घरफिचर्सम्युच्युअल फंडाची एक लवचिक योजना - ‘लिक्विड फंड’

म्युच्युअल फंडाची एक लवचिक योजना – ‘लिक्विड फंड’

Subscribe

लिक्विड फंड हा एक तसाच सोयीचा पर्याय, ज्यात बँक किंवा तत्सम साधनांपेक्षा थोडा अधिक व्याजदर आणि अन्य वैशिष्ठ्ये मात्र आकर्षक असतात. आपल्या कौटुंबिक बजेट-नित्य आणि नैमित्तिक आर्थिक गरजा भागवण्यासाठी आपलेच पैसे आपल्याला वेळेवर मिळण्याची सोय यात आहे.

आजवर आपण बँक, पोस्ट किंवा एखाद्या पतपेढीत असलेले खाते वापरत आलेलो आहोत. व्याज कमाई आणि तशीच सुरक्षितता, सुविधा मिळवण्याची संधी मिळाली तर ? म्युच्युअल फंडमध्ये हे शक्य आहे का? याचा विचार करायला हवा. आपल्याला नाविन्याची हौस असते. कुतूहल असते. उदाहरणार्थ मोबाईलचे लेटेस्ट मॉडेल आपल्याला जुन्यापेक्षा जास्त आकर्षक वाटते. आपण टीव्ही घेतो त्यावेळी शेजार्‍यांकडे कोणता टीव्ही आहे? याचीही सहज माहिती घेतो. नवी वस्तू घेण्याआधी मित्रमंडळींना त्याविषयी काय अनुभव किंवा माहिती आहे, हे पाहण्याकडे आपला अधितर कल असतो.
इतरांच्या अनुभवावर आपण एखादी वस्तू घेण्याचा ‘निर्णय’ घेतो, पैशांच्या व्यवहाराबाबत मात्र आपण सहसा तसे काही करण्याच्या भानगडीत पडत नाही. थेट एजंट गाठतो आणि आपली इन्कमटॅक्स वाचवण्यापुरती गरज पूर्ण करतो. पण आता इतकाच विचार पुरेसा नाही. आपल्याला आर्थिक साक्षर व्हावे लागेल. किमान प्राथमिक माहिती असायला हवी…

काय आहेत लिक्विड फंडाची ठळक वैशिष्ठ्ये?

- Advertisement -

अल्प मुदतीसाठी -जास्तीत जास्त ९१ दिवसांची मुदत
कमी जोखमीचे साधन
बँक बचत -ठेवी खात्याप्रमाणे लवचिकता
रोकड-सुलभता
सुरक्षितता
कॉर्पोरेट्स आणि रिटेल दोघांनाही उपयुक्त

कोणासाठी उपयोगी ?

१] तुम्हा आम्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणजेच रिटेल ग्राहकांसाठी –
आजवर आपण आपल्या बँकेच्या बचतखात्यात थोडे पैसे ठेवत आलो आहोत. हेतू हा की काही इमर्जन्सी आली तर चटकन पैसे काढता आले पाहिजेत. एटीएमच्या बुथवर जाऊन लगेच रोख पैसे मिळू शकतात हीच गोष्ट आपल्याला महत्वाची. सेव्हिंग म्हणजेच बचत खात्यात जास्त व्याज मिळत नाही, तरी पैसे पटकन काढण्याची मुभा असते. हा मोठा प्लसपॉइंट आपण गृहीत धरतो. इतर व्याजातून मिळणार्‍या मोठ्या उत्पन्नाच्या नादी न लागता आपण गरजेची सोय म्हणून जवळच्या बँकेत काही पैसे ठेवत असतो. पण आता आपल्याला केवळ आपल्या अशा किरकोळ सुविधेची जवळची बँक तसेच इतर मोठ्या बँका अशी तुलना न करता शेअर मार्केट, म्युच्युअल फंड अशा काही इतर मार्गांचा जरूर विचार करायला हवा.
लिक्विड फंड हा एक तसाच सोयीचा पर्याय आहे. ज्यात बँक किंवा तत्सम साधनांपेक्षा थोडा अधिक व्याजदर मानला तरी त्याची इतर वैशिष्ठ्येही कमी महत्त्वाची नसतात. आपल्या कौटुंबिक बजेट, नित्य आणि नैमित्तिक आर्थिक गरजा भागवण्यासाठी आपलेच पैसे आपल्याला वेळेवर मिळण्याची सोय यात आहे.

- Advertisement -

आता हे कसे ते पाहूयात… पालक म्हणून आपल्याला आपल्या पाल्याची जून किंवा जुलै महिन्यात सहा महिन्याची किंवा वार्षिक फी शाळा कॉलेजात, अथवा कोचिंग क्लासला भरायची असते. पाच आकडी अशी मोठी रक्कम बहुधा आपण बँकेत अशाच वेळकाळासाठी ठेवलेली असते. मात्र इतर किरकोळ खर्चासाठी या रकमेतून काही रक्कम अधून मधून सकारण किंवा विनाकारण काढली जाते आणि अनाठायी खर्चही होते. अशा वेळी लिक्विड फंड सारखी सुविधा उत्तम ठरते. आपल्याला रकमेची जेव्हा गरज पडणार असेल त्या कालावधीपर्यंतच आपण म्युच्युअल फंड योजनेत ‘लिक्विड फंड’ सुरू करायचा असतो. त्यामुळे आपले साचवलेले पैसे आपल्याला योग्य वेळी मिळतात शिवाय त्याचे व्याजरुपी उत्पन्नही मिळते.

पर्यटन असो किंवा घरातील मंगल समारंभ…याकरता स्वकष्टाचा पैसा उभा करायचा असेल आणि कोणाकडून कर्ज घ्यायचे नसेल तर हा उत्तम पर्याय आहे. दर महिन्याला यात पैसे टाकत जायचे आणि मुदतीअंती ‘मोठी रक्कम’ घेऊन आपल्या कामासाठी वापरायची.यातील नियोजन आणि आर्थिक शिस्तीतून आपला आणि आपल्या कुटुंबाचा फायदा होऊ शकतो. हीच गोष्ट आपल्याला विम्याचा सहामाही किंवा वार्षिक हफ्ता भरण्यासाठी सोयीची ठरू शकते. असा काही हेतू न ठेवता जर बचत केली तर तिचा विनियोग अन्य कामांसाठी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी करता येतो.
आपल्या बचत खात्यातील पैसे कधीही काढता येतात. पण त्यामुळे व्याजदर पुरेसा लाभाचा ठरत नाही. हा व्याजदराचा लाभ जो लिक्विड फंडात मिळू शकतो. म्हणून हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.

२] कॉर्पोरेट कंपन्यांसाठी –
अनेक कंपन्या आणि कॉर्पोरेट्स यांच्याकडे अनेकदा अतिरिक्त निधी जमा होतो. तो अमुक मुदतीनंतर कर किंवा अन्य ठिकाणी भरायचा असतो. या कालावधीत ही रक्कम लाख किंवा कोटींच्या घरात गेलेली असते. या साचलेल्या रकमेचे करायचे काय? असा प्रश्न असतो. अशी रक्कम बँकेच्या करंट खात्यात ठेवून उपयोग नसतो. कारण अशा खात्यात व्याजरूपी उत्पन्न मिळत नसते. असे पैसे नुसते पडून राहणे म्हणजे या रकमेचा अपव्यय. अशावेळी म्युच्यअल फंडची ही योजना कामी येऊ शकते. अल्प मुदतीसाठी कंपनी किंवा संबंधितांना आपले पैसे त्या ठिकाणी ठेवता येतात. त्याचे व्याजही मिळते आणि मुद्दलही मिळते. पैसे ठेवण्याच्या कमी मुदतीचा असा लाभ कोणालाही घेता येतो.

लिक्विड फंडाचे फायदे –

१] अल्प मुदतीसाठी – यात ९१ दिवस किंवा त्याहीपेक्षा कमी दिवसांची मुदत उपलब्ध होऊ शकते.
२] कमी जोखीम – बहुतांश गुंतवणूक ही मनी-मार्केटमधील विविध पर्यायांत गुंतवली जाते. हा कालावधी जास्तीत जास्त ९१ दिवसांच्या मुदतीचा मिळतो. यात ट्रेझरी बिल्स, सर्टीफिकेट ऑफ डीपोझिट असे पर्याय असतात.
३] रोकड सुलभता- यातून आपल्याला आपण गुंतवलेले पैसे जर का काढायचे असतील,तर ते अवघड नसते. बँक खात्यातील पैसे अगदी तातडीने काढता येतात. लिक्विड फंडचे पैसे एक दिवसाच्या पूर्वसूचनेने काढता येतात.
४] सुरक्षितता – म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर सेबीचे नियंत्रण आणि अंकुश असतो.
५] व्याज दर तफावतीचा धोका नाही-या योजनेतील गुंतवणूक ही अल्पकालीन असते. कोणत्याही दीर्घकालीन साधनांमध्ये त्यामुळे पैसे गुंतवण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून बदलत्या व्याजदराचा परिणाम यात होत नाही. त्याबाबत भीती बाळगण्याची चिंता नसते.
६] कॉर्पोरेट्सना संधी – मोठ्या कंपन्या आणि कॉर्पोरेट्सना आपल्याकडील अतिरिक्त पैसा हंगामी स्वरुपात ‘पार्क’ करण्याची नामी संधी. मोठा निधी अनुत्पादित राहत नाही. पैसा सुरक्षित आणि व्याज कमाई होते.
७] टीडीएस नाही- बँक मुदत ठेवीवर जसा टीडीएस लागतो. तसा या साधनावर लागत नाही.
८] एन्ट्री -एक्झिट -खरेदी किंवा विक्रीवर कोणताही कर- म्हणजे लोड लावला जात नाही.
९] परतावा – हा बँकेतर्फे बचत खाते किंवा अल्प-मुदतीच्या ठेवीपेक्षा नक्कीच अधिक टक्के परतावा मिळू शकतो.

एका दिवसाच्या प्रतिक्षेमुळे उदासीनता

१] बँकिंगच्या सेव्हिंग/एफ.डी.इतकी लोकप्रियता नाही – अजूनही सर्वसाधारण मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमध्ये हा फंड तितका लोकप्रिय झालेला नाही. कदाचित आजही सर्वांना बँक खाते किंवा ठेवीमध्ये पैसे ठेवणे आणि काढणे हे सोयीचे आणि सुरक्षित वाटत असावे. हळूहळू ही मानसिकता बदलत आहे.
२] तात्काळ रिडम्प्शन नाही – बँकेतील बचत खात्यातील पैसे चटकन काढता येतात. एफ.डी. देखील एका दिवसात मोडता येते. मात्र लिक्विड फंडाचे पैसे काढायचे असतील तर एक दिवस आधी रिडम्प्शन रिक्वेस्ट द्यावी लागते. तर दुसर्‍या दिवशी पैसे मिळू शकतात. तेव्हढी वाट बघावी लागते.
असे काही असले तरी आजच्या घडीला बँकेच्या बचत खात्यापेक्षा अधिक व्याजरूपी उत्पन्न आणि नावाप्रमाणे ‘लिक्विडीटीचा अनुभव देणारे हे म्युच्युअल फंडाचे साधन आपण जरूर यात आपले काही पैसे गुंतवण्याचा विचार करावा…अर्थातच पूर्ण माहिती जाणून घेऊन.


-राजीव जोशी

(बँकिंग व अर्थविषयक अभ्यासक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -