय मिळाले होते. त्याचा परिणाम थेट दिल्लीपर्यंतही होण्याची शक्यता होती. म्हणून या टपरीवरल्या चहात भरपूर ताकद सामावलेली असते, हे पुन्हा एकदा पटून गेलं. ‘टपरीके एक घूँट चायकी किंमत तू क्या जाने नेताबाबू’ असंच म्हणावं लागेल आता. शेवटी ‘चाय’ कितनी बढीयाँ हो सकती है, ये तो आप भली भाँती जानते ही हो ना, साब…’

-श्रेयश अरविंद शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -