घरफिचर्स'मंगळ' असलेल्या कल्याणीची कहाणी

‘मंगळ’ असलेल्या कल्याणीची कहाणी

Subscribe

आम्ही गावाला खळ्यात गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात कोणीतरी कल्याणीचा विषय काढला आणि तो मंगळावर गेला. तिच्याप्रमाणे मंगळाचाच नवरा तिला केला होता, तर मग भावोजी दोन वर्षांत तिला सोडून कसे काय गेले? असा प्रश्न शेजारच्या प्रकाशने उपस्थित केला. चुलीजवळ बसलेली माझी आई ताडकन उठून खळ्यात आली आणि म्हणाली, ‘रे, कसले आवशीच्या घोवाचे मंगळाचे गजाली मारतास. तुमचो तो मंगळ काय गुरू तो माका दाखवा, नाय चुलीत घालून मायझयांका जाळलंय तर नावाची वेंगुर्लेकरीन नाय. मी तर घोवाचा त्वांडसुदा बघलंय नव्हतंय. पत्रिका तर लांब रव्हले. तरी देवान आमचो संसार कधी मोडल्यान नाय. अरे, आजकालची पोरा पळान जावन लगीन करतत तेंका बरो मंगळ बादना नाय तो. असे इचार करू नको, माझ्या झिलानो. पण, लय शिकान आमची लोका मात्र खुळावली. त्या पत्रिका काढून देणार्‍यांची ही पोटा भरुची कामा आसत.

अण्णा वेंगुर्लेकर आमच्या वेंगुर्ले गावातले मोठे प्रस्थ. आईवडिलांचे एकुलते एक. राहता चौपदरी वाडा, शेतीभाती, मोठी बागायती आणि घरी नोकर चाकर. कशाला कमी नव्हती. नानासुद्धा फॉरेनरसारखे गोरेपान, निळ्या डोळ्यांचे. सकाळी घराच्या मोठ्या ओट्यावरील नक्षीदार झोपाळ्यावर ते बसले की आधी किती नारळ, सुपारी आली त्याचा हिसाब किताब होई, मग दिवसभराची कामे नोकरांना सांगितली की, नाना आपल्या दिवसाला सुरुवात करत. तशी त्यांना अंगमेहनतीची कामे करावी लागत नसत; पण लक्ष तर ठेवावे लागे. मात्र, मार्चपासून आंबे यायला सुरुवात झाली की, अण्णांच्या कामाला वेग येई. पावसात मात्र त्या तुलनेत काम कमी असे. अण्णांनी जाणतेपणाने घराची जबाबदारी घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांचे दोनाचे चार हात करण्यात आले. आता मोठे घर लहानग्यांनी भरून जाईल, या आनंदात अण्णांच्या घरात पहिली मुलगी जन्माला आली. तिचे नाव कल्याणी. अण्णांचे रंग रूप घेऊन जन्माला आलेल्या कल्याणीचे घरात जणू लक्ष्मी आली म्हणून स्वागत झाले. पण, त्यानंतर दोन एक वर्षांनी वेंगुर्लेकरांच्या घराचा पाळणा हलता राहिला तो एवढ्या मोठ्या इस्टेटीला वारस हवा म्हणून. कल्याणी पाठोपाठ जया, हेमा, शमा आणि चित्रा यांचा जन्म झाला. घरात मुलगा जन्माला येईल की नाही, अशा काळजीत अण्णा, त्यांची बायको माई आणि सारे घर चिंतेत असताना सहाव्या प्रयत्नात त्यांना मुलगा झाला. पण, राजपाठोपाठ आणखी एक मुलगा असावा अशा आशेने सातव्या वेळी अण्णांची बायको बाळंत झाली तेव्हा मुलगी होऊनही आता बस म्हणून तिचे नाव आनंदी ठेवून वेंगुर्लेकरांचा द्विवार्षिक कार्यक्रम थांबला आणि माईने सुटकेचा नि:श्वास टाकला…

खरेतर अण्णा आणि माई दोघेही पन्नाशीच्या दशकातले मॅट्रिक. पण, वेंगुर्लेकरांच्या घराण्याचे पुढे नाव चालवणारा वारस हवा या आपल्या आईवडिलांच्या हट्टापायी अण्णांचे काही चालले नाही आणि माईचीसुद्धा फरफट झाली. सर्व मुलांचे माध्यमिक शिक्षण गावात झाले तरी पुढील शिक्षणासाठी मुलांना त्यांनी मुंबईला पाठवले आणि लालबागला त्यासाठी एक छोटे घरही घेतले. या घरची प्रमुख बनली ती कल्याणी. मॅट्रिक होऊन आलेल्या कल्याणीला मंत्रालयात नोकरीही मिळाली आणि नोकरी करता करता पदवीचे शिक्षण घेऊन कारकुनाची ती अधिकारी झाली. उंच, गोरीपान आणि अण्णांचे निळे डोळे घेऊन आलेली कल्याणी लांबसडक तर होतीच; पण अंगाने चवळीच्या शेंगेसारखी होती. एखाद्या नटीला लाजवेल असे सौंदर्य कल्याणीला मिळाले होते. त्यात तिची चांगली नोकरी, यामुळे अनेक स्थळे तिला आपणहून चालून येत होती. पण, तिला लग्नाची घाई नव्हती. आपल्या सहा भावंडांना चांगले शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभे करायचे होते. मुख्य म्हणजे अण्णांच्या डोक्यावरचा भर तिला हलका करायचा होता. खरेतर ती मुलगी म्हणून जन्माला आली असली तरी एका जबाबदार कर्त्या पुरुषाचे भान तिच्या ठायी होते. आपल्याला राजकुमार मिळेल, आपण ऐशोआरामात जीवन जगू, पण जे मला मिळणार आहे ते माझ्या मागच्या बहिणी आणि भावाला मिळाले पाहिजे, हा तिचा मोठा विचार होता. जया आणि हेमा बँकेत नोकरीला लागल्यानंतर कल्याणी कशीबशी लग्नाला तयार झाली. पत्रिका बघूनच लग्न करायचे, या अण्णांच्या निर्णयामुळे कल्याणीला येणारी चांगली स्थळे पत्रिका जमत नाही म्हणून मोडत होती. कल्याणीचे नाव फोडायचे बाकी, पहिल्याच फटक्यात तिचे हात पिवळे होणार असेच आमच्या गावातील सर्वजण म्हणत होते. पण, तसे नव्हते. तिच्या पत्रिकेत म्हणे मंगळ होता आणि तोसुद्धा अतिशय कडक. त्यामुळे तिलाही कडक मंगळ असलेलाच मुलगा लग्नासाठी लागणार होता. वेंगुर्लेकरांचे आमच्या शेजारी घर असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी आमचे खास नाते होते, त्यात करून कल्याणीवर जीव होता. माझी आई नेहमी म्हणे, ‘कल्याणी कोणाच्या घरत पडात त्याचो सोन्याचो संसार करीत. काय तो मेलो मंगळ, तेच्या मागे लागलो तेका नायसो कर रे रामेश्वरा. तुका पाच पानाचो विडो आणि नारळ ठेवतय’. आमची आवस गार्‍हाणे घालून मोकळीही झालेली असे; पण कल्याणीच्या मागचा मंगळ काही सुटत नव्हता.

- Advertisement -

आपले लग्न काही जमत नाही, पण माझ्यामुळे मागच्या बहिणींची लग्न रखडता नये, असा जाणता विचार करून जया आणि हेमाच्या लग्नासाठी अण्णांबरोबर तिने पुढाकार घेतला आणि आपल्या दोन बहिणी चांगल्या घरात पडल्या याचा तिला खूप आनंद झाला होता. दोन्ही लग्नात तिचा वावर मोठ्या भावासारखा होता. दोन्ही लग्नात वेंगुर्ल्यातील सर्वजण म्हणत होते, ‘नवसानसुद्धा मिळाचा नाय असा चेडू देवान अण्णाक दिल्यानं. बायेचा बरा व्हव दे’. दरम्यान, कल्याणीच्या मंगळाला साजेसा असा मंगळ नवरा शोधण्याचा प्रयत्न सुरूच होता. ती आता पस्तीशी पार करून झाली होती आणि पाठच्या शिक्षिका, इंजिनिअर झालेल्या बहिणी लग्नाला झाल्या होत्या. आणि एके दिवशी आमच्या कानावर आनंदाची बातमी आली. कल्याणीचे लग्न जमले. मंगळ असलेली तिची पत्रिका जमली होती. कडक मंगळ असलेला नवरा तिला मिळाला होता. आईने आधी मला रामेश्वराच्या देवळात जाऊन नारळ ठेवायला सांगितला. अण्णांच्या कुटुंबासह गावातील प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. कल्याणीला भारत पेट्रोलियममध्ये अधिकारी असलेला नवरा मुलगा मिळाला होता. चाळीशीच्या जवळ असला तरी उंच, धिप्पाड होता. कबड्डी खेळणारा असल्याने वय जाणवत नव्हते. आम्ही सर्व वेंगुर्ले आणि मुंबईतील गावाच्या माणसांनी कल्याणी ताईच्या लग्नात धमाल केली. त्या दिवशी कल्याणीच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. इतकी आनंदी आम्हाला ती कधी दिसली नव्हती. कदाचित घरच्या जबाबदार्‍या पार पाडल्यामुळे देवाने आपला मार्ग शेवटी सुखाच्या वाटेवर नेऊन ठेवला, या जाणिवेतून ती आनंदाने बहरून गेली होती.

दिवस, महिने उलटत होते. कल्याणीच्या लग्नाला आता दोन वर्षे झाली होती. मात्र पदरी मूलबाळ काही नव्हते. मात्र ती आणि भावजी कधी त्यावरून नाराज असलेले दिसले नाही. दोघांनी आपली खंत मनी ठेवली. त्याचा बाऊ करून दाखवला नाही. कल्याणीने आपल्या भाच्यांना आपले मानून त्यांच्या आनंदात आपला आनंद मानला. शिवाय मागच्या आणखी दोन बहिणींच्या लग्नात पुढाकार घेऊन त्यांचा संसार मार्गाला लावण्याचे काम केले. दिवस आनंदात जात असताना अचानक कल्याणीचा नवरा खूप आजारी असल्याचे समजले. आम्ही त्यांना भेटूनही आलो. इतक्या वर्षात कल्याणी कधी रडलेली बघितली नव्हती. आईने कल्याणीला धीर दिला. ‘गो, रडा नको, देव तुझा काय वायट करुचो नाय. तू कोणाचा कधी वायट केलय तर तुझा तसा होतला. रामेश्वर बघता. देव बरा करतलो’. मोठ्या हॉस्पिटलमध्ये भावजींवर उपचार सुरू होते. बरे होतील, असे वाटत होते. पण, आजार बळावत गेला आणि त्यात त्यांचे निधन झाले. कल्याणी आणि वेंगुर्लेकर कुटुंब नव्हे तर आमच्या सगळ्यांसाठी हा मोठा धक्का होता. दोन वर्षांत कल्याणीचा संसार मोडला! गोर्‍यापान चेहर्‍यावरची ताईची लालभडक बिंदी तिच्या कपाळावर आता नव्हती. कायम केसात गजरा नाही तर एखादे तरी फूल असलेले तिचे केस निष्प्राण होऊन मोकळे सुटले होते. शून्यात हरवलेली कल्याणी भावजींना शोधत होती. आयुष्यभर एकमेकांची साथ सोडणार नाही, अशा आणाभाका घेतलेल्या कल्याणीला एकटे सोडून भावजी निघून गेले होते. त्यांचे पार्थिव उचलताना कल्याणीचा हंबरडा सर्वांच्या काळजाचे पाणी करणारा होता.

- Advertisement -

या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर गावाला गेल्यानंतर आम्ही रात्री खळ्यात बसलो होतो. पौर्णिमा असावी, सर्वत्र छान प्रकाश पडला होता. जणू खळे चांदण्यात न्हाऊन निघाले होते. कल्याणीचा भाऊ राजसुद्धा आमच्या सोबत गप्पा मारत बसला होता. इतक्यात कोणीतरी ताईचा विषय काढला आणि तो मंगळावर गेला. कडक मंगळाचा नवरा बघून ताईचे लग्न ठरवले होते, तर मग भावजी दोन वर्षांत तिला सोडून कसे काय गेले? आमच्या शेजारच्या प्रकाशने प्रश्न उपस्थित केला. चुलीजवळ बसलेली माझी आई ताडकन उठून खळ्यात आली आणि त्या न शिकलेल्या बाईने जे काही शहाणपण आम्हाला सांगितले ते आयुष्यभर श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमा पार करणारे होते. ‘रे, कसले आवशीच्या घोवाचे मंगळाचे गजाली मारतास. तुमचो तो मंगळ काय गुरु तो माका दाखवा, नाय चुलीत घालून मायझयांका जाळलंय तर नावाची वेंगुर्लेकरीन नाय. आमचो अण्णा खूप शिकलो म्हणान तेका पत्रिका व्हये झाले. तेची आणि आमची तरी लग्नपत्रिका बघून खय झाली. मी तर घोवाचा त्वांडसुदा बघलंय नव्हतंय. पत्रिका तर लांब रव्हले. तरी देवान आमचो संसार कधी मोडल्यान नाय. अण्णा आणि माईचो संसारही तुटाक नाय. कारण त्याच्या बापशीन पत्रिका बघल्यान नाय. अरे, आज कालची पोरा पळान जावन लगीन करतत तेंका बरो मंगळ बादना नाय तो. आता तो बघ, आभाळात दिसता त्या चंद्रावर लोका गेली, पुढे मंगळावर जातीत. अशा टायमाक असे इचार करू नको, माझ्या झिलानो. जा काय होयत तेका मंगळाचो बापूससुदा काय करुचो नाय. असा काय येक नसता. पण, लय शिकान आमची लोका मात्र खुळावली. त्या पत्रिका काढून देणार्‍यांची ही पोटा भरुची कामा आसत. तेंची पोटा आपण कित्याक भरा… सकाळी उठून आंगार दोन तांबये पाणी घेऊन देवासमोर उभे रव्हा. देवा, रामेश्वरा. बरा कर रे म्हाराजा. देव तुमचा बरा करतलो…’ आजही आवशीचे ते सूर माझ्या कानात घट्ट आहेत. आमच्या घरातील सर्वांची लग्ने ठरवून झाली आणि ठरवून न पत्रिका बघता.

या सत्यकथेतील कल्याणी आता सावरली आहे. मंत्रालयातून मोठ्या अधिकारपदावरून ती नुकतीच निवृत्त झाली. आता गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ती काम करते. विधवा बायकांच्या मदतीला धावून जाते. महिला बचत गटांना मदत करते. तिचा चेहरा पूर्वीसारखा आत्मविश्वासाने भरून गेल्यासारखा दिसतो तेव्हा बाजूला भावजी उभे असल्यासारखे दिसतात आणि मंगळ अदृश्य झालेला असतो…!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -