घरफिचर्समनोरंजनाची नवी पहाट...

मनोरंजनाची नवी पहाट…

Subscribe

करोनाचे सावट दूर सरल्यानंतर मनोरंजन क्षेत्रदेखील नव्या रूपात पाहायला मिळेल. या क्षेत्रात 5 वर्षांनी होणारे बदल कदाचित यानंतर लगेच पाहायला मिळतील, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची मक्तेदारी वाढलेली दिसेल. छोट्या बॅनरच्या सिनेमांना आता थिएटर मिळण्याची वाट पाहावी लागणार नाही, ओटीटीच्या रूपात त्यांच्याकडे दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध झालाय. शुजित सरकार दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा अभिनित गुलाबो सिताबो सिनेमा अमेझॉन प्राईमवर रिलीज होतो आहे, हे त्याचेच उदाहरण. कमी बजेट असलेल्या सिनेमांसाठी हे प्लॅटफॉर्म लो रिस्क आणि जास्त फायदा यात मोडतात. वितरण प्रसिद्धी यासाठी करावा लागणारा अमाप खर्च इथे करावा लागत नाही आणि केलाच तर तो तुलनेने कमी असेल.

सध्याचा काळ एका सिनेमाच्या कथेसारखा पुढे सरकतो आहे, फक्त समस्या ही आहे की सिनेमा संपावा असं सगळ्यांना वाटत असलं तरी कुणालाच याच्या शेवटाची अचूक माहिती नाही. क्लायमॅक्स काय असेल याचा अंदाज प्रत्येकजण आपापल्या परीने बांधतो आहे, बस याच अंदाज बांधण्याच्या वाहत्या गंगेत हात धुण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. सगळीकडे चर्चांना ऊत आलाय की आता सर्वच क्षेत्रात मंदी येणार, बहुधा आलीच आहे. करोनासारखं मोठं संकट कोसळल्यानंतर ही परिस्थिती उद्भवणं साहजिक आहे. जागतिक सिनेसृष्टी करोनामुळे प्रभावित झालीय, एकट्या हॉलीवूडचा विचार केला तर करोनामुळे पहिल्या दोन महिन्यात हॉलीवूडचे 2.1 बिलियन डॉलर्स (15,846 कोटी रुपये) चे नुकसान झाले आहे. भारतीय सिनेसृष्टीदेखील याला अपवाद नाही, सिनेमात काम करणार्‍या आणि त्यावर निर्भर असणार्‍या लाखो लोकांच्या हातचं काम गेल्याने ते एका रात्रीत बेरोजगार झालेत.

हिंदी सिनेमांसाठी काम करणारे स्टंटमॅन, मेकअप आर्टिस्ट, स्पॉट बॉय, लाईट, केटरींगवाले आणि रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांवर उपासमारीची वेळ आलीय. मराठीतदेखील वेगळं चित्र नाहीये, आधीच प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने डबघाईला आलेला मराठी सिनेमा आणि नाटकं दोन्हीत काम करणार्‍या हजारोंना याचा फटका बसलाय. अनेकांना तर यानंतर आपल्याला काम मिळेल की नाही याची चिंता सतावते आहे, आता त्यातही गैर काही नाही म्हणा कारण लॉकडाऊन संपले तरीही सर्व सुरळीत व्हायला किती काळ लोटणार? हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. एरव्ही मनोरंजन हे आपल्याकडं चैनीच सामान म्हणून पाहिलं जातं आणि याच चैनीच्या वस्तूवर कितीतरी पोटं चालतात हे आपण सोयीस्करपणे विसरतो. असो, एरव्ही महासत्ता म्हणून मिरवणार्‍या अमेरिकेतील स्थिती सुद्धा फार वेगळी नाहीये, सीएनबीसीच्या एका रिपोर्टनुसार तिथंही मनोरंजन क्षेत्रातील लाखो लोकांवर बेकारीची टांगती तलवार आहे, फ्रिलांस काम करणार्‍यांची नोंद नसल्याने त्यांना मदत करण्यासाठी कुठलंही माध्यम उपलब्ध नाहीये, फिल्ममध्ये काम करणारे लोक दुसर्‍या कामाच्या शोधात आहेत.

- Advertisement -

जगभरात गाजत असलेला करोनाचा चित्रपट कधी संपणार याची ठोस माहिती कुणीही देऊ शकत नसलं, तरी आता मध्यंतराची वाट प्रत्येकजण पाहतोय. महाराष्ट्र शासनानेसुद्धा लवकरच काही अटींसह चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी देण्याचा विचार असल्याचं सांगितलं आहे. तेव्हा या मध्यंंतराच्या काळात तरी पुरेशी तजवीज करून या सिनेमाचा उत्तरार्ध पाहण्यासाठी तयार राहायला हवे, करोनावर लस आल्यानंतर हे चित्र बदलेल असा अनेकांचा समज आहे, पण सद्य:स्थितीत लस आल्यानंतरही किमान एखाद वर्ष सर्व सुरळीत होईल अशी चिन्हे नाहीत. 2008 च्या जागतिक मंदीपेक्षाही बिकट परिस्थिती करोनामुळे निर्माण झाली आहे. एकूण जागतिक मनोरंजन सृष्टीचा विचार केला तर 42 टक्के उत्पन्न हे सिनेमा थिएटर, 48 टक्के उत्पन्न हे डिजिटल आणि 10 टक्के फिजीकल मार्केटमधून येते. (सीएबीसी विशेष रिपोर्ट ) गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जगभरातील सर्वच सिनेमा थिएटर आणि नाटकांचे प्रयोग बंद असल्याने मिळणारे 52 टक्के उत्पन्न शून्यावर आलेले आहे. हे असंच सुरू राहिले तरी किमान वर्षभर ही परिस्थिती सुधारणार नाही, म्हणजे यामुळे होणारे जागतिक नुकसान लाखो कोटींच्या घरात जाईल. समजा, येत्या सहा महिन्यांत लस आली आणि पुढच्या महिन्यात सिनेमांच्या शूटिंगला परवानगी मिळाली तरी मोठ्या सिनेमांच शूटिंग सुरू होणं शक्य नाही. कारण करोनाच्या सावटाखाली 200/300 लोकांचा क्रू घेऊन शूटिंग करण्याचं धाडस सहसा कोणी करणार नाही. लोकांची सेफ्टी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद याबाबत कुठलीही खात्री नसताना, भलते प्रयोग करण्यात कुणालाही रस नाही. नाटकांच्या बाबतीत देखील हेच, नाटकांची प्रॅक्टिस केली, निर्माते मिळाले तरी प्रेक्षक मिळणं शक्य नाही. कारण जर सभागृहात एक सिट सोडून बसावं, असा नियम लागू केला तर उत्पन्न घटेल आणि तिकिटाचे दर वाढवले तर प्रेक्षक पाठ फिरवतील असं चित्र आहे.

करोनाचे सावट दूर सरल्यानंतर मनोरंजन क्षेत्रदेखील नव्या रूपात पाहायला मिळेल. या क्षेत्रात 5 वर्षांनी होणारे बदल कदाचित यानंतर लगेच पाहायला मिळतील, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची मक्तेदारी वाढलेली दिसेल. छोट्या बॅनरच्या सिनेमांना आता थिएटर मिळण्याची वाट पाहावी लागणार नाही, ओटीटीच्या रूपात त्यांच्याकडे दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध झालाय. शुजित सरकार दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा अभिनित गुलाबो सिताबो सिनेमा अमेझॉन प्राइमवर रिलीज होतो आहे, हे त्याचेच उदाहरण. कमी बजेट असलेल्या सिनेमांसाठी हे प्लॅटफॉर्म लो रिस्क आणि जास्त फायदा यात मोडतात. वितरण प्रसिद्धी यासाठी करावा लागणारा अमाप खर्च इथे करावा लागत नाही आणि केलाच तर तो तुलनेने कमी असेल. गेल्या तीन महिन्यांच्या काळात लोकांना या ऑनलाईन स्ट्रिमिंगची सवय जडली आहे. मनोरंजनाचे दुसरे माध्यमच उपलब्ध नसल्याने नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉट स्टारसारख्या ओटीटी माध्यमांच्या व्ह्यूअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. घरातल्या टीव्ही, मोबाईलवर आवडता सिनेमा रिलीज होत असेल तर करोनाच्या सावटात थिएटरला जाण्याची रिस्क कोण घेणार? हाच प्रश्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या पथ्यावर पडणार असं दिसतंय. फिल्म बनवणे हा शेवटी एक व्यवसाय आहे, ज्यातून नफा हे एकमेव उद्दिष्ट असते. जर निर्मात्यांना ही गोष्ट कळली तर तेही अशाच छोट्या प्रोजेक्टमध्ये पैसा लावतील, यात रिस्क कमी असल्याने येणार्‍या काळात यांची संख्यादेखील वाढलेली दिसेल. याचा फायदा नवख्या दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेत्यांना होऊ शकतो. येणारा काळ हा कदाचित नवीन तरुणांना संधी देणारा असू शकतो, कारण यांना द्यावा लागणारा पैसा कमी आणि इतरांच्या तुलनेने यशाची अधिक हमी, ही संधी तरुणांनी हेरली पाहिजे.

- Advertisement -

सूर्यवंशीसारखा बिग बजेट सिनेमा करोनामुळे मागे पडला, आता ज्यावेळी थिएटर सुरू होतील तेव्हा आधी हा सिनेमा प्रदर्शित करावा लागेल. पायरसीचा धोका असल्याने थिएटर सुरू झाल्यानंतर जर अजून वाट निर्मात्यांनी पाहिली तर सिनेमा मोबाईलवर येऊ शकतो, पण सिनेमा थिएटरवर प्रदर्शित केला तरी आता जेवढी कमाई तो आधी करू शकत होता तेवढी नक्कीच करणार नाही. 300 कोटी कमावणारे सिनेमे यानंतरच्या काळात लगेच पाहायला मिळणार नाहीत, त्यातल्या त्यात वीकेंड गेल्याने आणि कमी दिवस राहिल्याने अनेक सिनेमे आमनेसामने येतील. अगदी दिवाळीचा विचार केला तरी 4 मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, जर असं झालं तर त्या चारही सिनेमांच्या व्यवसायावर परिणाम होईल आणि समजा असं नाही झालं तर मग माघार घेणार्‍या सिनेमाला एखाद्या शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित करावा लागेल, ते देखील त्यांच्या व्यवसायावर प्रभाव पाडू शकेल. हे झालं अशा बिग बजेट सिनेमांसाठी ज्यांची शूटिंग पूर्ण झाली आहे किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, पण हिंदीत असेही अनेक मोठे सिनेमे आहेत ज्यांच शूटिंग अर्ध्यावर आलं होतं, अशा सिनेमांवर मात्र आता मोठं संकट येणार आहे. काय तर उन्हाळ्याच्या या काळात पावसाचा धोका नसल्याने अनेक सिनेमांच शूटिंग या काळात पूर्ण केलं जातं. सेट उभारणे याच काळात शक्य असतं, पण संपूर्ण उन्हाळा गेल्याने आता ते शक्य नाही. दुसरं म्हणजे मुंबईत काम करणारा इंडस्ट्रीतील मजूर वर्ग गावाकडे निघून गेलाय, अशावेळी पुन्हा लोक शोधणे, त्यांना काम करण्यासाठी राजी करणे. सेटवर अत्यावश्यक काळजी घेणे हे सर्व काम निर्मात्यांना करावं लागणार आहे. एवढं सगळं करूनही शूटिंग पूर्ण केलं तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद यापुढे प्रश्नचिन्ह आहे तसंच राहील आणि शूटिंग कॅन्सल केलं तर पुन्हा नुकसान. या यादीत अनेक सिनेमे आहेत, 83, गंगुबाई काठीयावाडी, ब्रह्मास्त्र यासारख्या सिनेमांच प्रदर्शन वर्षभरासाठी पुढे ढकललं जाऊ शकतं.

लॉकडाऊन नंतरच्या काळात सिनेमांत आणि त्यांच्या कथेतदेखील आमूलाग्र बदल होतील. अगदी सर्वांच्या जवळचा विषय म्हणजे इंटीमेट सीन्स देणं काही काळ बंद राहील. करोनाच्या काळात ही जवळीक महाग पडू शकते, फक्त इंटीमेट सीन्स नाही तर अ‍ॅक्शन सीन्समध्येसुद्धा बदल होऊ शकतो. एरव्ही नायकाच्या मागे नाचणार्‍या 100 डान्सरची संख्या घटू शकते. या सगळ्या शक्यता असल्या तरी नाकारून चालणार नाही, कारण उद्या करोना आपल्यातून गेला नाही तर, हात न धुता जेवायला बसणारा नायक, मास्क न लावता फाईटिंग करणारा नायक दाखविल्यास त्याला रिअल लाईफ कथा म्हंटली जाईल का ? हा देखील प्रश्न आहे. गमतीचा भाग सोडला तर या बाबींचा गांभीर्याने विचार करावा लागेल कारण करोना गेला तरी त्याची भीती मनातून निघणे कठीण आहे. सिनेमांच्या कथेत होणार्‍या बदलांबाबत मी जरा सकारात्मक आहे, असं म्हटलं जायचं की येणारा काळ हा कंटेंटचा असणार आहे, प्रेक्षक केवळ कंटेंट बघूनच सिनेमा पाहतील वैगेरे वगैरे, पण तो काळ काही येत नव्हता. या आपत्तीनंतर कदाचित हा काळ येऊ शकतो. ऑनलाईन उपलब्ध असलेल्या मनोरंजनाच्या महापुरात आपली ओळख निर्माण होण्यासाठी का होईना आता वेगळे प्रयोग करावे लागतील. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लोकांच्या आवडीचा आशय त्यांच्यासमोर आणणे गरजेचे आहे. लोकांच्या आवडी काळाप्रमाणे बदलतात हे सत्य आहे. लॉकडाऊनच्या काळात मनी हाईस्ट पाहिलेला प्रेक्षक धूम 3 पाहून आकर्षित होणार नाही हे सत्य आता बॉलीवूड निर्मात्यांनी पचवायला शिकले पाहिजे. यशराज आणि धर्मासारखे अनेक मोठे बॅनर्स आता छोट्या प्रयोगांमध्ये पैसा लावण्यास तयार होतील तेव्हा संधीचा फायदा घेऊन, येणार्‍या काळात उत्तमात उत्तम असे काही सिनेमे आपल्याला पाहायला मिळू शकतात.

व्यवसायात गुंतवणूक नेहमी अशा ठिकाणी केली जाते जिथून योग्य मिळकत होऊ शकते. हिंदी सिनेमात ही गुंतवणूक म्हणजे कमी बजेटचे सिनेमे, अनेक जणांना असं वाटतं की बिग बजेट सिनेमे लगेच निर्माण होतील आणि त्याला प्रतिसाददेखील मिळेल. काहींचं तर असं मत आहे की बिग बजेट सिनेमांची निर्मिती व्हावी म्हणून निर्माते थोडी रिस्क घेऊन त्यात गुंतवणूक करतील, पण मला असं वाटतं नाही. बिग बजेट सिनेमा म्हणजे विविध लोकेशन्स, अधिक मनुष्यबळ आणि सद्य:स्थितीत इतर ठिकाणी जाऊन शूटिंग करणे जवळपास अशक्य आहे. त्यातल्या त्यात मोठा सेटअप असेल तर अडचणी अधिक, जिथे शूटिंगचेच वांदे तिथे अशा सिनेमांची निर्मिती अजूनही जोखमीची ठरते. सद्य:स्थिती पाहता असा निर्णय घेणे हिताचे नाही, बिग बजेट सिनेमे हे इंडस्ट्रीकरिता अत्यंत महत्त्वाचे आहेत.

असे सिनेमे बनले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण इंडस्ट्रीच्या अर्थव्यवस्थेवर पडेल हे मला मान्य आहे. बिग बजेट सिनेमांमुळेच आपली इंडस्ट्री बाहेर ओळखली जाऊ लागली आहे. आता कुठे आपल्याकडे अशा सिनेमांची संख्या वाढत होती. सिनेमे 300 कोटी 500 कोटी कमावत होते, जर हे बंद झालं तर त्याचा परिणाम संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर होईल आणि तो दीर्घकाळ राहील, पण सद्य:स्थितीमध्ये अशा प्रोजेक्ट्सचा विचार करणे थोडे घाईचे ठरेल, एक दोन वर्षात जेव्हा स्थिती पूर्ववत होईल तेव्हा जर असे प्रोजेक्ट पुढे आणले तर त्याला प्रतिसाददेखील मिळू शकतो, पण सद्य:स्थितीत प्रतिसाद मिळणे अवघड आहे. लोकांच्या खिशात पैसा असला तरी ते तो पैसा सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्यात घालवणार नाहीत. ही बाबदेखील तेवढीच खरी आहे. यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी तो पैसा देईलदेखील, पण आधी त्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे.

छोटा पडद्यावरील सर्व कार्यक्रमांना या करोनाने प्रभावित केले आहे. लाईव्ह टीव्हीच्या जमान्यात आधीच प्रेक्षक वर्ग घटत असताना या नव्या संकटाला सामोरं जाण्यासाठी त्यांना तयार राहावं लागेल. भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्री सद्य:स्थितीत फार क्रिएटिव्ह किंवा खूप वेगळं काम करते असं मला वाटतं नाही. डेली सोप आणि त्यांचे रिपीट एपिसोड्स या पलीकडे काहीही पाहायला मिळत नव्हतं. तरीही त्यांना एक प्रेक्षक वर्ग होता जे नाकारून चालत नाही, हिंदी मालिकांमध्ये दाखविण्यात येणारा तोचतोचपणा आणि सासू-सुनांची भांडण यापलीकडे दुसरं काही पाहण्यालायक नसतानाही घरोघरी याला मागणी आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व मालिकांचं शूटिंग बंद झाल्याने रिपीटेड एपिसोड्सच्या भरवशावर हे चॅनल्स सुरू आहेत, पण तीन महिन्यांपासून तेचतेच एपिसोड्स पाहून आता घरातील गृहिणींना कंटाळा आला आहे. तेव्हा हे संपल्यानंतर मालिकांमध्ये काहीतरी नवीन पाहण्याची टीव्हीच्या प्रेक्षकांची इच्छा आहे, पण ज्या अडचणी सिनेमा निर्मात्यावर आहेत, त्याच अडचणी मालिकांच्या निर्मात्यांवरदेखील आहेत. नुकतीच 15 एपिसोड पूर्ण झालेली मालिका लॉकडाऊनमुळे बंद पडली, आता पुन्हा प्रेक्षकांशी नाळ जोडण्यास तिला वेळ लागेल? जो टीआरपी आधीच्या मालिकांना मिळायचा, तो आता मिळेल का? असे अनेक प्रश्न समोर आहेत, पण सिनेमांच्या तुलनेने टीव्ही इंडस्ट्रीवर असलेलं संकट थोडं लहान आहे, याचं कारण म्हणजे टीव्हीचा प्रेक्षक तीन महिन्यांपासून रिपीटेड एपिसोड्स का होईना ते पाहून टीव्ही सोबत जोडला गेलेला आहे आणि लॉकडाऊन नंतरदेखील, हा प्रेक्षक असाच टीव्हीसमोर बसलेला आपल्याला पाहायला मिळेल, पण सिनेमांच्या बाबतीत असं नाही, तीन महिने घरात असलेले लोक यानंतर सिनेमा पहायला बाहेर येतील का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

कधीकधी सभोवतालचे वातावरण आपल्याला त्याच पद्धतीने विचार करायला भाग पाडतं जे आपल्या बाजूला घडतंय. त्यावरून आपण भविष्याचा अंदाज देखील तसाच लावतो. भारतीय सिनेमांचा प्रेक्षक हा नेहमीच सिनेमांवर प्रेम करणारा राहिला आहे, जिथं केवळ एखाद्याच्या चेहर्‍यावर सिनेमा 300 कोटी कमावू शकतो तिथं लोक सहजासहजी सिनेमाला विसरणार नाहीत, हे देखील सत्य आहे. बराच काळ थिएटरपासून दूर असलेला माझ्यासारखा सिनेमांचा प्रेक्षक आता थिएटर उघडण्याची वाट पाहतोय हेदेखील खरं आहे. करोना काळात मनोरंजनासाठी आणि मदतीसाठी पुढे आलेले अभिनेते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकतात. अनेक दिग्दर्शक निर्मात्यांनी आपल्या क्रुमध्ये काम करणार्‍या विविध मजुरांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट वाटली तर काहींनी आर्थिक मदत केली. सोनू सूदसारख्या नटाने मजुरांना घरी पोहचविण्यासाठी बसेसची व्यवस्था केली अशा एक ना अनेक बाबी आहेत; ज्यांनी सिनेमा आणि प्रेक्षक यांना या लॉकडाऊनमध्येही एकमेकांसोबत जोडून ठेवले आहे. अनेकांना येणारा काळ आव्हानांचा वाटतो तर अनेकांना यात संधी दिसतात. मनोरंजन क्षेत्रातदेखील अनेक मोठी आव्हाने आहेत ज्याची विस्तृत चर्चा आपण वर केलीय, पण यासोबतच अनेक संधी चालून येणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीत काम करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी तर हा काळ म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे, ज्याच्यात कौशल्य असेल त्याला संधी हमखास मिळणार. नवीन लोकांसोबत काम करण्यासाठी सगळेच निर्माते आणि प्रोडक्शन हाऊसेस उत्सुक असतील. दिग्दर्शक चांगल्या कथांच्या शोधात असतील. नवीन चेहर्‍यांना संधी मिळेल, कारण ही नवी इंडस्ट्री असेल. याचं रूप नवं असेल. कदाचित हीच असेल मनोरंजनाच्या दुनियेतील नवी पहाट …

अनिकेत म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -