पपो

Subscribe

पपोचे मोठे कुटुंब नव्हते. आई, बहीण आणि तो. सर्व कष्टकरी. पण, पपोचे सतत दारू पिणे कुटुंबाला जीवावर येई. नाना, त्याच्या आईने खूप समजावून सांगितले. पण, तो कधी ऐकला नाही. तसा तो सज्जन. कोणाच्या भानगडीत पडणार नाही. शेती, कष्ट आणि दररोज सकाळ संध्याकाळ दोन पेग हेच त्याचे जीवन होते. आईने काबाडकष्ट करून मुलीचे लग्न लावून दिले. ती आमच्याच गावात खात्या पित्या घरात दिली. आईला पपोची चिंता होती. माझ्या मागे काय होईल, अशी तिला काळजी वाटे तेव्हा नाना तिचा आधार होई. नाना म्हणे, ‘गे पप्याची आवशी कशाक काळजी करतंय. मी असय ना. बघूया काय ता’. आणि नाना वेळोवेळी पपोच्या कुटुंबाला आधार देत आला. अशी गावात किती तरी आधार नसलेली कुटुंबं नानाने सावरली होती.

पाऊस सुरू होऊन शेतीची कामे सुरू झाली की मला त्याची हमखास आठवण येते. माझ्या नाना काकाचा तो शेतीमित्र. मृग नक्षत्र लागले की तो हमखास घरी येणार. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली का पप्प्याला कॅलेंडरमध्ये न बघता ‘पावस इलो’ हे कळत असे. त्याचे शिक्षण किती झाले मला माहीत नाही, पण त्याला निसर्ग कळत असे. आमच्या खळ्यात येऊन त्याने, ‘रे मधू, चल जोत धरूया. काय करतय घरात बसान. चल बैल दी, मी चललंय. तू ये मागसून पेज घेऊन’. आणि पपो बैल घेऊन शेतात निघालेला असे. नानाला शेतीत पप्प्याचा खूप मोठा आधार असे. अगदी तरवा घालण्यापासून ते घरात तांदूळ येईपर्यंत तो चार सहा महिने सतत नानाच्या मागेपुढे असे. त्याच्या एखाद्या धाकट्या भावासारखा. खूप चांगले दिवस होते ते. नानाला शेतीभाती, बागायतीवर जीवापाड प्रेम होते. ते त्याच्या कष्टातून जाणवत होते. हा माणूस मी कधी आजारी पडलेला बघितला नाही. वयाच्या 70 व्या वर्षी पाट पोट सपाट. सतत चालणारा. आमची पन्नाशीत पुढे आलेली पोटे पाहून तो हसायचा आणि म्हणायचा, ‘रे पोटाची पिशी बघा, ती कशी खाली पडताहा. जरा घाम काढा. काय करुचे असत पैसे बिसे’. आणि नाना दिवसभर कष्ट करून आणि चार वेळ पेज, वालीची भाजी, मासे खाऊन एकदम जॉन अब्राहमसारखा सिक्स पॅकवाला होता.

उंचपुरा, सावळा, पण देखण्या अशा नानाचे शरीर कष्टाने सजले होते. तीच गोष्ट त्याच्या शेतीमित्र पपो आणि वानरमारे मित्रांची. सगळे सडपातळ सडसडीत. आणि नानासोबत काम करताना कष्टाने या सार्‍यांचा चेहरा चिखलात माखूनही उजळून निघालेला असे… तळ कोकणात वानरमारे नावाची एक भटकी जमात आहे. गावाच्या वेशीवर झोपड्या बांधून राहून मिळेल ती कष्टांची कामे करून पोट भरणारे हे लोक. पावसाळ्यात शेती आणि उन्हाळ्यात बागायती काम करताना ते कधी थकलेत असे कधी दिसले नाहीत. पपोसोबत हे दहा बारा वानरमारे नानाची शेती करत. पपो आणि या वानरमार्‍यांमध्ये एक साम्य म्हणजे सतत पाने खाणे आणि देशी दारूचे दोन पेग मारून काम करणे. त्यांची बायका माणसेही दोन घोट घेताना लाजणार नाहीत. तो त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला होता. नानाही त्यांच्या पानात आणि दारू पिण्यात कधी आड आला नाही. कारण पिऊन शेती करताना या सर्वांनी कधी धिंगाणा केला नाही. उलट गावातली लोक गंमतीने म्हणत, ‘मधूची (नानाचे नाव) शेती जोरात हा. पपो आणि वानरमारे काम झाल्यावर दारू पिऊन रस्त्यात लोळतील. पण, शेती करताना काय त्यांच्या अंगात येता, कळना नाय. भारी शेती करतत. मधूचो स्टाफ एक नंबर हा’. आणि तसे असेही. सर्वात नानाची शेती आधी पूर्ण होई आणि तीसुद्धा बघण्यासारखी…

- Advertisement -

पपोचे मोठे कुटुंब नव्हते. आई, बहीण आणि तो. सर्व कष्टकरी. पण, पपोचे सतत दारू पिणे कुटुंबाला जीवावर येई. नाना, त्याच्या आईने खूप समजावून सांगितले. पण, तो कधी ऐकला नाही. तसा तो सज्जन. कोणाच्या भानगडीत पडणार नाही. शेती, कष्ट आणि दररोज सकाळ संध्याकाळ दोन पेग हेच त्याचे जीवन होते. आईने काबाडकष्ट करून मुलीचे लग्न लावून दिले. ती आमच्याच गावात खात्या पित्या घरात दिली. आईला पपोची चिंता होती. माझ्या मागे काय होईल, अशी तिला काळजी वाटे तेव्हा नाना तिचा आधार होई. नाना म्हणे, ‘गे पप्याची आवशी कशाक काळजी करतंय. मी असय ना. बघूया काय ता’. आणि नाना वेळोवेळी पपोच्या कुटुंबाला आधार देत आला. अशी गावात किती तरी आधार नसलेली कुटुंबं नानाने सावरली होती. त्याचा हात कायम पुढे मोठा आणि पुढे राहिला. शेतीभातीतून, बागायतीमधून त्याने किती पैसा मिळवला हे आमच्या त्याच्यासकट सात भावांच्या मोठ्या कुटुंबाला कधी समजले नाही. पण, तो कायम ज्यांच्या घरी चूल पेटताना मारामार असे अशा नाही रे वर्गाचा तो कायम आधार असे. आमची आई नेहमी सांगे, ‘रे मधू आता आपल्या घरार जी काय शिल्लक कौला असतं ती लोकांच्या घरार घाल. मग आम्ही आणि तू मोकळो झालंय’. आईचे बोलणे मनावर न घेता नाना म्हणे, ‘गे गप्प बसा. कशाक किल्लेस घालतास. सातेरी मागे आसा. काय कमी पडाचा नाय. आणि खुय घेवन जावचो आसा पैसो आडको. हिसरच रव्हताला’, असे सांगून तो तरातरा घराबाहेर पडे. पपोच्या बहिणीचे लग्न झाल्यावर त्याच्या आईला आता मुलाच्या लग्नाची घाई लागलेली. मधूला ती म्हणाली, ‘रे मी मराच्या आधी पपोचा लग्न झाला तर बरा होयत. मी एकदाचा सुटान’. नानाला त्या आईची तळमळ कळत असे. लग्न झाल्यावर पपो सुधारेल.

जबाबदारीची जाणीव होऊन दारू पिणे कमी होऊन तो मार्गाला लागेल, असे त्याच्या आईला वाटे. मग तिने ते नानाच्या मनात रुजवले. शेवटी दोघांच्या इच्छाशक्तीने म्हणा किंवा प्रयत्नांनी पपोचे लग्न ठरले. पपो दिसायला देखणा होता. उंची कमी असली तरी गोरापान तांबूस वर्णाच्या आणि घार्‍या डोळ्यांच्या पपोला तसा लांबचा माणूस नाव ठेवणार नाही. गरीब घरातील मुलगी बघून त्याचे लग्न झाले. पण, त्याचा संसार फार काळ टिकला नाही. त्याच्या सततच्या दारू पिण्याला वैतागून पपोला बायको सोडून गेली. पुन्हा आई आणि पपो राहिले. हळूहळू पपोचे दारूचे व्यसन वाढत गेले. तो आता दारू पिऊन बाजारात पडू लागला. त्याच्या आईने, नानाने त्याला खूप समजावून सांगितले. पण तो आता ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. मात्र सकाळ झाली की नानाकडे हजर. आधी मधूचे काम, नंतर जगाचे हा त्याचा रिवाज कायम होता. सकाळी तो दोन पेग लावून आलेला असायचा. पावले अडखळत असली तरी काम तो चोख करायचा. मात्र त्याला काम करताना एक बाटली आणि काम संपल्यावर लगेच रोख पैसे लागायचे. नानाचा हा व्यवहार काय होता, हे आम्हाला कधीच कळले नाही आणि त्यानेही ते कधी सांगण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक वर्षांपासूनचे संबंध नाना जपून होता. त्याला माणसे आणि व्यवहार कधी कळले नाहीत. सर्वात धाकटा भाऊ असून तो घरभाट, देव रित सांभाळतोय म्हटल्यावर मोठ्या भावांनी त्याच्या व्यवहारात कधी आडकाठी आणली नाही. ते दिवस काही वेगळे होते. व्यवहारापेक्षा नात्यांचा विश्वास मोठा होता आणि त्याची किंमत पैशात मोजता येणारी नव्हती.

- Advertisement -

पपोच्या आईने आज उद्या आपला मुलगा सुधारेल या आशेवर बरीच वर्षे काढली, पण तिचे प्रयत्न अपुरे ठरले आणि एके दिवशी ती हे जग सोडून गेली. आता पपोचे काय होणार, असे वाटत असताना नाना त्याचा आधार होता. नानाकडे कधी काम नसेल तर बाजारात छोटी मोठी कामे करून दिवस घालवत होता. मात्र दारू काही त्याची सुटत नव्हती. मी गणपतीत, जत्रेला किंवा मेमध्ये गावाला गेलो की हा हमखास भेटणार. ‘काय मुंबईकरानू बरा मा. काय म्हणता तुमची नोकरी बिकरी. देव बरा करो’, असे म्हणत तो थोडावेळ थांबून राही. त्याच्या हातावर पन्नास शंभर टेकवले की गालातल्या गालात हसत स्वारी डुलत निघे. याचे पुढे काय होणार? अशी आपल्याला चिंता वाटत असली तरी त्याला ती नव्हती. तो आपल्या मस्तीत जगत होता. मिळालेल्या पैशाचे तो दारू किती पितो आणि आपल्या पोटाला खातो किती याचा आता कोणी हिशोब ठेवणारा नव्हता. नानाकडे कामाला असल्यावर मात्र त्याला दोन वेळचे पोटाला भरपूर मिळत असे… दिवस चालले असताना नानाचे एके दिवशी त्याचे जुने दुखणे उफाळून आले. सायकलवरून तो एकदा पडल्यावर त्याच्या डोक्याला मार बसला होता. आधी काही वाटले नाही. पण, तो कोमात गेल्यावर त्याला आम्ही मुंबईत आणून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली होती. तोच आजार आता पुन्हा उफाळून आला होता. तो घरातून बाहेर पडेनासा झाला. मुंबईत आणून त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू केले, पण तो वाचू शकला नाही. ज्याच्या हाताला धरून मी जगातला सर्वात सुंदर असा माझा वेंगुर्ले गाव बघितला तो आता या जगात नाही, यावर माझा पुढे बरेच दिवस विश्वास बसत नव्हता…

माझाच कशाला नानावर जीवापाड प्रेम करणार्‍या पपो आणि वानरमारे जमातीच्या लोकांनाही नाना या जगात नाही, हे खरे वाटत नव्हते. यंदा पाऊस सुरू झाला आणि पप्याने आमच्या खळ्यात उभे राहून हाक मारली, ‘रे मधू, चल मरे. काय करतय घरात बसान. जोत धरूया चल. आणि तो हाक मारत राहिला. त्याचे हाक मारणे काही कमी होत नाही, हे पाहून आमचे शेजारी भाऊबंद बाहेर आले आणि त्यांनी त्याला आता मधू नाही, हे सांगितल्यावर पपोने त्याची आई वारली होती तेव्हाही एवढ्या जोरात किंकाळी मारली नसेल तेवढ्या जोरात तो, ‘रे माझ्या मधू, माका खय सोडून गेलंय रे, बाबा. मी आता काय करू’. धाय मोकलून तो रडत होता. पपोच नाही तर त्याच्या मागून आलेल्या सहा एक वानरमारे माणसांची हीच कथा होती. या सार्‍यांना आपल्या घरातील माणूस गेल्याचे दुःख झाले होते.

आज नाना हे जग सोडून गेल्याचा मी विचार करतो तेव्हा पपो आणि ही वानरमारे लोक माझ्यासमोर येऊन उभे राहतात. त्यांचा मोठा आधार गेलेला असतो. विशेष करून पपोचा. कारण आता त्याला समजून घेणारा माणूस या जगात नसतो. पपोच्या घरात चूल पेटली की नाही याची त्याच्यापेक्षा नानाला काळजी वाटायची… नानाच्या आदरयुक्त भीतीने म्हणा पपो अजून माणसात होता. आता त्याला धरबंद उरणार नाही. त्याचे पुढे काय होणार? ही काळजी वाटते तेव्हा नाना समोर येतो, ‘रे ज्याका कोण नाय त्याका देव हा. पपो घेणारो असलो तरी कोणाक कधी फसयल्यानं नाय. काय वायट व्हवचा नाय त्याचा. त्याची दारू काय आपण सोडवचो नाय. पण, अशा माणसांका काय एक होना नाय. ती बरी जगतत. उलट आपण नाकासमोर चालणारी माणसा बघता बघता निघून जातो’. नाना आज जगात नाही आणि पपो मात्र, ‘रे मधू चल जोत धरूया, पावस पडता’, असे सांगत आज नानाची वाट बघत उभा आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -