घरफिचर्सनिसर्गाशी नातं जोडणारी शिक्षिका

निसर्गाशी नातं जोडणारी शिक्षिका

Subscribe

गीता तिडके ही शिबिरातील एक सहभागी शिक्षिका. शिबिरात सगळं मन लावून समजून घेणं, मध्ये मध्ये टिपणं घेणं, अगदी साधे साधे मात्र मूलभूत प्रश्न विचारणं, शिबिरातील इतर शिक्षक विद्यार्थी यांच्यात मिळून मिसळून राहणं, असं संपूर्ण तीन दिवस तिचा शिबिरात सक्रिय सहभाग होता. प्रत्येक शिबिरात असे एक दोन आठवणीत राहणारे शिक्षक असतात, तसं तीही आठवणीत राहिली. दुसर्‍या वर्षीही ती आनंदशाळा शिबिरास आली. आता ती अधिकच प्रगल्भ वाटू लागली होती.

वर्ष २०१७ चे. सोबत दोन मुलींना घेऊन ती येत होती. पाठीवर भलं मोठं सॅक. हातात कॅमेरा. भिरभिरणारी नजर. नेजरेत कैक प्रश्न. सोबतच्या पंधरा सोळा वर्षांच्या मुलींसोबत तीही एक मुलगी झालेली. ही अशी पहिल्यांदा गीता मला भेटली. ठिकाण होते, गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील वनखात्याचा कॉफरन्स हॉल. आम्ही तिथे पुढील तीन दिवस विद्यार्थी व शिक्षकांसाठी शिबीर घेणार होतो. या शिबिरातील ती एक सहभागी शिक्षिका.

हे शिबीर साधारण दहा शिक्षक व वीस विद्यार्थी यांच्या सोबत घेतलं जातं. प्रत्येक शाळेतून एक शिक्षक व दोन विद्यार्थी यात सहभागी होतात. शिबिराचे नाव ‘आनंदशाळा शिबीर’. या शिबिरातून परत घरी जाताना अनेक मुलं रडतात. शिक्षक प्रयत्न करूनही त्यांच्या डोळ्यातील पाणी लपवू शकत नाहीत. सहभागींना अजून काही दिवस हे शिबीर सुरू राहावं असं वाटते. यातून त्या तीन दिवसाचे शिबीर कसे होत असेल, याचा थोडाफार अंदाज येऊ शकतो. मात्र आजचा विषय आनंदशाळा शिबीर हा नाही.

- Advertisement -

गीता तिडके ही शिबिरातील एक सहभागी शिक्षिका. शिबिरात सगळं मन लाऊन समजून घेणं, मध्ये मध्ये टिपणं घेणं, अगदी साधे साधे मात्र मूलभूत प्रश्न विचारणं, शिबिरातील इतर शिक्षक विद्यार्थी यांच्यात मिळून मिसळून राहणं, असं संपूर्ण तीन दिवस तिचा शिबिरात सक्रिय सहभाग होता. प्रत्येक शिबिरात असे एक दोन आठवणीत राहणारे शिक्षक असतात, तसं तीही आठवणीत राहिली. दुसर्‍या वर्षीही ती आनंदशाळा शिबिरास आली. आता ती अधिकच प्रगल्भ वाटू लागली होती. मात्र तिचं ते लहान विद्यार्थ्यांमध्ये सहज मिसळणं, त्यांच्यासोबत उगीच शिक्षक असल्याचा आव न आणता संवाद साधणं, हे कायम होतं.

तिचा फोटोग्राफी करण्याचा छंद पाहून, आम्ही तिला गवताळा अभयारण्य (पाटणादेवी, जळगाव) येथे फोटोग्राफी कार्यशाळेला बोलवलं. या कार्यशाळेत तिने ‘कोका माझा आणि पक्षांचा’ हा फोटोस्टोरी विषय सादर केला. कोका म्हणजे तिचे गाव. भंडारा जिल्ह्यापासून वीस बावीस किलोमीटर अंतरावरील हे गाव. त्याच गावात असलेल्या वनवैभव आदिवासी आश्रमशाळेत अकरावी व बारावीला ती इतिहास व भूगोल विषय शिकविते. पण तिचे म्हणणे आहे असे की, मुलांना सोबत घेऊन ती शिकत असते. तिचा हाच दृष्टीकोनच मला तिच्याबद्दल लिहिण्यास प्रेरित करीत आहे.

- Advertisement -

कोका जंगल हे नवेगाव नागझिरा अभयारण्याचा भाग आहे. या जंगलातील कोका हे गाव. या भागात दुसरं एक कोका गाव असल्याने त्याला कोका जंगल असे ओळखले जाते. येथे वाघ, गवा, बिबटे, चितळ, सांबर, कैक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे ही सगळे वन्यजीव आहेत. लांब लांबहून हे लोकं जंगल बघायला येथे येतात. इथल्या शाळेतील मुलांसाठी हा जंगल म्हणजे अगदीच सरावाचा रस्ता. म्हणून त्याचे त्यांना त्याचे विशेष कौतुक नव्हते. ही बाब ध्यानात घेऊन, गीताने जैवविविधतेकडे वेगळ्या नजरेने पाहणे, त्या घटकांना शिकण्या-शिकविण्यासाठीच्या गोष्टी बनविणे, हे सुरु केलं.

कोका जंगल आणि शाळा परिसरात सरसूची, लालसरी गजरा, चिखल्या बाड्डा, चिमणा शेन्द्य्रा, शेण्द्रा बाड्डा, वनकी, नोकर, चक्रवाक, छोटा मराल, थीरथीर्‍या, असे नानाविध पक्षी दिसतात. यातील काही पक्षी पिकावरील किडी खाऊन शेतकर्‍यांचे मदत करतात. काही पक्षी तळ्याकाठी बसून मासेमारी करतात. हे सगळे विद्यार्थ्यासोबत निरीक्षण करणं गीताचा आवडता छंद. गीता जेव्हा पक्षाबद्दल मुलांना माहिती देत असते, तेव्हा विद्यार्थ्याकडील मोलाची माहिती तिला मिळत असते. मग विद्यार्थ्यासोबतची तिची जंगलामधील भटकंती अर्थपूर्ण होते. एकदा आठवीमधील, बादल टेकाम विद्यार्थी भुरा बगळ्याला पाहून म्हणतो, ‘अजी मेडम, हा न ढोक्रि हो, तळ्याजवळ रायते, आम्ही न याले मारतून अन भाजी करतून’. अशी माहिती ऐकल्यानंतर देखील गीता, पुस्तकी व शहरी पर्यावरणवादी मंडळींसारखे, पक्षी खातो म्हणून त्याला अगदी राष्ट्रद्रोह केल्यासारखे पाहत नाही. त्याला पुढ विचारे, असं!, मग तुला काय काय माहिती आहे या ढोक्रीबद्दल. निश्चितच त्याला असलेली त्या बगळ्या बद्दलची माहिती हे तिच्यापेक्षा अधिक असणार. म्हणूनच गीता विद्यार्थ्याकडून अगदी स्वतः विद्यार्थी होऊन ही माहिती समजून घेते.

शाळेत आता सर्व मुलांना माहिती झालं की त्यांची मेडम फूल, पक्षी, झाड, फळ, किड, शाळेतली फुलपाखरे यांचे फोटो काढत असते. आश्रमशाळेची अधीक्षिका सुट्टीवर असताना गीताकडे त्यांचा कार्यभार सोपविण्यात येतो. असेच एका रात्री मुलं जेवण करून रूममध्ये गेली. गीता सहज व्हरांड्यातून फेरफटका मारताना बादल टेकाम म्हणतो, आज तुम्ही केमरा नाही आणल्या का जी? या मोवाच्या(मोहाच्या) झाडावर दररोज रात्री नऊ दहा वाजता एक बहोत मोठा घुबड येते, त्या ओट्यावर बसला रायते, नाही त गेटवर बसून रायते. अशी मुलं आपली निरीक्षणे गीताला सांगतात. गीता असं पूर्णतः सर्व विद्यार्थ्यात एकरूप झालेली. तिचे वर्ग अकरावी-बारावी हे असले तरी शाळेतील सर्वच मुलामुलींची ती आवडती आहे.

सर्व मुलांना जंगलात घेऊन जाणे अनेक कारणाने शक्य होत नाही, तेव्हा तिने आपल्या फोटोग्राफी कौशल्याचा वापर करून जंगलातील वेगवेगळ्या घटकांचे फोटो काढले. या फोटोंना मुलांच्या मदतीने फ्रेम करून घेऊन, मग शाळेत त्याचे एक प्रदर्शन भरवले. जंगलातील वेगवेगळे घटक आणि त्यांचे परस्पर सहजीवन यावर विद्यार्थ्यांशी खूप छान संवाद सत्र घेतला. अशा पद्धतीने कधी शाळा जंगलात घेऊन जाते, तर कधी जंगल शाळेत घेऊन येते. कधी गावातील शेतकरी किंवा इतर कारागीर यांना शिक्षक म्हणून वर्गात घेऊन जाते. तर कधी सर्व वर्ग गावाच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये घेऊन जाते. मुलांना इतिहास कसा शोधायचा व लिहायचा याचा अनुभव येण्यासाठी सर्व मिळून गावचा इतिहास शोधतात.

एकदा असंच जंगलात फेरफटका मारताना त्यांना एके जागी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा विखुरलेला दिसला. मग तिने मुलांना विचारलं, अरे हे कसं दिसतं? मुलं म्हणाली छान नाही दिसत मेडमजी. मग काय करायचे? मुलं, मेडमजी आपण सर्व कचरा एकत्र करून जाळून देऊ! यानंतर मुलांशी प्लास्टिक कचर्‍याच्या वेगवेगळ्या पैलूवर मुलांशी बोलण्याची व काही पुढाकार घेण्याची गरज तिला जाणवली. मुलांच्या मदतीने हा कचरा एकत्र केला. मग पुण्यातील पर्यावरण शिक्षण केंद्रात फोन करून पुढे काय करायचं याबद्दल चौकशी केली. केंद्रातून तिला भंडारा जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांचा नंबर मिळाला. तिने त्या अधिकार्‍यांशी बोलून संबंधित कचरा कुठे जमा करायचा याबद्दल चौकशी केली.

कारण प्लास्टिक कचरा जाळणं ही घातक गोष्ट आहे, हे मुलांना समजून सांगायचे होते. मुलांसोबत चर्चा करून हा कचरा येथे कसा येतो, ते तिथे येऊ नये म्हणून काय काय उपाययोजना करावे लागेल? याबद्दलचे तिचे नियोजन सुरू आहेत. मात्र तिने गोळा केलेला कचरा कोणी विकतही घेत नाहीत. जाळणे किंवा जमिनीत पुरणे हे पर्यावरणाला घातक गोष्टी तिला मान्य नाहीत. तिचा कचर्‍याला अजून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍याची प्रतीक्षा आहे.

हे सर्व करत असताना, अनेकदा ती स्वतःलाच प्रश्न विचारते, कृतीयुक्त शिक्षण हे प्रभावी शिक्षणाचं मध्यम आहे; पण मुलांना जंगलात घेऊन जाणं, बिया गोळा करणं, त्या बियांचे रोपं बनवणं, खड्डा करणं, झाडं लावणं. सर्व सहकारी आणि विद्यार्थी यांच्यात प्रतिमाच बनली आहे, की ही निव्वळ असेच माती उकर, खड्डा कर, इकडे तिकडे स्वतः भटकणं, विद्यार्थ्यांना घेऊन भटकणं. असं करते. ही शिकवते की नाही. मात्र या कोंडीमधून ती स्वतःच स्वतःला बाहेर काढते. काही वेळा तिच्या शहरातील मित्र मैत्रिणीशी संवाद करून मदत घेते.

जंगलात भटकत असताना मुलांना तिथल्या जमीन, माती, खडक यांचे प्रकार, महत्त्व समजून सांगणं. सहज झाडाजवळून जाताना झाडाची झालेली पानगळ, नवीन पालवी, फुलोरा, लगडलेली फळे यांची चर्चा करत करत हंगामाची चर्चा करणे. वनस्पतींची माहिती देणे व घेणे. त्या झाडावर येणार्‍या किडी, फुलपाखरे, पक्षी, यांचे निरीक्षण करणं. त्यांच्या आपापसातील सहसंबंध यांचे निरीक्षण करत करत चर्चा करणे. जंगलातून आणलेल्या बियांची रचना, त्याचे आवरण याचं निरीक्षण करणं, त्यावरून ते निसर्गतः कसे रुजत असतील याची चर्चा करणे. काही बिया वेगवेगळ्या पद्धतीने रुजविणे. मग मुलांना या निरीक्षणाच्या नोंदी घेण्याच्या सवयी लावणे. असं सगळं ती हळूहळू करू लागली आहे. विद्यार्थीसुद्धा आता समजून घेत आहेत, त्याचं या मेडम सोबत भटकणं यातून खूप काही शिकणंही आहे. सहकारी शिक्षक यांच्यातही बदल होऊ लागला.

पर्यावरण दिवस साजरा करणे किंवा वन्यजीव सप्ताह साजरा करणे या संबंधी जेव्हा शाळेत नोटीसा यायच्या तेव्हा, सहकारी व मुख्याध्यापक म्हणायचे, गीता मॅडम, तुझ्या पर्यावरणाचं काहीतरी पत्र आलंय बघा! अशा प्रश्नाला काही काळ दुर्लक्ष करून तिने मग हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केला. का हो सर पर्यावरण काय फक्त माझंच आहे, तुम्हाला नाही का गरज शुद्ध हवेची? मग तिची धडपड, त्यामागील तळमळ व भूमिका सर्वांना कळू लागली. मुख्याध्यापक तिच्या प्रती सकारात्मक झाले. कामात खूप मदत नाही केली तरी, तिची अडवणूक करणं, नको त्या तांत्रिक नियमांची चौकट पुढे करणे या गोष्टी कमी झाल्या. सहकारी सकारात्मक विचार करू लागेल. कहालकर सर, मुंगुसमारे सर, चव्हाण मॅडम इतर काही सहकारी शक्य त्या परीने गीताला मदतही करू लागले आहेत. तिने हा बदल घडवून आणला आहे. तिने सर्वांची नाळ निसर्गासोबत जोडली आहे.

-बसवंत विठाबाई बाबाराव 

-(लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक असून, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे संस्थेत कार्यरत आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -